esakal | खाद्यभ्रमंती : ‘गोरसपाक’
sakal

बोलून बातमी शोधा

खाद्यभ्रमंती : ‘गोरसपाक’

खाद्यभ्रमंती : ‘गोरसपाक’

sakal_logo
By
आशिष चांदोरकर

‘दाने दाने पे लिखा है, खानेवाले का नाम...’ याचा प्रत्यय मला अनेकदा आलाय. म्हणजे कधी कधी ध्यानीमनी नसताना अनेकवेळा काही पदार्थ एकदम अचानक समोर येतात नि एकदा त्याचा स्वाद घेतला, की आपण कायमचे त्या पदार्थाच्या प्रेमात पडतो. माझ्या बाबतीत तर अनेकदा असं झालंय.

असंच मागं मी ‘साम मराठी’मध्ये असताना माझा रूममेट आणि पत्रकारिता अभ्यासक्रमातील सहअध्यायी प्रफुल्ल साळुंखे यानं एक बिस्किटचा पुडा काढला आणि ते बिस्कीट घेण्यासाठी मला आग्रह करू लागला. कसलं बिस्कीट आहे, असं विचारल्यानंतर मला म्हटला की, अरे ‘गोरसपाक’ आहे. तरी मला काही कळेना. मी म्हटलं, ‘कसला पाक? काय आहे नेमकं?’ तेव्हा मग त्यानं सगळं समजावून सांगितलं.

वर्ध्यामधील गोरस भांडार नामक संस्था ‘गोरसपाक’ नावानं बिस्कीट बनविते. हल्ली कुकीज म्हणून जो प्रकार भाव खातोय, तशाच प्रकारची (खरं तर त्यापेक्षा लय भारी) ही बिस्किटं. ‘गोरसपाक’ तयार करणारी संस्था म्हणजे गोरस भांडार. महात्मा गांधी, विनोबा भावे आणि जमनालाल बजाज यांनी १९३१मध्ये गोरस भांडारची स्थापना केली. गोपालन हा त्या संस्थेचा प्रमुख उद्देश. त्यानंतर दूध संकलन आणि दूध संकलन वाढल्यानंतर त्यापासून विविध पदार्थांची निर्मिती असा प्रवास होत गेला. त्या प्रवासात ‘गोरसपाक’ नावाच्या स्वर्गसुख देणाऱ्या पदार्थाची निर्मिती झाली.

गव्हाचं पीठ, हरभरा डाळीचं पीठ, रवा, पिठीसाखर, भरपूर सुकामेवा, गाईचं दूध आणि भरपूर प्रमाणात गाईचं तूप... गोरसपाक म्हणजे या पदार्थांपासून तयार केलेला एकदम लाजवाब नि वरच्या दर्जाचा पदार्थ. प्रफुल्लनं आग्रह केल्यानंतर मी जेव्हा गोरसपाकचा पहिला घास खाल्ला तो क्षण आणि ती चव आजही लक्षात आहे. गाईचं दूध आणि तूप इतक्या प्रमाणात असतं, की त्याचा स्वाद क्षणोक्षणी जाणवत राहतो. आणि अधूनमधून दाताखाली येणारे सुकामेव्याचे तुकडे ‘गोरसपाक’चा आनंद द्विगुणित करतात.

मी नंतर जेव्हा जेव्हा वर्ध्याला गेलो किंवा विदर्भात गेलो, तेव्हा ‘गोरसपाक’ आवर्जून खरेदी केला. पुण्यात मिळणारी कयानीची शृजबेरीची बिस्किटं असतील किंवा हैदराबादला मिळणाऱ्या कराची बेकरीची फ्रूट बिस्किटं किंवा उस्मानिया बिस्किटं असतील, त्याच्या तोडीस तोड ‘गोरसपाक’ आहे.

पण कदाचित फार मार्केटिंग होत नसल्यामुळं ‘गोरसपाक’ ही बिस्किटं फार कोणाला माहिती नसतील. पण आता हा ‘गोरसपाक’ ॲमेझॉनवरही उपलब्ध आहे. त्यामुळं तुम्हाला घरबसल्या ‘गोरसपाक’चा आस्वाद घ्यायचा असेल, तर नक्की ऑर्डर करा. बाकीची अनेक बिस्किटं, कुकीज आणि तत्सम प्रकार विसरूनच जाल!

loading image
go to top