esakal | पोषक-पूरक : फळांचा राजा आंबा
sakal

बोलून बातमी शोधा

Mango

पोषक-पूरक : फळांचा राजा आंबा

sakal_logo
By
मृणाल तुळपुळे

मधुर व रसयुक्त आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ असून शरीराला निरोगी ठेवण्यासाठी त्याचे सेवन खूप फायदेशीर ठरते. कच्चा आंबा म्हणजे कैरी ही हिरव्या रंगाची व आंबट चवीची असून, त्यापासून आंबट, गोड, तिखट अशा चवीचे लोणचे, चटण्या, मुरांबा, आमचूर असे प्रकार बनवले जातात. केशरी रंगाचा पिकलेला आंबा फोडी करून किंवा रस काढून खाल्ला जातो.

आंब्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते; तसेच रक्तातील लालपेशी निर्माण करण्यास मदत होते. ए, सी व ई ही व्हिटॅमिन्स; पोटॅशियम, लोह व कॉपर ही खनिजे व इतर पोषणमूल्यांनी परिपूर्ण असा आंबा निरोगी हृदयासाठी उपयुक्त मानला जातो. त्याच्या सेवनामुळे त्वचेचा पोत व कांती सुधारण्यास मदत होते. बिटा कॅरोटिन, अल्फा कॅरोटिन असलेले हे फळ डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे.

आंब्यात तंतूमय पदार्थ भरपूर असतात; पण सोडियम आणि कोलेस्टेरॉल अजिबात नसते. उन्हाळ्याचा त्रास कमी करण्यासाठी आंब्याचे मिल्कशेक, आइस्क्रीम; तसेच थंडगार पन्ह्याचा आपण आस्वाद घेऊ शकतो. एका आंब्यात साधारणपणे ११० कॅलरीज व भरपूर शर्करा असते. त्यामुळे मधुमेही व स्थूल व्यक्तींनी मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आंबा खाणे योग्य ठरेल.

हापूस, पायरी, तोतापुरी, लंगडा असा कोणत्याही प्रकारचा आंबा कसाही खाल्ला, तरी त्याची चव लहान-मोठे सर्वांनाच आवडते. आंबा आवडत नाही अशी व्यक्ती विरळाच. अशा या बहुगुणी आंब्याला त्याच्या गोडव्यामुळे आणि त्यातील आरोग्यदायी गुणधर्मांमुळे फळांचा राजा म्हटले जाते.

loading image
go to top