हेल्दी रेसिपी : इसका न कोई अंत है...

शिल्पा परांडेकर
Tuesday, 29 December 2020

आपले पारंपरिक पदार्थ हे ‘हेल्दी’च आहेत आणि त्यांचा कोणत्याही कारणाने त्याग करण्यापेक्षा ते योग्य पद्धतीने व योग्य प्रकारे खाल्ल्यास आपले आरोग्य निश्चितच तंदुरुस्त राहू शकते. हीच विचारधारा घेऊन आम्ही मागच्या वर्षी ही लेखमाला सुरू केली. आपण सर्वांनी या विचारधारेला अभूतपूर्व प्रतिसाद दिलात. काहींनी हे पदार्थ आम्ही करून पाहिल्याचे व त्यांच्या कुटुंबीयांना आवडल्याचे सांगितले. हे किंवा यांसारखे पदार्थ, ही विचारधारा पुन्हा आपल्या जीवनशैलीत रुळायला वेळ लागेल, हे नक्की.

आपले पारंपरिक पदार्थ हे ‘हेल्दी’च आहेत आणि त्यांचा कोणत्याही कारणाने त्याग करण्यापेक्षा ते योग्य पद्धतीने व योग्य प्रकारे खाल्ल्यास आपले आरोग्य निश्चितच तंदुरुस्त राहू शकते. हीच विचारधारा घेऊन आम्ही मागच्या वर्षी ही लेखमाला सुरू केली. आपण सर्वांनी या विचारधारेला अभूतपूर्व प्रतिसाद दिलात. काहींनी हे पदार्थ आम्ही करून पाहिल्याचे व त्यांच्या कुटुंबीयांना आवडल्याचे सांगितले. हे किंवा यांसारखे पदार्थ, ही विचारधारा पुन्हा आपल्या जीवनशैलीत रुळायला वेळ लागेल, हे नक्की. मात्र, आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास हे अशक्य नाही. केवळ ‘#आठवणीतला पदार्थ’, ‘#गावरान’ किंवा ‘#चुलीवरचे जेवण’ ‘#vocalforlocal’ असे मिरवण्याने आपण हेल्दी नाही राहणार.

गरज आहे ऋतुमानानुसार आहार, स्थानिक अन्नघटकांना आहारात प्राधान्य, पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता उत्पादित केलेले अन्नघटक यांचा आहारशैलीत समावेश करण्याची. कोण्या परदेशी संस्थेच्या प्रमाणपत्राची वा ‘मॅजिक मसाला’, ‘इम्युनिटी बूस्टर’, सुदृढ होण्यासाठी कोणते तरी ‘ड्रिंक’ किंवा ‘फॅन्सी डाएट’ अशांसारख्या मार्केटिंग ‘ट्रेंड’च्या जाळ्यात अडकण्यापूर्वी एकदा निश्चित विचार करावा, की हे खरेच गरजेचे आहे का? हीच बाब झटपट होणारे पदार्थ किंवा कोणतेही ‘पॅकेज्ड’ पदार्थांची. हे कधीतरी घेणे ठीक आहे, पण यांच्या आहारी जाणे योग्य नाही, या सर्वांचा विचार वेळोवेळी आपण या लेखमालेत केलाच आहे. ही लेखमाला येथे संपत असली, तरी आता या लेखमालेची विचारधारा आपण सर्वजण मिळून पुढे नेऊयात. कारण ‘अंत ही तो आरंभ है, इसका ना कोई अंत है...’

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आपण सुरुवात एका पारंपारिक, गोड व पौष्टिक पदार्थाने केली होती आणि निरोपही पारंपारिक, गोड व पौष्टिक कोंडोळे या पदार्थानेच घेऊयात.

प्रकार - १
साहित्य -
राळे (राळ्याचे तांदूळ/भादले), मीठ, गूळ, गव्हाचे पीठ, तेल, वेलची-जायफळ-दालचिनी पूड (ऐच्छिक).
कृती - राळ्याचा नेहमीप्रमाणे भात करून घ्यावा.
भात मोकळा करून कुस्करून त्यात मावेल इतके पीठ व चवीनुसार गूळ, वेलची-जायफळ-दालचिनी पूड घालून उंडा मळून घ्यावा.
थालीपीठाप्रमाणे थापून कोंडोळे तेलावर खरपूस भाजून घ्यावेत.
मध, फळाचे काप व राबडीसोबत हे कोंडोळे छान लागतात.
टीप - मैद्याच्या ‘पॅन केक’ला हे कोंडोळे हा अधिक पौष्टिक पर्याय आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रकार - २
साहित्य -
राळ्याचा भात, गव्हाचे पीठ, आले-मिरची-लसूण वाटण, कांद्याची पात किंवा कोणतीही आवडती भाजी (ऐच्छिक), मीठ, तेल, किंचित साखर/गूळ.
कृती - वरीलप्रमाणे मावेल इतके पीठ व बाकी सर्व जिन्नस घालून कोंडोळे करावेत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Write Shilpa Parandekar on Healthy Recipe