खेकड्यांचा ‘निसर्ग’ - क्रॅब आणि लॉबस्टर फेस्टिव्हल

सुवर्णा येनपुरे-कामठे
Friday, 20 December 2019

सी-फूड खाणाऱ्या पुणेकरांची संख्या वाढत आहेत, तसेच सी-फूड मिळणारी ठिकाणेही अनेक आहेत. परंतु आपल्याला आवडणारा मासा, खेकडा आपण निवडावा आणि आपल्याला हव्या असलेल्या पद्धतीने तयार करून आपल्याला सर्व्ह केला जावा, असे ठिकाण मिळणे फारच दुर्मीळ! ‘निसर्ग’ हॉटेल मात्र आपली ही भूक भागवते.

वीकएण्ड हॉटेल - सुवर्णा येनपुरे-कामठे
सी-फूड खाणाऱ्या पुणेकरांची संख्या वाढत आहेत, तसेच सी-फूड मिळणारी ठिकाणेही अनेक आहेत. परंतु आपल्याला आवडणारा मासा, खेकडा आपण निवडावा आणि आपल्याला हव्या असलेल्या पद्धतीने तयार करून आपल्याला सर्व्ह केला जावा, असे ठिकाण मिळणे फारच दुर्मीळ! ‘निसर्ग’ हॉटेल मात्र आपली ही भूक भागवते. कर्वे रस्ता, नळ स्टॉपजवळ असलेल्या निसर्ग हॉटेलमध्ये सध्या ‘क्रॅब आणि लॉबस्टर फेस्टिव्हल’ सुरू आहे. या १५ जानेवारीपर्यंत सुरू असणाऱ्या महोत्सवामध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे खेकडे, मासे खायलाच नव्हे, तर पाहायलादेखील मिळतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

समुद्रात खेकडे कसे असतात, ते जिवंत असताना कसे दिसतात याचे एक प्रदर्शनच या महोत्सवात पाहायला मिळते. हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर दर्शनी भागात विविध मासे, जिवंत खेकडे ठेवलेले पाहायला मिळतात. पापलेट, सुरमई, रावस, खेकडे, लॉबस्टर, मोठी कोळंबी, टायगर प्रॉन्स याचे अनेक प्रकार इथे ठेवलेले असतात. आपल्याला कोणता मासा, खेकडा हवा आहे हे आपल्या आवडीनुसार आपण त्यांना सांगू शकतो. त्यानंतर तो कोणत्या पद्धतीने शिजवलेला खायला आवडेल, हेही आपण सांगू शकतो. जसे की, तवा फ्राय, तंदूर. निवडलेला खेकडा किंवा मासा तयार होऊन येईपर्यंत तुम्ही अन्य डिश मागवू शकता. स्टार्टर म्हणून मागवली जाणारी ‘बोंबील कोळीवाडा’ ही डिश इथे सर्वाधिक प्रसिद्ध आहे. मासे न खाता येणाऱ्यांसाठीही इथे बोनलेस माशांची सोय आहे. अनेक पुणेकर ‘निसर्ग’मध्ये आल्यानंतर मासे खायला शिकले आहेत, असे हॉटेलचे मॅनेजर भगवान शिंदे आवर्जून सांगतात. 

तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी स्पायसी, स्पायसी आणि जास्त स्पायसी असे प्रकार तुम्ही निवडू शकता. सुरमई चटपटा (तंदूर - हिरव्या मसाल्यात केलेले), क्रॅब तवा (मसाला फ्राय), प्रॉन्स चटपटा (तंदूर - हिरव्या मसाल्यात केलेले), प्रॉन्स बटर गार्लिक (चायनीज - थोडेसे स्वीटमध्ये येणारे), लॉबस्टर चिरीमिरी, खापरी पापलेट, प्रॉन्स बिर्याणी असे अनेक प्रकार इथे तुम्हाला खायला मिळतात. 

कोणताही पदार्थ निवडला आणि त्याची स्पायसी लेव्हल तुम्ही निवडलीत. तरी त्या मसाल्यांमुळे जळजळ खाणाऱ्याला कुठेच जाणवत नाही. बऱ्याच वेळा आपण बाहेर मासे खातो, मात्र नंतर त्याचा त्रास होतो. इथे, तीही काळजी घेतली जाते. 

शिंदे म्हणाले, ‘इथे येणारा ग्राहकवर्ग हा एकदा आल्यावर कायमचा  होतो. अनेक वर्षांपासून इथली चव बदललेली नसल्याचे कायमचे ग्राहक सांगतात. मासे  तुम्हाला खूप ठिकाणी मिळतील. सर्वच मासे शिजवण्यापूर्वी एकसारखेच असतात. परंतु आम्ही मसाल्यावर काम करतो. मसाला जेवढा चविष्ट तेवढे मासे खायला मजा येते. योग्य चव आणि त्या चवीमध्ये ठेवलेले सातत्य यांमुळे आमचा ग्राहक टिकून आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crab and lobster festival