हेल्दी रेसिपी : आहारातील सहकलाकार

शिल्पा परांडेकर
Tuesday, 3 March 2020

ताटातील (पानाची) डाव्या बाजूस आकर्षक, रंगीबिरंगी, चटकदार, चविष्ट आणि षड् रसांनी (गोड, आंबट, खारट, तिखट, तुरट, कडू) युक्त व स्वास्थ्यकारक पदार्थ असतात. ताटात डाव्या बाजूला वाढले जाणारे पदार्थ म्हणजे चटणी, कोशिंबिरी, पंचामृत, पचडी वगैरे. एखाद्या कथेतील रंजकता वाढवण्यासाठी तसेच कथेला पुढे नेण्यासाठी कलाकारासोबतच सहकलाकारांची आवश्यकता असते.

ताटातील (पानाची) डाव्या बाजूस आकर्षक, रंगीबिरंगी, चटकदार, चविष्ट आणि षड् रसांनी (गोड, आंबट, खारट, तिखट, तुरट, कडू) युक्त व स्वास्थ्यकारक पदार्थ असतात. ताटात डाव्या बाजूला वाढले जाणारे पदार्थ म्हणजे चटणी, कोशिंबिरी, पंचामृत, पचडी वगैरे. एखाद्या कथेतील रंजकता वाढवण्यासाठी तसेच कथेला पुढे नेण्यासाठी कलाकारासोबतच सहकलाकारांची आवश्यकता असते. अगदी तसेच काहीसे महत्त्व या ताटातील डाव्या बाजूंच्या पदार्थांचे आहे. ते भोजन अधिक चविष्ट व पाचक बनवतात, जेवणाऱ्याला आनंद देतात, आजारपणात तोंडाला रुची देतात. मात्र, त्यांचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास ते स्वास्थ्यकारक नसते. त्यामुळे हे पदार्थ ताटाच्या डाव्या बाजूला वाढावेत, असे आयुर्वेद व प्राचीन आहारशास्त्रे सूचित करतात. सर्वसामान्य भाषेत ‘तोंडी लावण्याचे’ पदार्थ म्हणून आपण त्यांना ओळखतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जवळपास प्रत्येक समाजाच्या, देशांच्या खाद्यसंस्कृतीत स्वतःचे असे काही खास तोंडी लावण्याचे पदार्थ आढळतात. आपल्या महाराष्ट्रात असे तोंडी लावण्याचे असंख्य पदार्थ आहेत. ते चटकदार, चविष्ट व आरोग्यदायी आहेत. प्रदेशानुसार, ऋतूनुसार अनेक प्रकारच्या चटण्या आपल्याकडे आहेत. उदा. जवसाची चटणी स्त्रियांसाठी उपयुक्त, ओमेगा-३ फॅटी अॅसिडयुक्त असते. तिच गोष्ट कोशिंबिरी, पचडी, वगैरेंची.

कोशिंबिरींमध्ये विविध प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या, डाळी, फळे वगैरेंचा समावेश होतो. सध्या जवस, मेथी किंवा असे अनेक घटकपदार्थ ‘सुपर फुड्स’ म्हणून नव्याने ‘डाएट’मध्ये समाविष्ट होत आहेत, ही चांगलीच गोष्ट आहे. परंतु, ताटातील या छोट्याश्‍या घटकाचा किती खोलवर विचार आपल्या आहारशास्त्रात व खाद्यसंस्कृतीत पूर्वीच झालाय, हे आपण समजून घ्यायला हवे. आज आपल्याकडे तोंडी लावण्यासाठी ‘मेथ्याची चटणी’ आहे. पाहूयात रेसिपी.

साहित्य - मेथ्या (मेथीचे दाणे), जिरे (अंदाजे), चवीनुसार मीठ, चवीनुसार तिखट.
कृती - १. मेथ्या व जिरे भाजून अर्धवट वाटून घेणे.
२. तिखट व मीठ घालून एकत्रित वाटणे.

मेथ्यांचे फायदे - कडू, तिखट चवीच्या मेथ्या अरुची दूर करून भूक वाढविण्यासाठी व आहाराचे पचन करण्यासाठी उपयुक्त ठरतात. केशवृद्धीसाठी, वजन घटवणे, रक्तातील साखर कमी करणे, कोलेस्टरॉल कमी करणे, हाडांच्या मजबुतीसाठी, कंबरदुखी यांकरिता मेथ्या उपयुक्त ठरतात. तसेच स्त्रियांसाठी, वृद्धांसाठी, बाळंतिणीसाठीही मेथ्या लाभदायक आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shilpa parandekar on Healthy recipes