
Healthy Breakfast : सकाळी नाश्त्यामध्ये नक्की काय खावे? वाचा सविस्तर
सकाळी उठल्यानंतर जे पहिले अन्न आपण खातो त्याला म्हणतात न्याहारी. ही प्रत्येकासाठी खूप गरजेची आहे, कारण यामधूनच संपूर्ण दिवसभराची ऊर्जा तुमच्या शरीराला मिळून तुमचे शरीर दिवसभर ताजेतवाने राहू शकते.
आपण रात्रीचे जेवण करून झोपलो की साधारण सहा ते सात तासांनी उठतो. ही वेळ सर्वात जास्त अन्न पचनासाठी असते. तीन तासात प्राकृत माणसाचे अन्न पचन होते, मग उरलेला वेळ पोट रिकामे असते. सकाळी मलविसर्जन नीट झाले की पोटातील अग्नी प्रदीप्त होतो. अशा वेळी त्याला योग्य आहार शरीराला पुरवणे गरजेचे व आरोग्यदायी असते.
सकाळचा नाश्ता करताना या गोष्टी लक्षात ठेवा
१ ) रात्रीची झोप होऊन सकाळी नीट मलविसर्जन होऊन कडकडीत भूक लागली असेल तर भरपेट आहार घ्यावा. परंतु जर उशिरा जेवण झाले असेल, सकाळी मलविसर्जन नीट नसेल झाले तर हलका आहार घ्यावा. परंतु शरीराला चांगल्या सवयी लावाव्यात.
२) ऋतूनुसार उन्हाळा, हिवाळा, पावसाळा न्याहारीत बदल करावा.
३) सकाळी खूप तेलकट व तिखट न्याहारी करू नये.
४) न्याहारीत प्रथिने (proteins), कर्बोदके(carbohydrates), व साखर यांचे प्रमाण संतुलित असावे. आजकाल खुपजण मधुमेह होईल या भीतीने मधुमेह नसताना साखर खाणे बंद करतात. हे अतिशय घातक आहे कारण मेंदूला कार्यरत राहण्यासाठी साखरेची गरज असते.
५) आपण ज्या देशात राहतो त्या देशात पिकणारी फळे, भाज्या, यांचाच शक्यतो आहार घटकात समावेश करावा.
६) आहारात कोणतेही रासायनिक घटक, अथवा कृत्रिमरंग यांचा वापर न करता नैसर्गिक भाजीपाला, धान्ये, फळे यांचा वापर करावा.
७) मनुष्य कोणत्याही प्रकृतीचा असला तरी त्याने सकाळी एक चमचा गाईचे तूप व एक कप गाईचे दूध घेणे गरजेचे आहे. कफ प्रकृतीच्या व्यक्तीने दूध घेताना त्यात चिमूटभर हळद व सुंठ पावडर टाकून घ्यावे.
धपाटे
हा महाराष्ट्रीयन पारंपारीक पदार्थ आहे. गव्हाचे पीठ, हरभरे डाळीचे पीठ, ज्वारी पीठ, नागली पीठ, तांदूळ पीठ सर्व एकत्र करावीत. त्यात हींग, जिरे पूड, तिखट, मीठ, कोथिंबीर, थोडा लसूण घालून पाणी टाकून पोळी सारखी कणिक मळावी. त्याचे छोटे छोटे गोळे करून लाटून तव्यावर भाजावेत. हे धपाटे, चांगले तूप, लिंबू लोणचे, खोबऱ्याची ओली चटणी, याबरोबर खावेत.
मेतकूट भात
ज्यांची पचनशक्ती कमी आहे किंवा ज्यांना हलका आहार घ्यावयाचा आहे त्यांनी तांदळाचा गरम गरम आसट भात, त्यावर साजूक तूप, वर खमंग मेतकूट टाकून खावे.

खिचडी
मोड आलेली धान्ये, शेंगदाणे, सर्व डाळी ( मूग, हरभरा, तूर, मसूर) एकत्र करून केलेली खिचडी व त्यावर तूप घालून लिंबू लोणचं सोबत खावी. सर्व डाळी असल्याने यात भरपूर प्रमाणात प्रथिने असतात.
उपमा
बाजरीचे पीठ, रवा, नागलीचे पिठ यांचा पारंपारीक पद्धतीने उपमा बनवावा. यात कढीपत्ता, आले टाकावे म्हणजे पचण्यास सोपे जाते. (Health)
धिरडे
सर्व डाळींची पिठ, तांदूळ पीठ, गव्हाचे पीठ यात हिंग, जिरे, मीठ, तिखट, कोथिंबीर, पाणी घालून पातळ मिश्रण करावे व nonstick pan वर डोसा सारखे घालावे. (Breakfast)
पचडी
कोबी, टोमॅटो, गाजर, मोडाचे मूग, जिरे, मीठ, लिंबूरस आवडीनुसार घालून एकत्र करावे व खावे. याच्या जोडीला निरनिराळे लाडू देखील खाऊ शकता, कारण सकाळची न्याहारी भरपेट पाहिजे.