लॉकडाउनमध्ये वाढतोय कुकिंगचा उत्साह! 

नेहा मुळे 
Friday, 24 April 2020

काहीजण संपूर्ण सात्त्विक थाळी बनवत आहेत, तर काही जण वेगवेगळे डेझर्ट्स. स्वयंपाकात केलेल्या नवनवीन प्रयोगांचे फोटो व्हॉटस्ॲप, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पडत आहेत. 

आपण कल्पना करणार नाही, असे नवनवीन पदार्थ लोक बनवत आहेत. वाढत्या व्यापामुळे घरी बनविणे सोडून दिलेल्या पदार्थांचीही ‘घरवापसी’ होताना दिसते आहे. आर्श्‍चकारकरित्या कुकिंग ट्रेंड वाढतच चाललाय. काहीजण संपूर्ण सात्त्विक थाळी बनवत आहेत, तर काही जण वेगवेगळे डेझर्ट्स. स्वयंपाकात केलेल्या नवनवीन प्रयोगांचे फोटो व्हॉटस्ॲप, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पडत आहेत. गेल्या आणि या आठवड्यातील काही कुकिंग ट्रेंडस् खालीलप्रमाणे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

१. टुटीफ्रुटी - टुटीफ्रुटी ही काही लज्जतदार डिश नव्हे. का कुणाच ठाऊक, पण अनेक जण घरी टुटीफ्रुटी करताना दिसतात. ती सामान्यतः कच्च्या पपईपासून बनवली जाते, पण पुणेकर सध्या कलिंगडाच्या पांढऱ्या भागापासून विविध रंगी टुटीफ्रुटी बनवताना दिसत आहेत. 

२. डोनट्स - मॅड ओव्हर डोनट्समुळे डोनट्सचा अनेक जणांना आणि खासकरून बच्चे कंपनीला वेड लागलेय. म्हणूनच काही जण डोनट्स घरी बनवून त्यावर विविध टॉपिंग्सचे प्रयोग करताना दिसत आहेत. 

३. हमस, पिटा ब्रेड, फलाफल आणि श्वॉर्मा - मोमोज प्रमाणेच तरुणांमध्ये सध्या श्वॉर्मा आणि इतर लेबनीज पदार्थांची क्रेझ आहे. लेबनीज फूड हे हेल्दी देखील मानले जाते. अनेक जण हमस, पिटा ब्रेड, फलाफल घरीच बनवत आहेत. हे सर्व पदार्थ केले, तर त्याचेच सॅलड किंवा रॅप्सदेखील बनवत आहेत. 

४. रसमलई - रसमलई आणि इतर बंगाली मिठाई साधारणपणे मिठाईच्या दुकानातूनच आणली जाते. सणासुदीला अंगूर आणून घरी बनवलेल्या रबडी/बासुंदीमध्ये मिसळणे तुम्ही अनुभवले असेल. मात्र, पूर्ण रसमलई किंवा रसगुल्ला फ्रॉम स्क्रॅच बनवले आहे, असा प्रसंग दुर्मिळच असेल. लॉकडाउनच्या निमित्ताने बहुसंख्य जण आपली ही आवडती मिठाई पूर्णपणे घरी बनवत आहेत. 

५. सामोसे आणि कचोरी - मिठाईवाल्याकडे मिळणारा सामोसा, कचोरी हा अनेकांचा संध्याकाळचा ठरलेला नाष्टा. लॉकडाउनमुळे संध्याकाळच्या वेळेला पोहे, उपीट किंवा चिवडा, फरसाण खाऊन कंटाळा आला आहेच. म्हणूनच अनेक जण सामोसे, कचोरी बनवत आहेत. कोणी पंजाबी सामोसे बनवत आहेत, तर काहीजण मिनी सामोसे. शेगाव स्टाईल कचोरी, राजस्थानी कचोरी हे देखील बनवायचे प्रयत्न सुरू आहेत. 

६. वाळवण - लहानपणी घरी गव्हाचा चीक आणि त्यापासून केलेल्या कुर्डया, बटाट्याचा किस, साबुदाण्याचे पापड, आणि इतर अनेक प्रकारचे पापड आज्जी घरी करतानाच आठवते. यासर्व गोष्टी घरी बनवणे थांबलेच आहे. लॉकडाउनच्या काळात मात्र अनेकजण वाळवण करत आहेत. वेळ, कडक ऊन आणि मदतीला असणारे हात उपलब्ध असल्यामुळे अनेक गच्ची आणि बाल्कनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची वाळवणे दिसत आहेत. यानिमित्ताने अनेकांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे.. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: excitement of cooking in the lockdown