खाद्यभ्रमंती : केरळची खासियत इडिअप्पम-कुर्मा

केरळला गेल्यानंतर एक बरं असतं आणि ते म्हणजे सकाळ-संध्याकाळ इडली, मेदूवडा, डोसा आणि उत्तप्पा याच्यापलीकडे अनेक वेगळ्या आणि विशेष डिशेस खाता येतात.
idiyappam kurma
idiyappam kurmasakal

चेन्नईमध्ये कॉफी पावडर, सांबार नि रस्सम मसाला खरेदी करीत असताना एकदम इडिअप्पमसाठी लागणाऱ्या तांदळाच्या पिठीची पिशवी दिसली आणि केरळमधील इडिअप्पम-कुर्मा, इडिअप्पम-मुगाची उसळ नि इडिअप्पम-चिकन स्ट्यू अशा आठवणी ताज्या झाल्या.

केरळला गेल्यानंतर एक बरं असतं आणि ते म्हणजे सकाळ-संध्याकाळ इडली, मेदूवडा, डोसा आणि उत्तप्पा याच्यापलीकडे अनेक वेगळ्या आणि विशेष डिशेस खाता येतात. वेळीअप्पम-कडला करी (हरभऱ्याची उसळ) अथवा चटणी-सांबार, मलबारी परोट्टा-भाजी, पुट्टू-करी, इडिअप्पम (शेवयांची इडली), पुरी-भाजी आणि मेदू वडा असा नाश्ता बहुतांश ठिकाणी उपलब्ध असतो. सकाळी सकाळी नाश्त्यालाही लोक परोट्टा, इडिअप्पम, वेळीअप्पम किंवा पुट्टू यांच्यासोबत अंडा, चिकन किंवा फिश करी, व्हेज किंवा चिकन स्ट्यू आवडीनं खातात.

सकाळच्या नाश्त्याला इडिअप्पम आणि पुट्टं हे त्यापैकी एक आणि संध्याकाळी मस्त कच्च्या, तसेच पिकलेल्या केळ्याची भजी, कांद्याचा वडा, साबुदाण्याच्या कंदाचे वाफाळते काप किंवा वेफर्स नि डाळवडा वगैरे... आपल्या एकदम आवडीचा विषय.

इडिअप्पम हा पदार्थ मी प्रथम खाल्ला तो एका गेस्ट डाऊसमध्ये. नाश्त्याला काय करू, असं आचाऱ्यानं विचारलं आणि काही पर्याय सांगितले. त्यापैकी इडिअप्पम कर, म्हटल्यावर त्याला झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता. त्याच आनंदात त्यानं असं काही अप्रतिम इडिअप्पम नि कुर्मा भाजी केली आणि अस्मादिकांना त्या पदार्थाच्या कायमचं प्रेमात पाडलं.

नंतर एका लग्नाच्या निमित्तानं कासरगोडला गेलेलो, तेव्हा आवर्जून कण्णूरला गेलो. तेव्हा टेस्ट केलेलं इडिअप्पम तितकंच अफलातून. कण्णूर स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर लगेच एक छोटेखानी नाश्ता सेंटर दिसलं. तिथं इडिअप्पम, मेदूवडा, पुरीभाजी आणि इतर पदार्थ उपलब्ध होते. आम्हाला पोहोचायला अकरा वाजलेले. त्यामुळं इडली संपलेली होती.

केरळमध्ये फिरत असताना एक गोष्ट कायम जाणवली. ती म्हणजे इकडे अगदी सकाळच्या सुमारास इडली मिळते. पण बहुतांश ठिकाणी दहानंतर इडली मिळत नाही. हे माझ्या पथ्यावर पडलं. तिथं मी इडिअप्पम आणि कुर्माभाजी मागविली. इडिअप्पम अर्थातच, गार होतं. पण गरमागरम आणि झणझणीत कुर्म्यासोबत इडिअप्पमवर ताव मारताना मजा येत होती. अर्थात, इडिअप्पम वाफाळतं असतं तर येणारी मजा काही औरच असती, हे सांगायला नकोच. पण गार असलं तरी इडिअप्पम हे खायला मजा येतेच. मला केरळ जाम आवडतं ते यामुळंच.

तांदळाच्या पिठीपासून इडिअप्पम करतात. तांदळाच्या पिठीत स्वादानुसार मीठ वगैरे घालायचं. थोडं तेल घालायचं. गरम पाणी टाकून ते पीठ एकजीव आणि घट्ट मळून घ्यायचं. मग त्या पिठाचा गोळा सोयऱ्यामध्ये घालून इडलीपात्रात शेवयांप्रमाणे गोलाकार इडल्या तयार करायच्या. नंतर इडलीपात्रात वाफेवर त्या शेवयांच्या इडल्या शिजवायच्या. सोबत सांबार, कुर्मा, चिकन किंवा अंड्याची करी किंवा एखाद्या घट्ट उसळीसोबत ताव मारायचा. एकदम साधी, सोपी पण स्वादिष्ट रेसिपी....

कोकणात नारळाच्या रसातल्या (दुधातील) शेवया म्हणजेच शिरवळ्या नावाचा पदार्थ मिळतो. शिरवळ्या तयार करण्याची पद्धत जवळपास सारखीच. पण या शेवया खातात नारळाच्या दुधासोबत. त्याची चव गोडसर, पण इडिअप्पम खातात तिखट किंवा झणझणीत पदार्थांबरोबर. त्यामुळं इडिअप्पम गोड नसलं तरी त्या पदार्थाची गोडी मला अधिक लागली आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

इडिअप्पम-कुर्मा आणि मेदूवडा असा भरपेट नाश्ता केल्यानंतर आम्ही मस्त कडक चहा मागविला. केरळमध्ये कासरगोड, कण्णूर किंवा कोणत्याही शहरात कॉफीइतकाच चहाही मस्त मिळतो. चहा नि दूध वेगवेगळे उकळून थेट कपातच दोन्ही एकत्र करून ते चहा देतात. त्यामुळे आपल्याला हवा तितका कडक चहा मिळू शकतो. केरळप्रमाणेच हैदराबाद, तमिळनाडू नि दक्षिण भारतातील बऱ्याच शहरांमध्ये असा चहा मिळतो. भरपेट नाश्त्यावर पाहिजे तितका कडक चहा हे म्हणजे स्वर्गसुखच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com