esakal | घरी पार्टीचा प्लॅन करताय? 'एग-पोटॅटो कबाब'ने करा पाहुण्यांना खुश
sakal

बोलून बातमी शोधा

घरी पार्टीचा प्लॅन करताय? 'एग-पोटॅटो कबाब'ने करा पाहुण्यांना खुश

घरी पार्टीचा प्लॅन करताय? 'एग-पोटॅटो कबाब'ने करा पाहुण्यांना खुश

sakal_logo
By
शर्वरी जोशी

सध्या लॉकडाउनचा काळ असल्यामुळे पार्टी, लग्नसोहळे, फंक्शन या सगळ्याचं प्रमाण अत्यंत कमी झालं आहे. खरं तर लॉकडाउनच्या अटीदेखील शिथील केल्या असून मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नसोहळे, पार्टी यांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कोरोनाची भीती वाटत असल्यामुळे अनेक जण हे समारंभ टाळण्याचा प्रयत्न करतात. इतकंच नाही तर अनेक जण आता घरीच पार्टी किंवा एखादं फंक्शन करु लागले आहेत. मात्र, घरी एखादा कार्यक्रम म्हटला की साधारणपणे १० ते १५ माणसं सहज जमतात. मग, या सगळ्यांच्या जेवणाची, स्नॅक्सची काही तरी सोय करावी लागते. त्यातच दरवेळी बाहेरुन आणणं शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या झेपणारंही नसतं. त्यामुळेच यावेळी घरी पार्टी असेल तर घरच्या घरीच एग पोटॅटो कबाब तयार करा आणि पाहुण्यांची मनं जिंका. (food-recipe-egg-potato-kabab-recipe)

साहित्य -

अंडी - ४

बटाटे - २

ब्रेड - ५

तिखट - ४ चमचे

मीठ - १ चमचा

गरम मसाला - २ चमचा

धणेपूड, जिरेपूड -२ चमचे

आलं-लसूण पेस्ट - १ चमचा

काळीमिरी पूड - अर्धा चमचा

तळलेला कांदा - अर्धा कप

कोथिंबीर - अर्धा कप

ब्रेडक्रम्स - १ कप

कृती -

सगळ्यात आधी ३ अंडी व २ बटाटे उकडून किसून घ्या. तयार किसामध्ये मीठ, मिरपूड, तिखट, धणे-जिरे पूड, गरम मसाला,हळद, तळलेला कांदा आणि आलं-लसूण पेस्ट टाका व छान मिक्स करुन घ्या. कबाबचं हे मिश्रण तयार झाल्यानंतर त्याचे लहान लहान गोळे करा. हे गोळे करताना मिश्रण हाताला चिकटत असेल तर थोडा तेलाचा हात घ्या. त्यानंतर या गोळ्यांना कबाबचा आकार द्या. कबाब तयार झाल्यानंतर फेटलेल्या अंड्यात ते घोळवून घ्या. त्यानंतर ब्रेडक्रम्समध्ये छान कोट करा. सगळे कबाब फेटलेलं अंड व ब्रेडक्रम्समध्ये कोट झाल्यावर त्यांना १० मिनीटे फ्रीजमध्ये ठेवा आणि त्यानंतर डीप फ्राय करा. (सुरुवातीला हाय फ्लेमवर तेल तापवून घ्या व नंतर स्लो टू मिडीअम फ्लेमवर कबाब तळून घ्या.)

loading image