esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Masoor Dal

पोषक-पूरक : मसूर डाळ

sakal_logo
By
मृणाल तुळपुळे

मसूर हे एक कडधान्य असून, त्यापासून डाळ केली जाते. या डाळीला अतिशय आकर्षक असा केशरी रंग असतो. शाकाहारी लोकांना प्रथिने मिळवण्यासाठी डाळी हे एक उत्तम पर्याय आहे. त्यापैकी मसूर डाळ ही इतर डाळींच्या तुलनेत चवदार व पौष्टिक असून त्यात जास्त प्रथिने असतात. मसूर भिजवून मोड आणून त्याची उसळ वा बिर्याणी केली जाते. कोल्हापूरचा झणझणीत असा ‘अख्खा मसूर’ हा पदार्थ प्रसिद्ध आहे. मसूर डाळीपासून आमटी, दाल फ्राय, खिचडी, असे विविध पदार्थ बनवले जातात.

रोज एक वाटी शिजवलेली मसूर डाळ खाल्ली तर त्यातून शरीराला आवश्यक अशी प्रथिने, फायबर व जीवनसत्त्वे मिळू शकतात. वजन कमी करण्यासाठीच्या पदार्थांमध्ये मसूर डाळ हे एक उत्तम स्रोत मानले जाते. त्यात फायबरचे प्रमाण खूप असल्यामुळे पोट खूप काळ भरलेले राहते. त्यातील कॅल्शियम व फॉस्फरस हाडांच्या व दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते, तर त्यातील फॉलिक ॲसिडमुळे रक्तातील तांबड्या रक्तपेशी वाढण्यास मदत होते.

मसूर डाळीचा उपयोग आहाराव्यतिरिक्त त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी केला जातो. ‘अँटी एजिंग फूड’ मानली जाणारी मसूर डाळ आपले रंग रूप उजळवून टाकते. तजेलदार, मुलायम व चमकदार त्वचा हवी असेल, तर त्यासाठी मसूर डाळ हा एक उत्तम पर्याय आहे. ही डाळ त्वचेवरील काळे डाग व सुरकुत्या दूर करण्यास मदत करते. चेहरा उन्हामुळे काळवंडला असेल, तर त्यावर मसूर डाळीचा फेस पॅक अतिशय उपयोगी ठरतो. त्यासाठी भिजवून वाटलेली मसूर डाळ व हळदीचा मिसळून केलेला किंवा मसूर पीठ दुधात कालवून केलेला फेसपॅक लावला जातो. लहान मुलांना आंघोळीच्या वेळी साबणाऐवजी मसूर डाळीचे पीठ लावण्याची पद्धत आहे.

loading image
go to top