घरगुती जेवणाचा डबा

वैजयंती नाटेकर
Tuesday, 31 December 2019

घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे पतींबरोबर घरात हातभार लावावा, असे मला तीव्रतेने वाटत होते. नोकरी करायची, तर वेळेचे बंधन होते. घरी मुलांचे जेवण-नाश्‍त्याचे पाहणे, त्यांचा अभ्यास घेणे यांतून मिळालेल्या वेळेत घरगुती व्यवसाय करण्याची कल्पना मला सुचली. याची सुरुवातही अचानकच झाली.

घरच्या घरी - वैजयंती नाटेकर
घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे पतींबरोबर घरात हातभार लावावा, असे मला तीव्रतेने वाटत होते. नोकरी करायची, तर वेळेचे बंधन होते. घरी मुलांचे जेवण-नाश्‍त्याचे पाहणे, त्यांचा अभ्यास घेणे यांतून मिळालेल्या वेळेत घरगुती व्यवसाय करण्याची कल्पना मला सुचली. याची सुरुवातही अचानकच झाली. आमच्या सोसायटीतला मुलगा नोकरी करायचा व आई-वडील बदलीच्या निमित्ताने बाहेरगावी होते. त्याला घरगुती जेवणाचा डबा हवा होता. मी म्हटले, ‘मी देते.’ आणि या व्यवसायाला सुरुवात झाली. गेली २० वर्षे मी हा व्यवसाय करीत आहे. 

माझ्या मैत्रिणी, नातेवाईक यांनी मला प्रोत्साहन दिले. त्याचबरोबर सासूबाई, पती, मुले व आता सूनबाईनेही मला पाठिंबा दिला. माझ्या पतींची यात खूप मदत होते. बाहेर गावाहून मुले-मुली शिकायला वा नोकरीसाठी पुण्यात येतात. त्यांनाही घरगुती जेवण हवे असते. त्यांना मी डबे देते. काही आजारी व्यक्तींना दोन्ही वेळेस ताजे अन्न हवे असते. त्यांनाही मी डबे देते. ज्येष्ठ नागरिकांना जास्त मदतीची गरज असते. त्यांच्या घरगुती समस्यांमुळे मी त्यांना हवे ते पदार्थ करून घरपोचही देते, तसेच रुखवतासाठी सर्व प्रकारच्या वड्या, बर्फी करून देते. वाढदिवसाचे केक, छोट्या समारंभासाठी साटोरी, मटार करंजी, गूळपोळी, खवापोळी, सांजापोळी, श्रीखंड, गुलाबजाम, जिलेबी, गाजर हलवा, व्हेज बिर्याणी, मटार पनीर, पुलाव, पराठे हे सर्व करून देते. होममेड चॉकलेट्‌स, सुपारीशिवाय मुखशुद्धी, मेतकूट, भाजण्या यालाही खूप मागणी आहे. 

संक्रांत, गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी या सणांमध्ये फराळाची मोठी ऑर्डर असते. गोड शंकरपाळी, खारी शंकरपाळी, सर्व प्रकारचे लाडू, चिवडा, चकली, करंज्या हे सर्व बाराही महिने चालू असते. स्वयंसिद्धा महिला मंडळ पुणे, शारदा बझार, बचत गट, उद्योग मैत्रिणी या विविध संस्थांच्या माध्यमातून माझ्या खूप ओळखी झाल्या, तसेच मेडिटेशन ग्रुप, बॅडमिंटन ग्रुप, कट्टी ग्रुप यांनी मला प्रोत्साहित केले. व्यवसायवृद्धीसाठी अशा ओळखीतूनच मी सध्या परदेशांत अमेरिका, इंग्लंड व देशात पंजाबमध्ये कुरिअरने फराळ पाठवते. घरगुती पदार्थ तिकडे आवडीने खातात व लगेच पोचही पाठवतात. तेव्हा मला खूप भरून येते. पैशांपेक्षाही मला या व्यवसायामुळे लाख मोलाची माणसे भेटली. 

‘जान्हवी प्रॉडक्‍टस’ हा व्यवसाय मी एकटी चालवते. त्यामुळे माझ्या शक्तीपलीकडे मला जाता येत नाही. परंतु, ताकद आहे, तोपर्यंत मी हा व्यवसाय चालू ठेवणार आहे. तसेच तरुण वर्गासाठी व नोकरी करणाऱ्यांसाठी संध्याकाळचा ‘हसरा मेन्यू’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित करण्याचा मानस आहे. यासोबतच चिकू, आंबा, आलेपाक, प्रसन्न अशा १० प्रकारच्या वड्यांचे क्‍लासेसही मी घेते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home lunch box