esakal | ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : भारतीय ‘करी’चा ‘रस्सा’स्वाद

बोलून बातमी शोधा

Kajari Recipe
ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : भारतीय ‘करी’चा ‘रस्सा’स्वाद
sakal_logo
By
मधुरा पेठे

‘करी’ किंवा ‘करी’ पावडर हे मूळ भारतीय शब्द नव्हेत किंवा अशा नावाचा कोणता पदार्थ ही भारतात तयार होत नाही. भारतीय खाद्यसंस्कृतीत नानाविध रस्से तयार केले जातात. भाजी, दही, डाळ, मांस, मासे, फळे, हिरव्या भाज्या, यांतील एक किंवा अनेक पदार्थ वापरून अनेक प्रकारचे रस्से तयार होतात; परंतु या पदार्थांना काय म्हणावे हे नीट न समजल्यामुळे म्हणा- ब्रिटिशांनी भारतीय रश्याला ‘करी’ असे सोयीस्कर नाव दिले.

मसाल्यांच्या शोधात पोर्तुगीज आणि ब्रिटिश भारतात आले आणि येथील चविष्ट पदार्थांच्या प्रेमात पडले. भारतातून त्यांनी खडे मसाले तर नेलेच; परंतु मसाल्याची पावडर एकत्र करून त्याचा तयार फॉर्म्युला विकायला सुरुवात केली आणि त्याला नाव दिले ‘करी पावडर.’ अल्पावधीतच ही करी पावडर लोकांच्या पसंतीस उतरली.  ही करी पावडर आपल्या भारतीय गरम मसाला पावडरीपेक्षा थोडी निराळी असे. कारण यात लाल मिरची आणि मसाल्यासोबत हळद, सुंठ पावडरसुद्धा असे. मसाला मिक्स वापरून नानाविध पदार्थ तयार केले जात. सतराव्या शतकात भारतात राहणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी इंग्लिश पदार्थांत भारतीय मसाले वापरायला सुरुवात केली आणि त्यातून जन्म झाला अँग्लो इंडियन पदार्थांचा. अँग्लो इंडिअन पदार्थातील Kedgeree (केजरी) म्हणजेच आपल्या खिचडीचा रूपांतरित प्रकार- ज्यात भात, स्मोक केलेला हॅडॉक मासा, सॅलरी, उकडलेली अंडी आणि करी पावडर वापरली जाते. मलीगटांनी सूप तर आजही रेस्टॉरंटच्या मेन्यू कार्डवर दिसते. त्याचसोबत कांदा, मांस, मिट स्टॉक, सफरचंद, क्रीम आणि करी पावडर यापासून ‘इंडियन करी’ तयार केली जायची. तर अशा अनेक अँग्लो इंडियन पदार्थांमुळे ब्रिटिश आणि इतर युरोपियन लोकांना करी पावडरीची सवय लागली. सन १८२४ मधील अमेरिकेतील पहिल्या रेसिपी पुस्तकात इंडियन करी रेसिपी समाविष्ट होती. १८६१मधील इसाबेला बिटन लिखित Book of Household Management मध्येदेखील करी पावडर वापरून केलेल्या पाककृती आहेत. ब्रिटनमध्ये अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत प्रत्येक केमिस्टकडे करी पावडर विकली जात असे. यावरून कळते, की करी पावडर त्यांच्या जेवणात किती महत्त्वाची असे.

भारत नावाच्या जादुई दुनियेतून आलेल्या मौल्यवान गोष्टींपैकी एक म्हणजे मसाले. ब्रिटिशांचे करी आणि करी पावडरवरील हे विशेष प्रेम ते जिथे जातील तिथे सोबत नेले आणि रुजवले. त्यांच्या वसाहती जिथे जिथे झाल्या, तिथे तिथे भारतीय करी आणि करी पावडरचा प्रभाव स्थानिक जेवणावर झालेला दिसतो. करी पावडर आणि स्थानिक पदार्थ वापरून प्रत्येक ठिकाणी त्यांची वैशिष्ट्यपूर्ण करी तयार झाली. आजमितीला जगभरात ब्रिटन, जपान, कोरिया, त्रिनीदाद, साऊथ आफ्रिका, इत्यादी ठिकाणी स्थानिक जेवण आणि भारतीय करीचा अभूतपूर्व संगम झालेला दिसेल. 

