esakal | खाद्यभ्रमंती : नगरची ज्ञानेश्वर मिसळ | Dnyaneshwar Misal
sakal

बोलून बातमी शोधा

Misal
खाद्यभ्रमंती : नगरची ज्ञानेश्वर मिसळ

खाद्यभ्रमंती : नगरची ज्ञानेश्वर मिसळ

sakal_logo
By
आशिष चांदोरकर

पुण्याहून नगर किंवा औरंगाबादला जायचं असेल, तर मिसळ कुठं खायची हे साधारण ठरलेलं असतं. नेहमीचं ठिकाण सोडून वेगळ्या ठिकाणी मिसळ ट्राय करायला आपण फारसे तयार नसतो. मागं एकदा औरंगाबादला गेलो होतो तेव्हा मुद्दाम सरदवाडीला न थांबता नगरच्या अलीकडे कुठंतरी थांबून मिसळ खावी, असा विचार केला. लांबचा पल्ला गाठायचा असल्यामुळं नगरपर्यंत जाऊन मग थांबावं, असं ठरविलं.

मित्रवर्य अभय जिन्सीवाले याला विचारलं, तर त्यानं शिर्डी फाटा सोडल्यानंतर ज्ञानेश्वर मिसळ म्हणून चांगला जॉइंट आहे. तिथं थांबा, असं सांगितलं. शिर्डी फाटा सोडला आणि हॉटेल संदीप येण्यापूर्वीच डाव्या हाताला ज्ञानेश्वर मिसळ असा बोर्ड दिसतो. बाहेरच भज्यांचा घाणा काढण्याचं काम अविरतपणे चालू असतं. मध्येच कधी मिरच्यांचा घाणा काढला जातो. हा घमघमाटच आपल्या स्वागतासाठी सज्ज असतो.

आत पोहोचल्यानंतर ऑर्डर काय द्यायची याचा फार विचार करावा लागत नाही. मिसळपाव आणि भजी प्लेट. इथं बटाटे वडा मिळत नाही. मिसळीच्या ठिकाणी बटाटे वडा न मिळणं हे थोडंसं विचित्र वाटतं. मिसळ, वडा आणि भजी हे कायम हातात हात घालूनच असतात. पण ‘ज्ञानेश्वर’मध्ये हे त्रिकूट दिसत नाही. आणि त्रिकूट जमू न देण्याची परंपरा त्यांनी प्राणपणानं जपलीय. त्यामुळं मिसळीसोबत भज्यांचीच ऑर्डर द्यावी लागते. ऑर्डर दिल्यानंतर आपल्यासमोरच मिसळची प्लेट भरायला घेतली जाते. शेवचिवडा, खारी बुंदी आणि इतर पदार्थ प्लेटमध्ये भरले जातात. वरून पुन्हा बारीक शेव आणि कांदाकोथिंबीर पसरली जाते. वरून मिसळीचा रस्सा टाकला जातो. वरती लिंबाची फोड ठेवून मिसळ, पाव आणि रश्शाचं भांडं आपल्यासमोर ठेवलं जातं.

काकडे बंधू हे जवळपास पंचवीस तीस वर्षे ही मिसळ लोकांना खिलवत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या मिसळीला लागणारं सगळं फरसाण ही मंडळी स्वतः तयार करतात. त्यामुळं शेवचिवडा आणि इतर जिन्नस एकदम ताजे तसेच कुरकुरीत असतं. त्यामुळं मिसळीची रंगत वाढते. रश्शाची तर बातच विचारू नका. एकदम गरमागरम आणि झणझणीत. गरम असल्यामुळं झणझणीतपणा थोडासा अधिकच जाणवतो.

मिसळीची जान असणारे दोन पदार्थ म्हणजे शेवचिवडा आणि रस्सा. दोन्ही पदार्थ एकदम अप्रतिम दर्जाचे. ते एकमेकांमध्ये मिसळल्यानंतर आपल्याला स्वर्गसुख देऊन जातात. मिसळ रंगात आली की, मग भज्यांची ऑर्डर देऊन टाकावी नि मिसळीसोबत भज्यांचाही आस्वाद घ्यावा. मिरच्यांचे नि कांद्यांचे तुकडे घालून तयार केलेली गोलभजी एकदम कुरकुरीत. भज्यांचे तुकडे करून मिसळीच्या रश्शात बुडवून खाण्यातील गंमत काही औरच.

पहिल्यांदा गेल्यानंतर मिसळीच्या आम्ही प्रेमातच पडलो. नंतर दोन-तीनदा तिथून जाणं झालं तेव्हा ज्ञानेश्वरलाच थांबलो. मिसळ, भज्यांचा मनसोक्त आस्वाद घेतला नि मगच पुढं गेलो. मिसळ खाऊन तृप्त झाल्यानंतर चहा पाहिजेच. मिसळीनंतर चांगला चहा मिळाला, तर मिसळीमुळे जमलेली मैफल आणखी रंगते. ज्ञानेश्वरमध्ये ही मैफल अधिक चांगल्या पद्धतीने रंगत जाते. कारण इथला चहा देखील एकदम भारी.

तेव्हा पुण्याहून नगर, औरंगाबादला किंवा औरंगाबादहून पुण्याला येणार असाल, तर केडगांव परिसरात असलेल्या ज्ञानेश्वर मिसळीचा आस्वाद नक्की घ्या. पुढच्या प्रवासाला एकदम तरतरी येईल...

loading image
go to top