Food : मला ‘मोमोज खूप आवडतात’; झेबा शेख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

food

मला ‘मोमोज खूप आवडतात’; झेबा शेख

ग्लॅम-फूड

मला मोमोज खूप आवडतात. जेव्हाही माझा ‘चीट डे’ असतो, तेव्हा मी ‘क्रेझी मोमोज’मध्ये आवडीनं खायला जाते. मी सतत प्रवास करत असल्याने जंकफूड खात नाही; पण ज्या शहरांत मी जाते, त्या शहरातली स्पेशालिटी मी आवर्जून खाते, ही माझी एक सवय आहे. त्यामुळे नवनवीन पदार्थ चाखायला मिळतात. लोणावळ्याचा वडापाव, नाशिकची भेळ, नगरची मिसळ मला आवडते.

मला स्वयंपाक करणं फारसं येत नाही; पण कढी मात्र मी आवडीने बनवते. कारण, मला आंबट पदार्थ खूप जास्त प्रमाणात आवडतात. स्वयंपाक जास्त येत नसल्याने माझे पदार्थ नेहमीच बिघडतात. यामुळे घडतं असं, की घरच्यांना कुठली आनंदाची बातमी द्यायची असेल, तर मला स्वतः स्वयंपाक न करता बाहेरून ऑर्डर करावी लागते. त्यामुळे शक्यतो माझे घरचे कोणतीही रिस्क घेत नाहीत मला स्वयंपाकघरात पाठवण्याची. शूटिंग आणि इतर कामांमुळे स्वयंपाकघरात काही करायला वेळही मिळत नाही ही गोष्टही खरी.

कारलं ही अशी गोष्ट आहे, जी मला बिलकुल आवडत नाही; पण तरीही मी आहारामध्ये त्याचा समावेश करण्याचा प्रयत्न करते. आईनं बनवलेले सगळेच पदार्थ मला खूप आवडतात; कारण जगात कोणत्याही व्यक्तीच्या हाताला आईच्या जेवणाची चव नाहीये. मी मुळात पौष्टिक आहार घेण्यास प्राधान्य देते. शरीराला आवश्यक असलेले सगळे घटक योग्य त्या प्रमाणात शरीरात गेलेच पाहिजेत यावर माझा भर असतो. तसेच मी रोज व्यायाम करते. फळे, आणि जीवनसत्त्वे असलेल्या भाज्या खाण्याकडे माझा कटाक्ष असतो. खाण्याच्या वेळाही शक्यतो पाळल्या पाहिजेत असं माझं मत आहे. ब्लॅक कॉफी माझी आवडती आहे. शूटिंगसाठी प्रवास करत असल्यास मी कोल्ड्रिंक्स आणि कोल्ड कॉफीपेक्षा ब्लॅक कॉफी आणि ग्रीन टीला प्राधान्य देते. ज्यांना बाहेर खायला आवडत असेल तर बिनधास्त खा; पण दररोज व्यायाम करणंही तितकंच महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा, असं मी आवर्जून सांगीन.

loading image
go to top