कमी तिखट खाणाऱ्या ब्रिटिश मंडळींकरता खास टोमॅटो, बटर आणि क्रीम वापरून तयार केलेली बटर चिकन आणि टीक्का मसाला, जपानमध्ये नूडल्स, सूप, करी पावडर आणि लाल मिरची पावडर घालून तयार केलेली झणझणीत करी रामेन खूप प्रसिद्ध आहे. आफ्रिकेत करी पावडर आणि मांस वापरून तयार केलेला चमचमीत भात प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे मलेशिया आणि सिंगापूर येथे पावडर वापरून खास सिंगापूर नुडल्स प्रसिद्ध आहेत. 

आजच्या घडीला ‘करी फ्लेवर’ हा वेगाने वाढणारा फूड ट्रेंड आहे. करी फ्लेवर लोक इतका पसंत करतात, की तयार फूड प्रॉडक्ट्स, रेस्टॉरंटमधील पदार्थ यात करी फ्लेवरकडे लोकांचा वाढता कल दिसतोय. करी फ्लेवरचा वर्षभरात ३५ टक्के मार्केटशेअर वाढला आहे. अर्थात ही जादू आहे भारतीय मसाल्यांची जी हजारो वर्षे अबाधित आहे. भारतीयांचे मसाल्यांचे कॉम्बिनेशन आणि त्याचा योग्य वापर यामुळे जगभरातील लोक भारतीय चवीकडे आकर्षित झाले आहेत. चला तर मग आज या निमित्ताने एक छानशी अँग्लो इंडिअन रेसिपी पाहुयात.

पारंपरिक ‘केजरी’

हे पारंपरिक ‘अँग्लो इंडियन केजरी रेसिपी’चे भारतीय रूपांतर आहे. कारण हॅडॉक मासा आणि करी पावडरऐवजी भारतीय पर्याय वापरले आहेत.

साहित्य - पाव किलो बासमती तांदूळ, १ कप दूध, ५० ग्रॅम सुकवलेला सुरमई मासा, २ टेबलस्पून तेल, २ कांदे बारीक कापून, १ टीस्पून आलं लसूण पेस्ट, १ टीस्पून धने पावडर, १/२ चमचा लाल मिरची पावडर, थोडी हळद, १ टीस्पून करी पावडर किंवा गरम मसाला,१ स्टॉक क्यूब, मीठ गरजेनुसार, ४ उकडलेली अंडी, थोडी कोथिंबीर 

कृती -

  • मासा थोडा वेळ भिजत ठेवून अतिरिक्त मीठ काढून घेणे, स्वच्छ धुवून एका भांड्यात पाणी, दूध आणि मासा एकत्र करून गरम करत ठेवणे. 

  • दुसऱ्या पॅनमध्ये तेलावर कांदा, आलं लसूण पेस्ट, धने पावडर, मिरची पावडर, हळद, गरम मसाला परतून घ्या. 

  • त्यावर तांदूळ आणि स्टॉक क्यूब घालून परतून घ्या. त्यात दूध मासा एकत्र करून गरम केलेले पाणी टाकून तांदूळ शिजू द्या. मासा वेगळा काढून ठेवा. 

  • भात शिजला, की त्यात गरजेनुसार मीठ, मासा कुस्करून कोथिंबीर टाकून मिक्स करा, वरून उकडलेली अंडी कापून ठेवा आणि गरमागरम सर्व्ह करा.