उस्मानाबादच्या ‘उस्मान’चे गुलाबजाम 

उस्मानाबादच्या ‘उस्मान’चे गुलाबजाम 

तुम्ही कधी उस्मानाबादच्या जवळपास गेलात किंवा आई भवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरला गेला, तर वाट वाकडी करून उस्मानाबादला नक्की जा... कशाला, तर उस्मानभाईंचे गुलाबजाम खायला! महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उत्तम दर्जाचे गुलाबजाम मिळतात, पण उस्मानभाईंकडे गुलाबजाम खाल्ल्यानंतर तुम्ही कायमचे प्रेमात पडाल ही गॅरंटी. 

साखर, खवा आणि अगदी नावाला थोडा मैदा... गुलाबजाम करताना सर्व हलवाई लोक वापरतात तेच जिन्नस. पण गुलाबजामचा स्वाद आणि रुप असं की विचारू नका. शेवटी जिन्नस, प्रमाण आणि कृती हे सगळं एक समान असलं, तरीही अनेक वर्षांची परंपरा, गावचं पाणी, त्या जागेचा गुण आणि करणाऱ्याच्या हाताची चव या गोष्टीही परिणाम करतातच. उस्मानच्या गुलाबजामचा आस्वाद घेतल्यानंतर ‘टेस्ट’ आणि ‘फिल’मध्ये नेमका हाच फरक जाणवतो. 

उस्मान इस्माइल निचलकर हे या प्रसिद्ध गुलाबजामचे निर्माते. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी उस्मानाबादच्या एसटी स्टँडसमोरच्या एका शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये त्यांनी ‘उस्मान टी हाऊस’ सुरू केलं. आता उस्मानाबादमध्ये तीन-चार शाखा झाल्या असाव्यात. चहापेक्षा गुलाबजाम आणि पेढेच अधिक लोकप्रिय. त्यातही गुलाबजाम एकदम बिनतोड. मी उस्मानाबादला गेल्यावर प्रत्येक वेळी गुलाबजामचा आस्वाद घेतला. कोणी जाणार असं कळलं, तर त्याच्याकडून गुलाबजाम घरी मागविले देखील. कोणत्याही गावात चहा-नाश्त्याच्या सेंटरमध्ये गेल्यानंतर दृष्टीस पडेल, असं एकदम टिपिकल वातावरण. वेगवेगळ्या परातींमध्ये निरनिराळे पदार्थ ठेवलेले. एका परातीत पेढे, दुसऱ्या परातीत चिवडा. बरण्यांमध्ये बुंदी, शेव, फरसाण आणि इतर पदार्थ. एका परातीत कांदा भज्यांचा ढीग. एका बरणीत डिंकाचे लाडू देखील विराजमान झालेले. पण इतर दुकानांपेक्षा वेगळं दृश्य म्हणजे गुलाबजामनं काठोकाठ भरलेली एक भली मोठी लोखंडी कढई. गुलाबजामकडं पाहिल्यानंतरच प्रेमात पडायला होतं... 

उस्मानच्या गुलाबजामची खासियत म्हणजे आकाराला थोडे मोठे, लांबट गोल आकाराचे. प्रचंड हलकेफुलके आणि नाजूक. एका प्लेटमध्ये गुलाबजाम समोर आल्यानंतर कधी खातोय, असं होतं. गुलाबजाम इतके नरम आणि नाजूक की चमच्याचा स्पर्श व्हायला आणि तुकडा पडायला एकच गाठ! पाक आतापर्यंत एकदम मस्त मुरलेला. गल्ल्यावर बसलेल्या चाचांनी मला खवा, साखर आणि मैद्याचं पूर्वापार चालत आलेलं प्रमाण अगदी कोणताही आडपडदा न ठेवता सांगितलं. शेवटी त्यांच्यासारखी चव आपल्याला थोडीच जमणार आहे. असे गरमागरम आणि मुलायम गुलाबजाम खायला मिळणं म्हणजे एकदम स्वर्गसुख. आयुष्यात आणखी काय पाहिजे राव... तुमचं एक-दोन गुलाबजामवर समाधान होऊच शकत नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणहून उस्मानभाईंच्या गुलाबजामना मागणी असते. अनेक जण उस्मानाबादला गेल्यानंतर न विसरता गुलाबजाम पार्सल घेऊन जातात. 

नववर्ष आपल्या सर्वांना उस्मानभाईंच्या गुलाबजामसारखं गोड, मुलायम आणि एकदम हलकफुलकं जावो, याच मनापासून शुभेच्छा... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com