लॉकडाऊनमुळे मिळाली घरातील गृहिणींच्या पाककलेला चालना

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे बाहेरील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स व पर्यायाने लोकांचे हॉटेलिंग पूर्णपणे बंद झाले आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय घरातील गृहिणींच्या पाककलेला चांगलीच चालना मिळाल्याचे दिसून येत आहे. रोज नवनवीन पदार्थ बनवणे व  त्याचे फोटो सोशल मीडिया वर अपलोड करणे याची जणू स्पर्धाच लागलेली दिसून येत आहे.

वडगाव मावळ - सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे बाहेरील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स व पर्यायाने लोकांचे हॉटेलिंग पूर्णपणे बंद झाले आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय घरातील गृहिणींच्या पाककलेला चांगलीच चालना मिळाल्याचे दिसून येत आहे. रोज नवनवीन पदार्थ बनवणे व  त्याचे फोटो सोशल मीडिया वर अपलोड करणे याची जणू स्पर्धाच लागलेली दिसून येत आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महिन्यातुन एकदा तरी हॉटेलात जेवायला जाणे. चायनीज पदार्थांचा आस्वाद घेणे, कुटुंबातील सदस्य व मित्र परिवारातील सदस्यांचा वाढदिवस हॉटेलात साजरा करणे असा ट्रेंडच मावळ तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून निर्माण झाला आहे. तालुक्याचा ग्रामीण भागही याला अपवाद राहिलेला नाही. परंतु लॉकडाऊनमुळे या सर्व बाबींवर गदा आली आहे. मात्र नाईलाजाने का होईना आता घरातील गृहिणींच्या पाक कलेला चांगलीच चालना मिळाली आहे. बाहेरील पदार्थ आता घरीच बनू लागले आहेत. घरातील सदस्यांचे वाढदिवस साजरे करण्यासाठी गृहिणी घरातच केक व हॉटेल स्टाईल मेनू बनवत आहेत. नवनवीन रेसिपीज बनवण्यासाठी लागणाऱ्या पदार्थांना बाजारात मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे केक,चाईनिज रेसिपीज,पारंपरिक पदार्थ घरीच बनविण्याची रेलचेल दिसून येत आहे. या सर्व पदार्थाच्या पाककृती यू ट्यूब सारख्या सोशल मीडियावरून शिकणे सहज सोपे झाले असल्याने गृहिणींच्या पाककलेला चालना मिळाली आहे. घरात असणाऱ्या लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच कुटुंबीय या पदार्थांचा आस्वाद घेताना दिसत आहेत. बनवलेल्या पदार्थांचे फोटोज नातेवाईक व मित्र परिवाराच्या ग्रुपवर आवर्जून पाठवले जात आहेत. पदार्थ बनविणाऱ्या गृहिणींना त्यांच्याकडून दादही दिली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown is the culinary drive of housewifes