रेसिपी : नाचणी इडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाचणी इडली

रेसिपी : नाचणी इडली

साहित्य : १ वाटी नाचणी, १ वाटी इडली तांदूळ किंवा जाडा तांदूळ, १ वाटी उडीद डाळ, १ चमचा चणा डाळ, १ लहान चमचा मेथी दाणे, १ वाटी जाडे पोहे, चवीनुसार मीठ, आवश्यकतेनुसार गरम पाणी, ४ चमचे गोडेतेल.

कृती :

नाचणी, इडली तांदूळ प्रत्येकी दोन वेळा स्वच्छ धुऊन वेगवेगळ्या भांड्यांत ६ तास पाण्यात भिजत ठेवा. त्याचप्रमाणे उडीद डाळ, चणा डाळ, मेथी दाणे स्वच्छ धुऊन एका भांड्यात एकत्रच ६ तास भिजत ठेवा.

नंतर सर्वप्रथम भिजलेल्या नाचणीमधील पाणी काढून टाकावे व मिक्सरमधून बारीक वाटून एका पातेल्यात काढून घ्यावे. तसेच, तांदूळ व डाळीतील पाणी काढून टाकत सर्व मिश्रण एकत्र मिक्सरमधून बारीक करताना त्यात पोहे घालून वाटून घेतल्यावर बारीक केलेल्या नाचणी पिठात मिक्स करत पिठात एक ते दीड वाटी थोडे गरम पाणी घालून पीठ ५ मिनिटे चांगले फेटावे. हे पीठ झाकण लावून उबदार ठिकाणी पाच-सहा तास आंबवत ठेवावे, जेणेकरून पीठ आंबून छान वर फुगून येईल.

इडली करताना पिठात चवीनुसार मीठ घालून मिश्रण चांगले ढवळावे. इडलीपात्राला तेलाचा हात लावून एक-एक पळी पीठ घालून मोदकपात्रात ठेवून १५ मिनिटे वाफवून घ्यावे. नाचणीच्या पौष्टिक इडल्या नारळाच्या चटणीबरोबर किंवा साजूक तूपाबरोबर अतिशय रुचकर लागतात.

टीप : पिठात रात्री मीठ घालू नये, म्हणजे पीठ चांगले फुगून वर येते व इडल्या मऊसूत होतात.

- सुवर्णा जहागीरदार - सुर्वे, मुलुंड

loading image
go to top