ब्रेकफास्ट @ बॅरोमीटर

barometer
barometer

फूडहंट 

पुण्यातील प्रमुख निवासी परिसर अशी ख्याती असलेल्या ‘कोथरूड’चे फूड पॅराडाइसमध्ये रूपांतर झालेले अनेकांनी अनुभवले असेलच. छोट्या फूड चेन्सपासून ते मोठमोठे रेस्टॉरंट्स इथे आहेत. पण, सिटीप्राइडजवळ कोथरूडमधील पहिल्यावहिल्या फाइन-डाइन रेस्टॉरंटचा मान ‘बॅरोमीटर’ला द्यायला हवा. ‘ऑल डे डायनिंग’ असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये दर्जेदार ग्लोबल फूड अनुभवायला मिळते. खवय्ये कोथरूडकरांना फाइन डाइन एक्सपीरियन्ससाठी आता कोरेगाव पार्क आणि बाणेरच्या हॉटेल्सकडे धाव घ्यावी लागत नाही. यामुळेच अल्पावधीत बॅरोमीटरला नियमित व नवीन ग्राहकवर्ग मिळाला आहे. ब्रेकफास्ट आणि लंच-डिनर असे दोन वेगवेगळे मेन्यू येथे उपलब्ध आहेत. ग्राहकांना परिपूर्ण आणि वैविध्यपूर्ण ब्रेकफास्ट अनुभवता यावा यासाठी येथे खास मेन्यू डिझाइन केला आहे. इंडियन, कॉंटिनेंटल, मेक्सिकन, इंग्लिश आणि इतर ब्रेकफास्टचे अनेक पर्याय इथे चाखायला मिळतात. इथली सर्वांत लक्षवेधी ऑफेरिग म्हणजे ‘फ्री कॉफी’! ब्रेकफास्टला, म्हणजेच सकाळी ७.३० ते ११ या वेळेत सर्वांना फिल्टर कॉफी विनामूल्य आहे आणि तीही अमर्यादित. 

ब्रेकफास्ट म्हटले की, डोळ्यांसमोर प्रथम येते अंडे. अंड्याच्या इंडियन आणि विदेशी प्रकारात विविध डिशेस मेन्यूमध्ये बघायला मिळतात. यापैकी उल्लेखनीय डिश म्हणजे गोट चीज आणि ट्रफल ऑइल युक्त ‘वाइल्ड मशरूम अँड रोस्टेड गार्लिक स्क्रॅम्बल’ आणि गोअन रॉस ऑम्लेट. ट्रफल ऑइल, गोट चीज आणि गार्लिकमुळे या एग स्क्रॅम्बलची एक वेगळीच लाजवाब चव येते. गोव्यामध्ये सर्रास मिळणाऱ्या रॉस किंवा रस्सा ऑम्लेटचे मॉडिफाइड रूप येथे मिळते. ऑम्लेट, त्यावर रिच टेस्टी चिकन कोकोनट ग्रेव्ही आणि सोबत ब्रेड अगदी पोटभरीचे ठरते. क्रोक सेन्यॉर ही एक मेक्सिकन एग डिश असून, त्यात फ्राईड एग्स, फहिताच्या मसाल्यामधले सौसेज, बेक्ड बीन्स, सार क्रीम, बेशामेल याचा समावेश आहे. गालायेत बंडोरा ही एक जॉर्डेनिअन एग आणि चिकन डिश आहे. ती नुकतीच ब्रेकफास्ट मेन्यूमध्ये ॲड झाली आहे. ‘द बॅरोमीटर ब्रेकफास्ट’ ही डिश घेतल्यास आपण रात्रीपर्यंत काहीच खाऊ शकणार नाही, हे नक्की...

आंतरराष्ट्रीय डिशेसबरोबर येथील भारतीय पदार्थही तितकेच स्वादिष्ट आहेत. कमी तेलातले हेल्दी पोहे आणि चक्क प्रॉन्स पोहे देखील येथे मिळतात. सोबत थालीपीठ, पराठे, खिमा पावही! येथील छोले कुलछेची चव अफलातून आहे. नुकतीच ‘राधावल्लभी’ ही बंगाली डिश सर्व्ह करायला सुरुवात झाली आहे. राधावल्लभी म्हणजे मटारचे सारण असलेल्या ३ पुऱ्या व त्यासोबत चना दाल आणि दम आलू.            

फिटनेस प्रेमींमध्ये बॅरोमीटर लोकप्रिय आहे. ग्लुटन फ्री, किटो-डाएट फ्रेंडली डिशेसचे पर्याय बघायला मिळतात. आपापल्या डाएटनुसार त्या-त्या मापात डिश बनवून मिळते. किनुआ उपमा, बॉडी बिल्डर्स ब्रेकफास्ट, बुलेट-प्रूफ कॉफी (हाय कॅलरी कॉफी) असे पर्याय फिटनेस प्रेमींच्या पसंतीस उतरतात. बॅरोमीटरमध्ये डिशेस आणि प्रेझेंटेशनबरोबर उत्तम सर्व्हिस, इंटिरिअर आणि अँबियन्सवर देखील कष्ट घेतले आहेत. टेबलचे नंबरिंग, स्क्रीनवर चालणारे चार्ली चॅप्लिनचे सिनेमे, म्युझिक या सगळ्यांवर बारकाईने काम केल्याचे लक्षात येते. सकाळच्या वेळेस, खिडक्या उघड्या ठेवल्या जातात. त्यामुळे गप्पा मारत ब्रेकफास्ट करताना मंद हवेचा गारवा एक वेगळाच आनंद देऊन जातो.

हे हॉटेल अत्यंत कमी वेळात लोकप्रिय झाले असले, तरी बॅरोमीटरच्या टीमने माणुसकी जपल्याचे दिसून येते. पार्सल घ्यायला आलेल्या प्रत्येक झोमॅटो व स्वीगी बॉयला कोल्डड्रिंक किंवा कॉफी दिली जाते. येथे  वेटिंग अधिक असते, बाहेर थांबलेल्या ग्राहकांना मिनरल वॉटर आणि पिझ्झा स्लाइसेस दिले जातात. माणुसकी सोबतच सामाजिक बांधीलकीही जोपासलेली दिसते. बॅरोमीटरच्या पहिल्या वर्धापनदिन टीमने वंचित मुलांबरोबर साजरा केला, तर दुसरा वर्धापनदिन तृतीयपंथीयांसोबत  साजरा केला. अन्य ग्राहकही यात आनंदाने सामील झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com