
लाहीपिठाचे कानवले
साहित्य : भिजवलेली कणीक, ज्वारीच्या लाह्यांचे पीठ, गूळ, सुंठ, वेलची पूड, मीठ.
कृती : लाही पीठ, गूळ, सुंठ, वेलची पूड घालून बारीक ठेचून सारण करून घ्यावे. कणकेची पारी लाटून त्यात वरील सारण भरून कानवले बनवून वाफवावेत किंवा तळावेत.
सध्या आपण आपल्या आरोग्याचा गांभीर्याने विचार करत आहेत, ही खूप चांगली बाब आहे. जीम, विविध व्यायामप्रकार, डाएट, हेल्दी फूड, ऑरगॅनिक फूड या सर्वांचा प्रमुखाने विचार होतोय, त्याचा वेळी या सर्वाचा अतिरेकही होत आहे. हेल्दी फूडच्या नावाखाली ‘अनहेल्दी’ फूडचाच मारा अधिक प्रमाणात होताना दिसतोय. अनेक प्रकारचे ‘डाएट प्लॅन’ उपलब्ध आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीने अमका एकच डाएट कसा उत्कृष्ट हे पटवण्याच्या मागे लागला आहे. शिवाय, काही डाएट प्लॅन आपल्या रोजच्या जेवणापेक्षाही खर्चिक ठरतात, याचा काहींनी नक्कीच अनुभव घेतला असेल. कोणताही डाएट किंवा व्यायाम सुरू करण्यापूर्वी काही गोष्टींचा आपण जरूर विचार करायला हवा, हे स्वानुभवावरून सांगते.
1) कोणताही डाएट किंवा व्यायामाचा माझ्या शरीरावर/मनावर काय परिणाम/फायदा/नुकसान होणार आहे?
2) मी अमुक एक डाएट/व्यायामच का करायचा?
3) सर्वांत महत्त्वाचे, कोणतेही ‘फॅन्सी डाएट’ किंवा परदेशी अन्नपदार्थ खाल्ले तरच मी फिट राहणार आहे का?
यातील तिसऱ्या प्रश्नावर आज इथे आपण बोलणार आहोत.
मीही तुमच्यासारखीच आरोग्याच्या बाबतीत जागरूक असून, वेगवेगळे डाएट प्लॅन ट्राय केले आहेत. आपल्या खाद्यसंस्कृतीचा अभ्यास करण्याच्या निमित्तानं मी महाराष्ट्रभर भटकंती केल्यावर लक्षात आलं की, आपला पारंपरिक आहार खरंच किती परिपूर्ण आहे. पूर्वीच्या लोकांचा आहार सात्त्विक होता, असं आपण अगदी सहजपणे म्हणतो. पण मी म्हणेन, त्यांचा आहारच नाही तर त्याची जीवनशैलीही सात्विक होती. आजच्यासारखे ते प्रथिने, फायबर, कार्ब, व्हिटामिन्स, लेस ऑईल वगैरे असा विचार करून अन्नग्रहण करत नव्हते. त्यामुळे मी तर म्हणेन सगळे डाएट सोडा आणि ‘आजी डाएट’ सुरू करा. नवीन वर्षाची आणि नवीन डाएटची गोड सुरुवात आजीच्या एका गोड पदार्थापासून.