खाद्यभ्रमंती : कोल्हापुरातील दावणगिरी डोसा...

कोल्हापुरात गेल्यानंतर बहुतेकांचं प्राधान्य असतं मिसळ खाण्याला आणि तांबडा-पांढऱ्यावर ताव मारायला. क्वचित खांडोळी, कटवडा नि दूध, कोल्ड्रिंक वगैरेचा आस्वादही घेतला जातो.
Davangiri Dosa
Davangiri DosaSakal

कोल्हापुरात गेल्यानंतर बहुतेकांचं प्राधान्य असतं मिसळ खाण्याला आणि तांबडा-पांढऱ्यावर ताव मारायला. क्वचित खांडोळी, कटवडा नि दूध, कोल्ड्रिंक वगैरेचा आस्वादही घेतला जातो. माझंही साधारण असंच असायचं. पण ‘साम मराठी’मध्ये असताना एकदा तीन-चार दिवस कोल्हापूर दौऱ्यावर होतो. तेव्हा सहकारी नि मित्र निशिकांत तोडकर एकेदिवशी मला म्हणाला की, आज मिसळऐवजी दक्षिण दावणगिरी डोसा खाऊयात...

तेव्हापासून आजपर्यंत फक्त मी नाहीतर, सर्व चांदोरकर कोल्हापुरात गेल्यानंतर अंबाबाईच्या दर्शन घेतलं की, पहिलं काम करतो शिवाजी पेठेतल्या (शिवाजी महाराज अर्धपुतळा चौकातील) दावणगिरी डोसा सेंटरमध्ये जाऊन मनसोक्त लोणी डोसा खाण्याचं. पहिल्यांदा लोणी डोसा खाल्ल्यानंतर जे प्रेम जडलं ते आजपर्यंत टिकून आहे. हल्ली लोणी डोसा अनेक ठिकाणी मिळतो. पण इथं मिळणारा लोणी डोसा एक नंबर. कधी खाल्ला नसेल तर आवर्जून खा.

एकदम झक्कास...

दक्षिण दावणगिरीमधील लोणी डोसा हा लोण्यामध्ये अक्षरशः निथळत असतो. इतर ठिकाणी हातचं राखून लोणी चिमटी चिमटीनं डोशावर टाकलं जातं, पण इथं लोणी अक्षरशः मुठीनं टाकलं जातं. कुठलीही हयगय नाही. तापलेल्या तवावर पाणी मारणं, तवा साफ करून घेणं, डोसे घालणं, डोशांवर लोणी टाकल्यावर चरचरण्याचा आवाज येणं नि डोशांचे घाणे निघणं हे सतत सुरू असतं. खरी गंमत आहे इथल्या डोशाच्या पिठात आणि लोण्यात. त्यामुळं इथले डोसे एकदम हलके आणि जाळीदार होतात, कुरकुरीत असतात. डोस आणि लोणी यांच्या संगमामुळं आलेला खमंगपणा चवीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो. वरून एकदम कुरकुरीत असलेला डोसा आतून एकदम वाफाळता नि नरम...सोबत बटाट्याची भाजी आणि हिरव्या मिरचीचा झटका देणारी ओल्या नारळाची चटणी...

दक्षिण दावणगिरीत गेल्यानंतर तव्यावरून चरचरण्याचा आवाज नि लोण्याचा गंध यामुळं तुमचं मन दुसऱ्या कोणत्याही पदार्थाकडं आकृष्ट होणारच नाही. भूक लागली असेल किंवा तब्येतीत खाणारे असाल, तर किमान दोन डोसे तरी तुम्ही नक्कीच खाणार. आणि इथले दोन डोसे खाणं म्हणजे पोट एकदम फुल्ल. लोणी डोसा हेच इथं मुख्य आकर्षण. बाकी तट्टे इडली नि मेदू वडा वगैरे पदार्थही मिळतात. पण डोशाची साथ सोडून दुसरी एखादी ऑर्डर द्यावी, असं कधीही वाटलं नाही. माझं इडलीवर तुफान प्रेम. पण मी देखील आतापर्यंत कधीही लोणी डोशाऐवजी इडलीची ऑर्डर दिलेली नाही.

गेली चौदा वर्ष इथं जातोय. पण तीच चव आणि तोच आपलेपणा इथं अनुभवायला मिळतो. दक्षिण दावणगिरी डोसा सेंटरचं स्वरूप आता बदललं आहे. पण स्वादिष्ट चव आणि तुफान गर्दी तशीच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com