खाद्यभ्रमंती : रिटकवलीच्या ‘महालक्ष्मी’चा शेवचिवडा | Mahalaxmi Shevchivda | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खाद्यभ्रमंती : रिटकवलीच्या ‘महालक्ष्मी’चा शेवचिवडा
खाद्यभ्रमंती : रिटकवलीच्या ‘महालक्ष्मी’चा शेवचिवडा

खाद्यभ्रमंती : रिटकवलीच्या ‘महालक्ष्मी’चा शेवचिवडा

चिवडा (Chivda) म्हटलं की आपसूक महाराष्ट्रातील अनेक ब्रँड्स (Brands) डोळ्यासमोर येतात. काजू-बेदाणे, दाणे न् खोबऱ्याचा भरपूर समावेश असलेला आमच्या पुण्यातला लक्ष्मीनारायणचा चिवडा, (Laxminarayan Chivda) तळल्यामुळे कुरकुरीत झालेला फ्राय कांदा घातलेला नाशिकचा कोंडाजी चिवडा, सोलापूरजवळच्या लांबोटीच्या ‘जयशंकर’चा मक्याचा चिवडा, सांगलीमधील गोरे बंधू, अंबा किंवा बुटालेचं भडंग आणि लासलगावच्या लालाजींची भेळ (म्हणजे शेव, चिवडा नि डाळ-मसूर) ही काही अगदी पटकन डोळ्यासमोर येणारी नावं..

बाकी शेव चिवडा ही मला वाटतं महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय डिशपैकी एक डिश असावी. थोडीशी दुर्लक्षित किंवा चर्चा न होणारी परंतु प्रत्येक गावात बहुतांश चहा आणि स्नॅक्स सेंटरवर मिळणारी डिश. सोबत बारीक बारीक कांदा न् तळलेली मिरची. चहाचे घोट घेताना, चर्चा करताना अगदी सहजपणे खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे शेव चिवडा. सकाळ असो किंवा संध्याकाळ शेव चिवडा चालतोच.

नुकताच अव्वल दर्जाचा शेवचिवडा खाण्यात आला. माझा मित्र प्रभाकर भोसलेनं आवर्जून हा शेवचिवडा खायला दिला. सातारा जिल्ह्यातील रिटकवली गावातील शामराव रामचंद्र मर्ढेकर यांचे प्रॉडक्शन असलेल्या ‘महालक्ष्मी’चा स्पेशल शेव चिवडा. सातारा मेढा मार्गावर रिटकवली गाव आहे. तिथं गेल्या अनेक वर्षांपासून ‘महालक्ष्मी’चा शेव चिवडा मिळतो. सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, निपाणी आणि कर्नाटकात अनेक ठिकाणी हा शेव चिवडा खूप लोकप्रिय आहे.

पाचवडच्या अमृतेश्वर स्वीट्सच्या स्पेशल कंदी पेढ्याचं पुण्यात टिळक रोडवर छोटं दुकान आहे. महाराष्ट्र मंडळच्या जवळ. तिथं रिटकवलीचा स्पेशल शेव चिवडा मिळतो. स्पेशालिटी म्हणाल तर एकदम हलका, कमी तेलकट आणि जबरदस्त कुरकुरीत. बारीक शेव आणि भाजके पोहे इतके कुरकुरीत की विचारू नका. तेल जवळपास नाहीच असं म्हटलं तरी चालेल. शिवाय चवीला एकदम कमी तिखट आणि दोन-तीन घासांनंतर तिखटचा स्वाद जिभेवर रेंगाळू लागेल. तो पण खूप हलका.

तळलेल्या मिरचीचे तुकडे किंवा कढीपत्ता वगैरे दिसणारच नाहीत. दाण्यांचं प्रमाणही एकदम कमी. त्यामुळं कुरकुरीत शेव आणि शिवडा पहिल्या घासातच आपलं मन जिंकून घेतो. सोबत बारीक चिरलेला कांदा, थोडा टोमॅटो न् एखादी मिरची असेल तर उत्तम. पण हे नसेल तरी काही फरक पडत नाही. फक्त शेव चिवडा खाल्ला तरी प्रचंड सुख आणि समाधान मिळतं.

‘महालक्ष्मी’चं फरसाण, स्पेशल फरसाण, नवरत्न फरसाण, शेव, तिखट बुंदी, पापडी आणि बरंच काही प्रसिद्ध आहे. त्यापैकी बहुतेक पदार्थ श्री अमृतेश्वर स्वीट्सच्या टिळक रोडवरच्या आउटलेटमध्ये मिळतात. कधी सातारा, सांगली किंवा कोल्हापूर, बेळगावला जाणार असाल, तर रिटकवलीच्या ‘महालक्ष्मी’चा सुप्रसिद्ध शेव चिवडा नक्की खरेदी करा. पुण्यात असाल, तर अमृतेश्वर स्वीट्समध्ये खरेदी करून आस्वाद घ्या... दिलखूष हो जाएगा...

Web Title: Aashish Chandorkar Writes Ritkavali Village Mahalaxmi Shevchivda Food

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Aashish Chandorkar
go to top