esakal | पोषक-पूरक : शिंगाडा | Shingada
sakal

बोलून बातमी शोधा

Shingada

पोषक-पूरक : शिंगाडा

sakal_logo
By
मृणाल तुळपुळे

शिंगाडा ही पाणथळ भागात वाढणारी तृणवनस्पती आहे. या वनस्पतीचे कंद म्हणजे शिंगाडा. इंग्रजीमध्ये त्याला ‘वॉटर चेस्टनट’ असे म्हणतात. शिंगाड्याची आशिया खंडात विशेषत: चीन, थायलंड, व्हिएतनाम या देशांत मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. आपल्याकडे उत्तर भारत, मध्य प्रदेश व विदर्भात शिंगाड्याची शेती केली जाते. ते साधारणपणे थंडीच्या दिवसात खाण्यासाठी तयार होतात. शिंगाडे वाळवून त्याचे पीठ केले जाते व त्या पिठापासून लाडू, वड्या, पुऱ्या थालिपीठ असे उपवासाचे पदार्थ बनवले जातात. मुका मार किंवा सूज आलेल्या जागेवर याच पिठाचा लेप लावला, तर त्वरित आराम मिळतो.

या कंदात आयोडिनचे प्रमाण खूप असून, तो सोडियमचा नैसर्गिक स्रोत आहे. त्याच्या सेवनामुळे थायरॉईड रोग दूर ठेवण्यास मदत होते; तसेच थायरॉईड ग्रंथींच्या कार्याचे नियमन केले जाते. शिंगाड्याच्या सेवनामुळे शरीराची ऊर्जा पातळी टिकून राहते, त्यामुळे कष्टाची कामे करणाऱ्यांनी व खेळाडूंनी त्याचा आपल्या आहारात सामावेश करावा. त्यात प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर असल्यामुळे त्याच्या सेवनामुळे थकवा किंवा अशक्तपणा जाणवत नाही. याच कारणासाठी उपवासकाळात शिंगाड्याचे पदार्थ मुद्दाम खाल्ले जातात. त्यात ७५ टक्के पाणी व अगदी कमी कॅलरीज असतात, त्यामुळे त्याचा वजन कमी करण्यासाठी उपयोग होतो व शरीरातील पाण्याची पातळी संतुलित रहाते. त्यातील फायबर व पाण्यामुळे पचनसंस्थेचे काम सुरळीत चालते व बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून मुक्तता मिळते.

loading image
go to top