esakal | हेल्दी रेसिपी : कडुनिंबाची चटणी
sakal

बोलून बातमी शोधा

Cinnamon-sauce

हिंदू शालिवाहन वर्षाची उद्यापासून सुरुवात व चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्याचाही दिवस. या दिवशी आपण गुढी उभारतो. ही गुढी मला खूप समर्पक वाटते. म्हणजे. या गुढीला धार्मिक व सामाजिक आशय आहेतच; शिवाय यश, प्रेरणा, आरोग्य असेही अनेक संदर्भ आहेत. आरोग्यासंदर्भात बोलायचे झाल्यास गुढीला आपण कडुनिंबाच्या झाडाची डहाळी बांधतो, कडुनिंबाची चटणी खातो. कडुनिंबाचे महत्त्व कल्पवृक्षापेक्षा कमी नाही.

हेल्दी रेसिपी : कडुनिंबाची चटणी

sakal_logo
By
शिल्पा परांडेकर

हिंदू शालिवाहन वर्षाची उद्यापासून सुरुवात व चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्याचाही दिवस. या दिवशी आपण गुढी उभारतो. ही गुढी मला खूप समर्पक वाटते. म्हणजे. या गुढीला धार्मिक व सामाजिक आशय आहेतच; शिवाय यश, प्रेरणा, आरोग्य असेही अनेक संदर्भ आहेत. आरोग्यासंदर्भात बोलायचे झाल्यास गुढीला आपण कडुनिंबाच्या झाडाची डहाळी बांधतो, कडुनिंबाची चटणी खातो. कडुनिंबाचे महत्त्व कल्पवृक्षापेक्षा कमी नाही. कडुनिंबाचे हे महत्त्व या प्रथेमधून किती अलगदपणे आपल्याला सांगितले आहे. आपल्या अशा अनेक प्रथांमधून अशाप्रकारच्या अनेक छोट्या-छोट्या; परंतु महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत, याचा आपण विचार करायला हवा. आयुर्वेदिक औषधे, विविध सौंदर्यप्रसाधने व घरगुती वापरांमध्ये कडुनिंबाच्या पानांचा, फुलांचा, सालीचा वापर होतो.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘निम्बः शीतो लघुर्ग्राही दाहजित्त्वग्निकारक:’
व्रणपित्तकफच्छिर्दिकृष्ठहल्लासमेहनुत् । 
इति पल्ल्वाधिकार:।।

अर्थात, निंब हे शीतल, पचायला हलके, ग्राही, आग कमी करणारे, अग्निवर्धक, व्रण, पित्त, कफ, छर्दी (उलटी), कुष्ठ (त्वचाविकार), हल्लास (मळमळ) व मूत्ररोग दूर करणारे आहे.

मला आठवते, लहानपणी आम्ही मुले कडुनिंबाची चटणी खायला तयार नसायचो. तेव्हा आई-आजी काहीतरी करून आम्हाला ते खायला घालत. म्हणायच्या, ‘आज ही कडुनिंबाची गोळी खाल्ली तर वर्षभर पुढे आजारी नाही पडणार...’ मात्र, या एकाच दिवशी कडुनिंब खाण्यापेक्षा या पूर्ण ऋतूमध्ये कडुनिंबाचे सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. आयुर्वेदानुसार, कडुनिंबाची पाने, काड्या वाटून त्याचा रस पिणे हे उन्हाळ्यातील विविध आजारांवर प्रतिबंधात्मक उपाय आहे. मूळव्याध व पोटातील कृमींवर, मधुमेह नियंत्रित करण्यासाठी, दात स्वच्छ व बळकट करण्यासाठी, रक्तशुद्धीसाठी कडुनिंब उपयोगी येतो. कडुनिंबाची झाडे हवा शुद्ध ठेवण्याच्याही कामी येतात.
साहित्य - कडुनिंबाची कोवळी पाने, फुले, मीठ, जिरेपूड, मिरेपूड, हिंग, गूळ.
कृती - वरील सर्व साहित्य एकत्रित वाटून त्याची गोळी बनवून अनाशापोटी प्राशन करणे.
 
टीप - १. पाने तुपावर परतूनदेखील वापरता येतील.
२. लहान मुलांना खाऊ घालण्यासाठी थोडी हरभऱ्याची भिजलेली डाळ वाटणात घालता येईल.
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानाच्या पार्श्‍वभूमीवर एक सांगावेसे वाटते, आपल्या या आरोग्यदायी प्रथा, संस्कृती, आहारशास्त्र, आयुर्वेद यांचा आदर करूयात. नवीन वर्षाची सुरुवात कोणत्याही तात्पुरत्या परिणामांपेक्षा कायमस्वरूपी आरोग्यदायी जीवनशैलीचे अनुकरण करण्याच्या संकल्पाने करूयात.

loading image