जामखेडची उंबराची (मोदक) आमटी

जामखेडची उंबराची (मोदक) आमटी
जामखेडची उंबराची (मोदक) आमटीsakal

मागे रोहित पवार यांच्या निवडणुकीच्या निमितानं मी आणि विश्वनाथ कर्जत-जामखेडला मतदारसंघात गेलो होतो. जामखेडला प्रा. राम शिंदे यांची भेट झाली. रोहित पवार यांची भेट होणार नव्हती. मग पुढं कर्जतला जाण्यापूर्वी कुठं तरी जेवावं, असा विचार सुरू होता. कर्जतला जाताना एकदम छोट्याशा हॉटेलमध्ये थांबलो. मागं जामखेडच्या उंबराच्या भाजीबद्दल खूप ऐकलं होतं. हॉटेलमधील मेन्यू ऐकला तेव्हा त्यात उंबराच्या भाजीचा समावेश होता.

उंबराची भाजी ऑर्डर केली. बेसन आणि ज्वारी किंवा गव्हाचं पीठ एकत्र करून त्यापासून बनविलेले मोदकसदृश पदार्थ. त्याला तिथं उंबर म्हणत होते. त्यामध्ये सारण. आणि उंबराची ही फळं दाटसर रश्श्यामध्ये सोडून मस्त उकळी येईपर्यंत गरम करतात. म्हणजे एकीकडं रस्सा पण दाट होतो आणि दुसरीकडं उंबराची फळंदेखील शिजून तयार होतात. ही उंबराची भाजी किंवा आमटी. त्यालाच काही जण मोदकांची आमटी किंवा भाजीही म्हणतात.

जामखेडमधील ही उंबराची आमटी मला आवडली, पण अगदी खूप विशेष नाही. उगीचच अधिक मसालेदार वाटली. नंतर मग कर्जतहून येताना राशीनमधील बाजारात प्रसिद्ध मटण खानावळी दिसल्या. मटण खाणावळीत आस्वाद घेण्यासाठी पुन्हा कधीतरी येऊ, असं नियोजन करीत आम्ही मित्रवर्य सावता नवलेच्या सोबत भिगवणमधील जगदंबमध्ये चिलापी मच्छीवर ताव मारून पुण्याला परतलो. उंबराच्या भाजीचा विषय तिथंच मिटला.

मध्यंतरी माझी शाळेतली मैत्रीण धनश्री क्षीरसागरचा फोन आला. तिनं सांगितलं की, आशिष, आज घरी मोदकांची आमटी केलीय. तुला देते आणून. धनश्रीचं मूळ गाव जामखेड की त्या परिसरातचं कुठं तरी आहे. त्यामुळं मोदक नि उंबर यातलं साधर्म्य डोळ्यासमोर दिसायला लागलं. फार प्रतीक्षा न करावी लागता मोदकांची आमटी आली. धनश्री आता मोदकांची आमटी आणि उंबराची भाजी यांच्यात काही विशेष फरक नाही, हे मला आमटीचा आस्वाद घेतल्यानंतर समजलं. जामखेडच्या त्या हॉटेलात खाल्लेली उंबराची भाजी आणि धनश्रीनं केलेली मोदकांची आमटी यात जमीन अस्मानाचा फरक होता. धनश्रीनं केलेल्या मोदकांच्या आमटीची चव आजही आठवते.

हरभरा डाळ आणि आणखी कोणतं तरी पीठ मिक्स करून बनविलेले मोदक. मोदकांमध्ये एक नंबरचं सारण. किसून भाजलेलं खोबरं, शेंगादाणे, तीळ आणि मीठमसाला यांचं सारण. खोबरं भाजण्यामुळं आलेला खमंगपणा प्रत्येक घासाला जाणवणारा. हे सारण घातलेले मोदक आमटीत सोडलेले मोदक. कांदा-लसणाची पेस्ट, खोबरं, तीळ-दाण्याचं कूट यांच्यापासून बनविलेली आमटी. जेवणातल्या नेहमीच्या आमटीपेक्षा थोडीशी अधिक जाडसर आणि पंजाबी भाजीच्या ग्रेव्हीपेक्षा थोडी पातळ. मधली स्टेज. वैशिष्ट्य असं की, भाजलेल्या सुक्या खोबऱ्याची चव ठायीठायी जाणवणारी. गोळ्यांची आमटी/सांबार, उंबराची भाजी/आमटी आणि भज्यांच्या आमटीनंतर घेतलेला मोदकांच्या आमटीचा आस्वाद ही मोदकांची आमटी मात्र, माझ्या कायम लक्षात राहिली.

भाकरी किंवा पोळीबरोबर न खाता वाफाळत्या भाताबरोबर खाल्लेली मोदकांची आमटी म्हणजे फक्त स्वर्गसुख. ती देखील अशा पद्धतीनं अचानक सकाळी सकाळी आयती आमटी मिळाली, तर स्वर्गसुखापेक्षाही थोडं अधिकच सुखकर.

आयुष्य सुंदर आहे... फक्त अधूनमधून अशी मोदकांची आमटी मिळाली पाहिजे आणि वाफाळत्या भातासह मैफल जमली पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com