esakal | पोषक-पूरक : राजगिरा | Rajgira
sakal

बोलून बातमी शोधा

Rajgira

पोषक-पूरक : राजगिरा

sakal_logo
By
मृणाल तुळपुळे

राजगिरा हे एक लोकप्रिय धान्य असून, उपवासाच्या दिवशी त्याचा वापर केला जातो. त्याला रामदाना व अमरनाथ असेही म्हटले जाते. आफ्रिका आणि आशिया खंडात उगम झालेल्या राजगिऱ्याची लागवड मुख्यतः भाजी आणि बियांसाठी केली जाते. ही वनस्पती वाढली, की त्यावर कणसासारखे दिसणारे लांब आणि लोंबणारे तुरे येतात. हे तुरे वाळल्यावर त्यातून जे बी काढले जाते त्यालाच आपण ‘राजगिरा’ म्हणतो. राजगिऱ्याच्या वनस्पतीमध्ये दोन प्रकार असतात. एकात लाल रंगाचे देठ व लाल रंगाची पाने असतात, तर दुसऱ्यात हिरवा देठ व हिरवी पाने असतात. लाल पाने ‘लाल माठ’ म्हणून ओळखली जातात, तर हिरव्या पानांना ‘हिरवा माठ’ किंवा ‘राजगिरा’ म्हटले जाते. या पाल्याची आणि जाड देठांची भाजी केली जाते.

उपवासाच्या दिवशी राजगिऱ्याच्या पिठापासून भाकरी, थालिपीठ, धिरडी वा पुऱ्या केल्या जातात. राजगिरा फोडून त्याच्या लाह्या करतात. या लाह्यांपासून वड्या, लाडू, खीर, चिक्की असे पदार्थ बनवतात किंवा त्या दूध साखरेत घालून खाल्ल्या जातात. राजगिरा आणि त्याच्या लाह्या पचायला हलक्या असून खूप पौष्टिक असतात. राजगिऱ्यापेक्षा या लाह्याच जास्त खाल्ल्या जातात.

शरीराला आवश्यक असणाऱ्या अनेक पोषक तत्त्वांचा समावेश असल्यामुळे रोजच्या आहारात राजगिऱ्याचा लाडू, वडी, पराठा असा एखादा पदार्थ असावा. शरीराच्या अनेक अवयवांना ताकद देणारा राजगिरा लोह आणि कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. त्यातील लायसिनमुळे केसांची चांगली वाढ होते. मधुमेह असलेल्यांनी व ज्यांचे कॉलेस्टेरॉल वाढले आहे, त्यांनी तर मुद्दाम राजगिरा किंवा त्याच्या लाह्या खाव्यात. राजगिरा ग्लुटेन फ्री असून सेलिआक ह्या पोटाच्या विकारावर त्याचे सेवन उपयुक्त ठरते.

loading image
go to top