esakal | फूडहंट : पार्सल आणि ‘न्यू नॉर्मल’
sakal

बोलून बातमी शोधा

Food-Delivery

गोष्ट आहे लॉकडाउनपूर्वीच्या दिवसांची. पुण्यातील डेक्कन, जंगली महाराज रस्त्यापासून बाणेर, बावधन कॅम्पपर्यंतची कोणतीही हॉटेल्स...पुण्यातील काय अगदी कोणत्याही मोठ्या शहरांतील प्रख्यात हॉटेल्स...बाहेर वेटिंग नाही, अशी स्थिती अगदी क्वचित असायची. कोणत्या हॉटेलबाहरेची रांग छोटी आहे, हे शोधण्यात अनेक हॉटेलच्या फेऱ्याही व्हायच्या. मात्र आता परिस्थिती बदलली आहे.

फूडहंट : पार्सल आणि ‘न्यू नॉर्मल’

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

गोष्ट आहे लॉकडाउनपूर्वीच्या दिवसांची. पुण्यातील डेक्कन, जंगली महाराज रस्त्यापासून बाणेर, बावधन कॅम्पपर्यंतची कोणतीही हॉटेल्स...पुण्यातील काय अगदी कोणत्याही मोठ्या शहरांतील प्रख्यात हॉटेल्स...बाहेर वेटिंग नाही, अशी स्थिती अगदी क्वचित असायची. कोणत्या हॉटेलबाहरेची रांग छोटी आहे, हे शोधण्यात अनेक हॉटेलच्या फेऱ्याही व्हायच्या. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. हॉटेल्स ३३ टक्के क्षमतेनं सुरू करण्याचा विचारा (निदान पुण्यात) होत असला, तरी ती परिस्थितीही लवकर येईल अशी स्थिती नाही. पूर्वी घरी पार्सल आणून खाण्याचं प्रमाण अत्यल्प होतं, आता मात्र त्याला पर्याय राहिलेला नाही. पार्सल आणल्यानंतर ते घरातील भांड्यांत सोडणं आणि आपल्याच घरातील प्लेटमध्ये खाणं हे अनेकांच्या पचनी पडत नव्हतं, मात्र आता ‘न्यू नॉर्मल’ म्हणत त्याला स्वीकारावं लागणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यातील अनेक हॉटेल्सबाहेर पहिल्या अनलॉकनंतर रांगा लागलेल्या दिसल्या. या रांगा होत्या आपल्या आवडीच्या पदार्थांचे पार्सल हॉटेलमधून घेऊन जाण्यासाठी. फर्ग्युसन रस्त्यावरील खाद्यप्रेमींच्या आवडत्या ‘वैशाली-रुपाली’च्या बाहेर लागलेल्या रांगा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. या रस्त्यावरील एका जुन्या इराणी हॉटेलमध्ये आवडत्या चहा व बनमस्क्याच्या पार्सलसाठीही रांगा लागल्या होत्या. (खरेदी करताना एखाद्या दुकानात प्लॅस्टिकच्या पिशवीतून चहाचं पार्सल आल्यावर हेच लोक नाकं मुरडत असणार. काळ कसा बदलतो पाहा...) पुण्यातील अनेक अमृततुल्य अद्याप सुरू झालेली नाहीत व त्यामुळं चहाशौकिनांची आबाळ अगदी स्पष्ट दिसते आहे. थाळी सेवा देणाऱ्या काही हॉटेल्सनी पार्सल सेवा सुरू केल्या आहेत, मात्र त्यांना हवा तसा प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही. अशा पार्सलसाठी मोठ्या प्रमाणावर पॅकिंगची गरज पडते व सध्याच्या परिस्थितीत लोक रिस्क घ्यायला तयार नाहीत. त्यातच बाहेर गावी गेलेला स्टाफ अद्याप परत आला नसल्यानं हॉटेलचालकांचीही तारांबळ उडते आहे. एका हॉटेलमालकाशी परवा बोलत असताना ते म्हणाले, ‘‘आमचे बहुतांश आचारी पश्‍चिम बंगालमधील आहेत, काही स्टाफ उत्तर प्रदेश व बिहारमधील आहे. हॉटेल पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्याशिवाय त्यांना परत बोलावणं अवघड आहे. त्यांना पुरेसं काम नसल्यास त्यांचा पगार व खाण्यापिण्याचा खर्च आमच्या अंगावर पडलं. त्यामुळं सध्या तरी हॉटेल सुरू करण्याचा विचार नाही...’’ 

एकंदरीतच, सहज तयार होणारे इडली, उडीदवडा, डोसा-उत्तप्पा अशा खाद्यपदार्थांची पार्सलसेवा नजीकच्या काळात पूर्ण क्षमतेनं सुरू होईल आणि खाद्यप्रेमींना त्यावरच समाधान मानावं लागंल. मांसाहारी पदार्थांच्या चाहत्यांसाठी परिस्थिती नॉर्मल व्हायला आणखी थोडा कालावधी जावा लागंल. या परिस्थितीत हे ‘न्यू नॉर्मल’ स्वीकारणं आणि आपल्याला सुरक्षित वाटत असलेल्या ठिकाणावरून पार्सल घेऊन येणं आणि घरातील डिशमध्ये काढून खाणं, एवढंच खवय्यांच्या नशिबात दिसतंय...  

Edited By - Prashant Patil