esakal | पोषक-पूरक : औषधी हळद I Turmeric
sakal

बोलून बातमी शोधा

Turmeric

पोषक-पूरक : औषधी हळद

sakal_logo
By
मृणाल तुळपुळे

पुरातन काळापासून आपल्या स्वयंपाकघरात हळदीचा वापर केला जातो. त्यामुळे पदार्थाला पिवळा रंग आणि चव मिळते. हळदीच्या वनस्पतीचा वाळलेला कंद म्हणजे हळकुंड, त्यावर प्रक्रिया करून रोजच्या वापरातील हळद बनवली जाते. या वनस्पतीच्या पानांना हळदीचा स्वाद असल्यामुळे त्यात विविध पदार्थ बनवले जातात. काही पदार्थांत स्वादासाठी हळदीची पाने चिरून घातली जातात, तर ओल्या हळदीपासून चटण्या व लोणचे बनवले जाते.

आंबे हळद, लोखंडी हळद, कस्तुरी हळद, पांढरी हळद, काळी हळद व सुगंधी हळद असे हळदीचे काही प्रकार आहेत. त्यापैकी लोखंडी हळद ही प्रामुख्याने रंग बनवण्यासाठी वापरली जाते. काळ्या हळदीत भरपूर औषधी गुणधर्म आहेत; पण ती अतिशय दुर्लभ असते.

हळद हे आजीबाईच्या बटव्यातील महत्त्वाचे औषध आहे. आयुर्वेदिक औषधांमध्येदेखील तिचा खूप वापर केला जातो. हळदीतील जंतुनाशक गुणधर्मामुळे ती ओल्या जखमेवर लावली जाते, तर सूज, मुकामार व त्वचेच्या समस्यांवर हळकुंड उगाळून लावले जाते. हळद घातलेले गरम दूध प्यायले असता शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व रक्त शुद्ध होण्यास मदत होते. नैराश्य, अंगदुखी, सर्दी, कोरडा खोकला यावर हळदीचे पाणी गुणकारी आहे.

विविध सौदर्यप्रसाधनांमध्ये हळदीचा मुबलक वापर केला जातो. आपल्याकडे लग्नाच्या वेळी वधू-वराला समारंभपूर्वक हळद लावली जाते. अंगाला हळद लावल्यास त्यावरील मृत त्वचा निघून जाते. चेहऱ्यावर हळदीचा लेप लावल्यास सुरकुत्या कमी होण्यास मदत होते व चेहरा उजळतो.

loading image
go to top