esakal | हेल्दी रेसिपी : अन्नसंस्काराचे वाण...
sakal

बोलून बातमी शोधा

bajari-unde

संक्रांत आली आहे. बाजरीची भाकरी, भोगीची भाजी आणि संक्रांतीचे वाण असेलच ना? या संक्रांतीला तुमच्यासोबत या ‘अन्नसंस्काराचे’ वाण लुटत आहे, अशाच एका पारंपरिक छान व सोप्या रेसिपीसोबत. आणि संक्रांत स्पेशल ‘बाजरी’देखील आहेच.

हेल्दी रेसिपी : अन्नसंस्काराचे वाण...

sakal_logo
By
शिल्पा परांडेकर

भगवान श्रीकृष्णाच्या जीवनकाळातील अनेकविध घटनांच्या विविध पैलूंमधून अनेक आशय शिकता येतात. अशीच एक घटना जीतून ‘जीवनाचे’ आणि ‘जेवणाचे’ ही सूत्र समजते.

एकदा दुर्वास ऋषी भगवान कृष्ण आणि देवी रुक्मिणीच्या क्रोधाची परीक्षा घेण्याचे ठरवतात. ते आदेश देतात, ‘द्वारकेत उपलब्ध असेल तितके दूध एकत्रित करून स्वतः रुक्मिणीने माझ्यासाठी खीर बनवावी.’ आदेशाचे पालन होते. स्वतः भगवंत व रुक्मिणी खीर वाढतात, परंतु दुर्वास ती खीर त्यांच्या अंगावर ओतण्याचा व नंतर ती त्या उभयतांनी जिभेने चाटून आपले शरीर स्वच्छ करण्याचा आदेश देतात. यानंतर दुर्वास उभयतांना भयंकर क्रोध येईल, असे आदेश देतात; पण भगवंत तर जितेंद्रिय! त्यांनी हे ओळखले होते, की त्यांची परीक्षा घेतली जात आहे. दुर्वासांनी प्रसन्न होऊन श्रीकृष्णाला वर मागण्याचा आग्रह केला. श्रीकृष्णाने ‘आजन्म आईच्या हातचे भोजन मिळावे,’ अर्थात ‘मातृहस्तेन भोजनम्’ असा वर मागितला...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आज ही गोष्ट आठवण्याचे कारण, आपल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीतील या विशिष्ट गोष्टी. पूर्वी आपल्याकडे दळणे, मळणे, कुस्करणे, वळणे, वाटणे, पिळणे, चुरणे, चाळणे (सुती कापड व हातांच्या साह्याने) अशी स्वयंपाकघरातील बरीचशी महत्त्वाची कामे स्वतःच्या हातांनी व कमीत कमी साधनांत व्हायची. खूप मायेने व आत्मीयतेने या गोष्टी केल्या जायच्या. स्वाभाविकपणे त्यांची ही हृदयातील माया त्यांच्या हातांकरवी त्या भोजनात उतरत असे. साधेच; परंतु रुचकर असे ते भोजन असायचे. हो ना? आजकाल आपला अन्नाला होणारा स्पर्शच कमी झाला आहे. मग तो स्वयंपाक करतानाचा स्पर्श असेल किंवा मग त्याचा आस्वाद घेतानाचा असेल.

संक्रांत आली आहे. बाजरीची भाकरी, भोगीची भाजी आणि संक्रांतीचे वाण असेलच ना? या संक्रांतीला तुमच्यासोबत या ‘अन्नसंस्काराचे’ वाण लुटत आहे, अशाच एका पारंपरिक छान व सोप्या रेसिपीसोबत. आणि संक्रांत स्पेशल ‘बाजरी’देखील आहेच.

बाजरीचे उंडे
साहित्य - बाजरी पीठ १ वाटी (साधारण ओलवून, सुकवून, भाजून, जाडसर दळलेले), बडीशेप पूड, मीठ

कृती - १. सर्व साहित्य एकत्रित घेऊन भाकरीप्रमाणे गरम पाण्यात पीठ मळून घेणे.
२. हाताने उंडे बनवून मध्यभागी एक छिद्र बनवणे व चाळणीत ठेवून वाफवणे.
३. उंडे फोडून वरण/दूध/गुळवणी सोबत खाणे.
(हा पदार्थ तिखट-गोड अशा २-३ प्रकारांनी केला जातो व खाण्याच्याही २-३ पद्धती आहेत.)