फूडहंट : लॉकडाऊनमध्ये ट्रेंड 'डालगोना कॉफी'चा

Coffee
Coffee

तुम्हाला बाहेर पडून मस्तपैकी पाणीपुरी खावी किंवा बटर चिकनवर ताव मारावा, अशी इच्छा असणार. मात्र, कोरोनामुळे सर्वजण लॉकडाऊन आहेत आणि बाहेर पडण्याचा विचारही धोकादायक आहे. याकाळात आपल्या खवय्येगिरीला स्वयंपाकघरात चांगलाच वाव मिळत असेल. आम्ही आज यामध्ये आणखी भर घालणार आहोत, ती डालगोना कॉफीची!

अनेकांनी या कॉफीबद्दल ऐकलं असेल किंवा या कॉफीचा फोटो किंवा व्हिडिओ अनेकांच्या व्हाट्सॲप स्टेटस, इन्स्टाग्राम स्टोरीज, फेसबुक पोस्ट्स किंवा ट्विटरवर नक्की बघितला असेल. टिकटॉकवरही ‘डालगोना कॉफी चॅलेंज’ जोरदार सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात ही कॉफी अधिकच फेमस आणि ट्रेंडमध्ये आल्याचे लक्षात येते.

या काळात अनेक जण आपापल्या पाककौशल्याला उजाळा देत आहेत किंवा नवीन डिशेस बनवायला शिकत आहेत. या सगळ्या प्रयोगांचे फोटो आणि व्हिडिओज आपल्याला सोशल मीडियावर बघायला मिळतात. यामध्येच जास्तीत जास्त फोटोंची बाजी मारली आहे, ती ‘डालगोना कॉफी’ने. इन्स्टाग्रामवर डालगोना कॉफीच्या दोन लाखाहून जास्त पोस्ट्स बघायला मिळतात. गूगल ट्रेंड्समध्ये देखील ही कॉफी अग्रेसर आहे. यामधून या कॉफीची जगभर झालेली प्रसिद्धी लक्षात येते.

डालगोना कॉफी म्हणजे मूळ साऊथ कोरियन पद्धतीची कॉफी आहे. पूर्वीच्या एका कोरियन कॅण्डीपासून ही रेसिपी प्रेरित आहे. यामधले घटक अगदी सामान्य. आपले नेहमीचेच आणि करण्याची पद्धतही तशी सोपी, फक्त वेळ खाणारी. मात्र, सध्या सगळ्यांना वेळच वेळ असल्यामुळे ही कॉफी इतकी प्रसिद्ध झाली आहे, असे म्हणायला हरकत नाही. अनेक लोक याला ‘क्वारंटाइन कॉफी’ देखील म्हणत आहे.

आजच्या चिंतेच्या वादळात, ही कॉफी वेगळाच आनंद देऊन जाते. या कॉफीचा खरा यूएसपी म्हणजे तिचे प्रेझेंटेशन. समान प्रमाणात साखर आणि इन्स्टंट कॉफी एका भांड्यात घ्यायची. दोन चमचे साखर आणि २ चमचे कॉफी घेतली असल्यास तेवढेच थोडे गरम पाणी टाकून सर्व एकत्र करायचे. एकत्र, करून हे मिश्रण फोमसारखे हलके होत नाही तोपर्यंत व्हिस्कने फेटायचे. व्हिस्क नसेल, तर चमच्याने देखील हे मिश्रण फेटू शकता. खूप वेळ फेटत राहिला की डार्क ब्राउन रंग फिका होताना लक्षात येईल आणि हे मिश्रण पण अतिशय हलके होऊन फेस/फोमसारखे जाणवेल. हे तयार झाल्यावर एका काचेच्या ग्लासामध्ये थोडा बर्फ टाकून त्यावर दूध ओतायचे आणि ग्लास अर्धा भरला की डालगोना कॉफीचे हे मिश्रण वर टाकायचे. एवढीच ही पाककृती.

यावर हवे असल्यास कॉफी बीन्स, कोको पावडर किंवा चॉकलेट बिस्किटांचा चुऱ्याने देखील तुम्ही सजवू शकता आणि लगेचच फोटो काढून सोशल मीडियावर टाकू शकता. चव म्हणायची झाली तर नॉर्मल कोल्ड कॉफीपेक्षा फार काही वेगळी नाही. पण इतकी आकर्षक कॉफी स्वतः बनवल्याचा वेगळाच आनंद मिळतो.   

एकीकडे डालगोना कॉफीचा उदो उदो चालला असताना अनेक पुणेकर म्हणताहेत, की अशी फेटून कॉफी तर आम्ही अनेक वर्ष बनवत आहोत. फरक एवढाच की गार दुधाच्या ऐवजी फक्त गरम दूध टाकतो. यामुळे देखील वेगवेगळे जोक्स आणि मिम्सचा ऊत आलेला आहे. काहीही असो ही कॉफी बनवणे म्हणजे मस्त टाइमपास आहे आणि कधीतरी ट्रेंडिंग गोष्टींमध्ये आपण सामील झल्यास त्यात काय वाईट आहे?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com