
सध्या सॅलड हा अतिशय ग्लॅमरस पदार्थ झाला आहे. तब्येतीस उत्तम असलेला हा पदार्थ रोजच्या आहारात नक्की असायला हवा.
घरकुल अपुले : सॅलड चविष्ट आणि पौष्टिक
- मीनल ठिपसे
सध्या सॅलड हा अतिशय ग्लॅमरस पदार्थ झाला आहे. तब्येतीस उत्तम असलेला हा पदार्थ रोजच्या आहारात नक्की असायला हवा. पूर्वीपासूनच घरोघरी आपल्याकडे कोशिंबिरी, रायते, पचडी असे अनेक पदार्थ केले जातातच. टोमॅटो, काकडी, कांदा, लाल भोपळा, बिट, पालक, कोबी, कोथिंबीर, दही, दाण्याचे कूट, विविध फळे, मिरचीची फोडणी किंवा लिंबू रस वापरून सॅलड केले जायचे. हल्ली वेगवेगळ्या प्रकारची सॅलड ड्रेसिंग्ज बनवली जातात किंवा विकतसुद्धा मिळतात. लिंबाचा रस, मध, मेयॉनीज, ड्रायफ्रूट्स, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, मिरपूड असे अनेक पदार्थ वापरून नावीन्यपूर्ण सॅलड्स बनवली जातात. डॉक्टरसुद्धा हल्ली ताजी आणि मेयॉनीज वगैरे फार न वापरता केलेली ताजी फळे खायचा सल्ला देतात.
जेवणाच्या आधी कोशिंबीर किंवा सॅलड खाल्ल्याने नंतर बाकीच्या अधिक कार्ब्ज असलेल्या गोष्टी आपोआपच कमी खाल्या जातात. आपल्याला आहार पचवण्यासाठी आवश्यक असलेला फायबर हा घटक सॅलडमध्ये भरपूर प्रमाणात असतो. सॅलडमध्ये विविध कच्च्या आणि वाफवलेल्या भाज्या आणि फळे यांचा समावेश असतो. त्यामुळे आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करणारी बरीच जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. विकतची सॅलड ड्रेसिंग किंवा फोडणीचा जास्त वापर न केल्यास यात कॅलरीजही कमी असतात. सॅलड्स खाल्ल्याने ॲसिडिटीची समस्या कमी उद्भवते. हिरव्या भाज्या, फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स समृद्ध असल्याने आपल्याला व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, लाईकोपिन, फॉलिक ॲसिड या गोष्टी मिळतात. अर्थातच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. जवस, अक्रोड, ऑलिव्ह ऑइल यांचा वापर केल्यास चांगले फॅट्स व ओमेगा 3 मिळण्यास उपयोग होतो. सॅलड्स योग्य प्रमाणात खाल्याने रक्ताभिसरण वाढते, डोळे चांगले राहतात, कांती सतेज राहण्यास मदत होते.
सॅलड्स बनवताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
हिरव्या पालेभाज्यांचा अवश्य वापर करावा
सॅलड करण्यापूर्वी सुरी, विळी, कटिंगबोर्ड स्वच्छ धुवून कोरडे करून वापरावे
नेहमीच ताज्या भाज्या व फळे वापरावीत
दही वापरण्यापूर्वी छान घुसळून थंड करून वापरावे
फळे व भाज्या धुवून स्वच्छ करून गार पाण्यात ठेवाव्यात आणि मग वापराव्यात
ऑलिव्ह ऑइल, मोहरी पूड, व्हिनेगर, लिंबाचा रस किंवा दही यांचा वापर करता येतो.
काही छान प्रयोग करून बघता येतील
पिकलेल्या ॲवाकाडोचा गर, त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, अगदी थोडी बारीक चिरलेली मिरची, लिंबू रस, ऑलिव्ह ऑइल, मीठ आणि मिरपूड यांचं सॅलड खूप मस्त होतं. हे डीप म्हणूनही वापरता येतं.
अननसाचे वाफवलेले तुकडे, वाफवलेले गाजर, घेवडा, मटार, सफरचंदाच्या बारीक फोडी यात मेयॉनीज, फेटलेले क्रिम, मीठ, मिरपूड आणि अगदी किंचित साखर घालून थंड सर्व करा.
वाफवलेले मक्याचे दाणे, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर यात किंचित मीठ, चाट मसाला, थोडे तिखट हे सर्व एकत्र करावे. सर्व करताना खाकऱ्याचे अगदी बारीक तुकडे करून घालावे.
मोड आलेली कडधान्ये, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, किसलेले गाजर, बीटरूट, डाळिंबाचे दाणे, चाट मसाला, मीठ किंचित लिंबाचा रस. या सॅलडमध्ये भरपूर प्रोटिन असते.
काकडी व गाजर सोलून बारीक चकत्या कराव्यात. एका भांड्यात मीठ, व्हिनेगर, सोया सॉस, ऑइल आणि किंचित साखर एकत्र करून ड्रेसिंग तयार करावे. अगदी वाढताना एकत्र करावे आणि वरून अननसाचे तुकडे घालावे.
सॅलडची पाने, पालकाची थोडी पाने बारीक चिरून, मध, लिंबू रस, मीठ एकत्र करून घ्यावे. भोपळ्याच्या बिया, अक्रोडाचे बारीक तुकडे, संत्र्याचे तुकडे या सगळ्या गोष्टी एकत्र करून गार सर्व्ह करावे.
वाफवलेले लाल भोपळ्याचे तुकडे, त्यावर तूप, मिरची, हिंग, जिरे याची फोडणी, फेटलेले दही, मीठ, साखर आणि थोडे दाण्याचे कूट घालून हा रायता थंड सर्व्ह करावा.