ग्रीन सिग्नल - ब्रेकफास्टचे नवे डेस्टिनेशन (व्हिडिओ)

सुवर्णा येनपुरे-कामठे
Friday, 13 December 2019

आपण अनेकदा सकाळी व्यायामासाठी, फिरण्यासाठी किंवा अन्य कसल्यातरी गडबडीत घरातून निघतो खरे, मात्र ‘नाश्‍ता राजासारखा असावा,’ हेच विसरतो. सकाळी-सकाळी व्यायाम, खेळाचा सरावाला बाहेर पडणाऱ्यांसाठी आपटे रस्त्यावरील ‘ग्रीन सिग्नल’ हे ब्रेकफास्टचे नवे डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

वीकएण्ड हॉटेल - सुवर्णा येनपुरे-कामठे
आपण अनेकदा सकाळी व्यायामासाठी, फिरण्यासाठी किंवा अन्य कसल्यातरी गडबडीत घरातून निघतो खरे, मात्र ‘नाश्‍ता राजासारखा असावा,’ हेच विसरतो. सकाळी-सकाळी व्यायाम, खेळाचा सरावाला बाहेर पडणाऱ्यांसाठी आपटे रस्त्यावरील ‘ग्रीन सिग्नल’ हे ब्रेकफास्टचे नवे डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

डोक्यावर झाडाची सावली, त्याच्या पानापानांतून येणारे कोवळे ऊन आणि मध्येच घडणारे ढगांचे दर्शन अशा आकाशाच्या छताखाली बसून नाश्‍ता करायला कुणाला आवडणार नाही? ‘ग्रीन सिग्नल’ला यामुळेच खास पसंती दिली जाते आणि त्यानंतर तिथल्या पदार्थांची चव पाहून ग्राहकवर्ग पुनःपुन्हा तिथे येत राहतो. सकाळी ७.३० ते ११.३० इथे नाश्‍ता सर्व्ह केला जातो. तर ११.३० ते ३.३० दुपारचे जेवण, त्यानंतर ७.३० वाजेपर्यंत पुन्हा नाश्‍ता आणि ७.३० नंतर रात्रीचे जेवण सर्व्ह केले जाते. इथे वेळेनुसार पदार्थही बदलले जातात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

उडीद वडा सांबार, इडली, डोसा अशा दक्षिण भारतीय पदार्थांसोबत सांबार आणि चटणीबरोबर रेड गार्लिक चटणीही सर्व्ह केली जाते. महाराष्ट्रीयन नाश्‍त्यामध्ये पोहे, उपीट, वडापाव, मिसळ पाव सर्व्ह केले जातात. तसेच उत्तर भारतीय असलेले विविध पराठ्यांचे प्रकार व काँटिनेन्टल पदार्थही नाश्‍त्यामध्ये मिळतात. इथले वेगळेपण म्हणजे चहा शंकरपाळी! चहासोबत गोड व तिखट शंकरपाळी सर्व्ह केली जाते. उपवास असणाऱ्यांसाठी इथे साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा वडाही सर्व्ह केला जातो. त्याचबरोबर सीझनल फळांप्रमाणे मिल्क शेक मिळतो. नुकताच सीताफळाचा सीझन होऊन गेला तेव्हा सीताफळ मिल्क शेक उपलब्ध होता, तर आता स्टॉबेरीचा मिल्क शेक उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासाठी खास पाचगणीहून स्ट्रॉबेरी आणली जाते.

हॉटेलचे पार्टनर प्रतीक खिंवसरा म्हणाले, ‘‘पुणेकर खवय्ये आहेत. त्यांना चांगल्या ठिकाणाबरोबरच पदार्थही चविष्ट लागतात. तरच ते पुन्हा येतात. त्यामुळे हॉटेलच्या सजावटीसोबत आम्ही पदार्थांच्या चवीकडेही तेवढेच लक्ष दिले आहे. सर्वसाधारण माणूस घरात जे तूप खातो, तेच तूप आम्ही इथल्या पदार्थांसाठी वापरतो. त्यामुळे हॉटेलच्या पदार्थांमधील घरगुतीपणा ग्राहकांना जास्त भावतो. लवकरच आम्ही हेल्दी नाश्‍ताही आणणार आहोत.’’ दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठीही हे चांगले डेस्टिनेशन आहे. चांदण्या रात्री चांदण्या पाहत आपल्याला जेवणाचा आस्वाद घेता येतो. इथे स्टार्टर म्हणून सर्व्ह केल्या जाणाऱ्या शेवग्याच्या शेंगा आणि डेझर्टमधील मूगडाळीचा शिरा तर प्रत्येकाने टेस्ट केलाच पाहिजेत, तसेच एखाद्या महत्त्वाच्या कामानिमित्त मीटिंग घेत-घेत जेवायचे असल्यास किंवा नाश्‍ता करायचा असल्यासही हे ठिकाण उत्तम आहे. बंगल्यामध्ये विस्तारलेल्या वातानुकूलित खोल्यांमध्ये तुमच्या मीटिंगची सोयही करून दिली जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: green signal breakfast new destination