हेल्दी रेसिपी : चोंगे : चविष्ट 'कलाकृती'

शिल्पा परांडेकर
Tuesday, 8 September 2020

आमच्या इथे एक मुस्लिमेतर कुटुंबात वाजतगाजत ताबूत आणून बसविण्याची प्रथा अनेक पिढ्यांपासून होती. ताबूत आणणाऱ्या व्यक्तीचे खूप आदराने व प्रेमाने स्वागत केले जायचे. चोंगे, मलिदा, घोडे हे या सणाचे विशेष पदार्थ एकमेकांना वाटले जायचे. मला अप्रूप याचे वाटायचे की हा सण आपला नाही तर मग हे सगळे लोक इतक्या आनंदाने, उत्साहाने या सगळ्यात कसे आणि का सहभागी होत असतील? हाच प्रश्‍न दिवाळी, वगैरे आपल्या सणांच्या बाबतीतही पडायचा.

मोहरम हा मुस्लिम दिनदर्शिकेतील पहिला महिना. माझ्या लहानपणी मी या सणाच्या निमित्ताने साजऱ्या होणाऱ्या अनेक गोष्टी अनुभवल्या.

आमच्या इथे एक मुस्लिमेतर कुटुंबात वाजतगाजत ताबूत आणून बसविण्याची प्रथा अनेक पिढ्यांपासून होती. ताबूत आणणाऱ्या व्यक्तीचे खूप आदराने व प्रेमाने स्वागत केले जायचे. चोंगे, मलिदा, घोडे हे या सणाचे विशेष पदार्थ एकमेकांना वाटले जायचे. मला अप्रूप याचे वाटायचे की हा सण आपला नाही तर मग हे सगळे लोक इतक्या आनंदाने, उत्साहाने या सगळ्यात कसे आणि का सहभागी होत असतील? हाच प्रश्‍न दिवाळी, वगैरे आपल्या सणांच्या बाबतीतही पडायचा.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या ‘एकात्मतेचे’ आकलन हळूहळू होत गेले. मी पुढे जेव्हा माझ्या प्रवासात अशा अनेक समुदायाच्या व समाजाच्या लोकांना भेटले तेव्हाही असाच एकोपा अनुभवता आला. माझ्या आजीला विविध धर्मीयांच्या सणांमध्ये सहभागी होणे आवडायचे. तिच्यामुळे विविध सणांच्या विविध पदार्थांच्या मेजवानीचा आनंद घेता आला. त्यामुळे सणांचे पदार्थ केवळ एक प्रथा नाही, तर उत्सवाचा आनंद द्विगुणित करणारे, आपापसातील भेदभावांची दरी मिटवणारे, भावबंध मजबूत करणारे गोड ‘दुवा’ आहेत, हेही तिच्यामुळेच मनात रुजले.

मोहरमच्या काळात बनविला जाणारा ‘चोंगे’ हा स्वादिष्ट व ‘कलाकृती’ असणाऱ्या पदार्थाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. कलाकृती असणारा म्हणतेय, कारण याचा नक्षीदार पाट (पोळपाट). हा पाट विशेषतः कोल्हापूर भागात वापरला जातो. यावर आपली गव्हाची चपाती/पोळी लाटली जाते. महाराष्ट्रातील बाकी भागात असा पाट वापरत नसल्यामुळे तयार चपातीवर हातानेच वर्तुळाकार मुरड घालत वर्तुळे बनवून चोंगे करतात.

गव्हामध्ये ग्लुटेनचे प्रमाण अधिक असल्यामुळे अनेकजण गव्हाचे पदार्थ खाणे टाळतात. असे असले तरी गव्हात लोह, थायमिन, कॅल्शिअम, कॉपर, मॅग्नेशिअम, फॉस्फरस सारखी पोषक घटक देखील आहेत. त्यामुळे गव्हाचे पदार्थ अगदीच टाळण्यापेक्षा प्रमाणात खाल्ल्यास नक्कीच उपयुक्त आहे.
साहित्य - कणीक, गुळाचा पाक, खोबरे किस, खसखस व बेसन भाजून, बडीशेप, वेलची व सुंठ पूड.

कृती -
१. चोंगे पाटावर चपाती लाटून भाजून घेणे.
२. चोंग्यांवर गुळाचा पाक व बाकी सर्व साहित्य पेरून ४-५ तास बाजूला ठेवणे.
३. तूप घालून खाणे.
टीप - आवडत असल्यास ड्रायफ्रुट्स व गुळाच्या पाकाऐवजी विविध सिरपचाही वापर करता येईल. पॅनकेकप्रमाणे नाष्ट्यासाठी उत्तम प्रकार.

Edited By - Prashant Patil

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shilpa parandekar on healthy recipe