फूडहंट : आइस्क्रीम तो मंगता है..!

IceCream
IceCream

उन्हाळा सुरू झाल्याने सगळ्यांनाच आंब्याच्या सीझनचे वेध लागले आहेत. मात्र, आंबे बाजारात येण्यासाठी थोडी वाट पाहवी लागणार आहे. उन्हाळ्यात आंब्यानंतर आवडीचे असते ते आइस्क्रीम. आइस्क्रीमचा आनंद वर्षभर लुटता येत असला तरी उन्हाळ्यात आइस्क्रीम खायची मजा वेगळीच असते. आइस्क्रीमची वेगवेगळी रूपे आपल्याला अलीकडे बघायला मिळतात. काही अशा जागा जिथे क्लासिक आइस्क्रीमची चव घेता येईल -

कावरे कोल्ड ड्रिंक हाउस (तुळशीबाग) - कावरे म्हणजे नॉस्टेल्जिया! एक पूर्ण हॉटेल जिथे फक्त आइस्क्रीम आणि मिल्कशेक्स मिळतात, ही कल्पनाच भन्नाट. पुण्याला आइस्क्रीम ‘संडे’ या संकल्पनेची ओळख ‘कावरें’नी करून दिली, असे म्हणायला हरकत नाही. टायटॅनिक, चष्मेशाही, टॉल ग्लोरी आणि इतर संडेजची चव आजही कायम आहे.

खत्री बंधू आइस्क्रीम (अनेक शाखा) - पुणेकरांना गेली ४० वर्षे आइस्क्रीम खाऊ घालणारा ब्रॅण्ड म्हणजे खत्री बंधू होय. आइस्क्रीमच्या चाहत्यांनी खत्री बंधूंचे ‘पॉट’ आइस्क्रीम एकदा तरी नक्कीच ट्राय करायला हवे. पाणी-पुरीचा खास फ्लेवर असलेले आइस्क्रीम तुम्हाला खत्री बंधूमध्ये मिळू शकतो. याशिवाय मावा, हेझलनट चॉकलेट, ग्रीन अॅपल, गुलकंद, अंजीर, बटरस्कॉच, फ्रेश मॅंगो आदी फ्लेवर नक्की ट्राय करावेत. पुण्यासोबतच आता मुंबई, नागपूर, नाशिक, बारामती या ठिकाणीही खत्री बंधूंची आइस्क्रीम सेवा उपलब्ध आहे.

नॅचरल्स (अनेक शाखा) - नॅचरल्सच्या फ्रेश फ्रुट आइस्क्रीमचे अनेक चाहते आहेत. टेंडर कोकोनट या फ्लेवरची ओळख नॅचरल्सने करून दिली. टेंडर कोकोनट सोबतच मँगो, जॅकफ्रुट, चिक्कू फ्लेवर्स अप्रतिम आहेत. काही सिझनल आणि फेस्टिव्ह फ्लेवर्स जसे तिळगूळ, शीर खुर्मा, मलबेरी, गूजबेरी इत्यादी देखील त्या-त्या सीझनमध्ये चाखायला मिळतात. बाकी कॉफी वॉलनट आणि चोकोबाइट हे फ्लेवर्सही खास.

किगा (बाजीराव रस्ता) - नावीन्यपूर्ण आणि अतरंगी आइस्क्रीम फ्लेवर्ससाठी अलीकडे  किगा आइस्क्रीमचे नाव सोशल मीडियावर बघितलेच असेल. साजूक तुपातील पुरणपोळी, उकडीचे मोदक, चहापाणी, मिसळ, स्वीटकॉर्न आणि इतर अनेक भन्नाट फ्लेवर्स किगामध्ये चाखायला मिळतात. इतकेच नाही तर आइस्क्रीम थाळी देखील उपलब्ध आहे. हे वेगळे आणि हटके फ्लेवर्स ट्राय करायचे साहस करायचे नसेल तर सामान्य फ्लेवर्सही इथे मिळतात. 

राजमंदिर - राजमंदिर हे नाव आता पुण्यात चांगलेच प्रसिद्ध झाले आहे. राजमंदिरच्या आइस्क्रीमने त्यांची वेगळी जागा निर्माण केली आहे. त्यांच्याकडे उपलब्ध असणारे फ्लेवर्स खाल्यावर खरोखरचे फळ खाल्यासारखे वाटते. त्यांच्या मेन्यूकार्डवर नजर टाकताच तुम्हाला असंख्य पर्याय पाहायला मिळतील. येथील रेड पेरू आइस्क्रीम चांगलेच गाजले. यासोबतच पान मसाला आणि संत्रा-मंत्रा हे फ्लेवर नक्की ट्राय करा. सिताफळ, लिची, अंजीर आणि एवढचं काय तर विनासाखरेचे आइस्क्रीमही मिळतात.

ओल्ड मुंबई आइस्क्रीम (कोथरूड) - मूळचा इचलकरंजीचा असलेला हा आइस्क्रीम ब्रँड आता पुण्यातही उपलब्ध झालेला आहे. इचलकरंजीमध्ये हातगाडी ते आता महाराष्ट्रभर पसरलेल्या शाखा असा हा प्रवास आहे. अंजीर हनी, बदाम रोस्टेड, जांभूळ, पान हे इथले काही खास फ्लेवर्स आहेत.

अप्सरा आइस्क्रीम (अनेक शाखा) - मूळचा मुंबईचा असलेला हा ब्रँड आता पुण्यातही मिळत आहे. म्हशीचे दूध आणि एकदम फ्रेश घटक, फळांनी बनलेले आइस्क्रीम ही त्यांची स्पेशालिटी. अनोख्या कॉम्बिनेशनचे आइस्क्रीम आणि सॉर्बे फ्लेवर्स इथे टेस्ट करायला मिळतात. पिना बेरी (अननस आणि क्रॅनबेरी), ऑरेंज ऍप्रिकॉट, मोसंबी, वॉटरमेलन वंडर सॉर्बे, पाणीपुरी सॉर्ब्रे आदींच्या चवी इथे नक्की ट्राय करा. शुगर फ्री ऑप्शनसही इथे अनेक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com