
Narali Purnima 2022: आज बनवा टेस्टी नारळी भाताची रेसिपी
आज नारळी पौर्णिमा आहे. नारळी पौर्णिमाच आपण रक्षाबंधन म्हणून साजरी करतो. शिवाय नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा करून मासेमारीला परत सुरूवात केली जाते. पौर्णिमेला नारळी भात करण्याची प्रथा आहे. समुद्र किनारपट्टीवर नारळ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. त्यामुळे तिथे नारळाला विशेष महत्त्व आहे.
आज नारळी पौर्णिमेनिमित्त आपण नारळी भात कसा बनवायचा, हे जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया नारळी भाताची रेसिपी.
साहित्य:
1 वाटी बासमती तांदूळ
पाऊण वाटी खोवलेला नारळ
आवडीनुसार अर्धा ते पाऊण वाटी किसलेला गूळ
1 टेबलस्पून साजुक तूप
4 लवंगा
4 वेलच्या
1 दालचिनीचा छोटा तुकडा
पाव टीस्पून जायफळाची पूड
पाव टीस्पून मीठ
केशराच्या 7-8 काड्या
अर्धी वाटी काजू तुकडा
कृती
सुरवातीला तांदूळ स्वच्छ धुवून निथळत ठेवा.
त्यानंतर लहान कुकरमध्ये तूप गरम करा. तूप चांगलं गरम झालं की त्यात लवंगा, वेलच्या आणि दालचिनी घाला.
आता त्यात निथळलेले तांदूळ घालून चांगलं परता.
त्यात किसलेला गूळ, खोवलेलं खोबरं, मीठ, जायफळ पूड, काजू तुकडा, केशराच्या काड्या घाला. सगळं नीट मिसळून घ्या. गुळाऐवजी साखरही वापरता येईल.
गुळ विरघळला की त्यात दीड वाटी पाणी घाला आणि कुकरचं झाकण शिटीसकट लावा. दोन शिट्यांमधे किंवा मंद गॅसवर दहा मिनिटांत भात शिजतो.
या भातामध्ये आवडीनुसार पिवळा रंग घालू शकता.