
- नीलिमा नितीन, फूड ब्लॉगर
शाळा सुरू झाली आणि तेव्हापासून आपण डबा सिरीजच्या काही खास रेसिपी बघत आहोत. ही डबा सिरीज करताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली, की मुलांना ज्या गोष्टी आवडतात त्या आपण द्यायला टाळतो- कारण त्या हेल्दी नसतात. आणि आपण दिलेला डबा मुलं आवडीनं खात नाहीत.
सगळ्या आयांची एकच तक्रार असते- ‘मुलं भाज्या खात नाहीत. नाकं मुरडतात. मग पोषण कसं मिळणार? व्हिटॅमिन कसं मिळणार? प्रतिकारशक्ती कशी वाढणार?’ वगैरे वगैरे... पण खरं सांगू का, मुलांना डोळ्याला एखादी गोष्ट जर चांगली वाटली, आकर्षक दिसली, तर ते ट्राय करून बघायला मागे-पुढे बघत नाहीत.
भरपूर भाज्या वापरून फक्त पोषणच नव्हे, तर त्याचं सौंदर्यही वाढवता येतं व असे पदार्थ मुलांना नक्कीच आवडतील. निसर्गानं इतके सुंदर विविध रंग भाज्यांना, फळांना दिले आहेत, त्यांचा फक्त योग्य तो वापर झाला पाहिजे. चांगलं कॉम्बिनेशन निवडलं, तर पदार्थ अतिशय सुंदर दिसतो. नेहमीपेक्षा थोडीशी मेहनत मात्र जास्त लागते; पण कुठलीच आई ही मेहनत घ्यायला मागेपुढे बघत नाही. आपल्या पाल्यानं सगळं खावं यासाठी तिची नेहमीच तयारी असते.
थोड्याशा प्री-प्लॅनिंगनं हे सगळं सहज शक्य होतं. शिवाय आजकाल उपलब्ध असलेली अनेक गॅजेट्स, फूड प्रोसेसर आपली ही मेहनत, आपलं हे काम तसं अतिशय सोपं करतात. त्यांचा योग्य आणि पुरेपूर वापर कसा करून घ्यायचा हे मात्र जमलं पाहिजे.
शिवाय हे उपकरण वापरून भाज्या किसणं, स्लाईस करणं, चिरणं ही कामं अतिशय पटकन् व इतक्या छान पद्धतीनं होतात, की त्या भाज्या बघूनच आपल्याला कित्येक पदार्थ सुचतील, नाही का? आजची जी रेसिपी आपण बघणार आहोत, ती नुसती दिसायला सुंदर नाही, तर अतिशय पौष्टिक आहे. मुलं आनंदानं खातीलच; पण वडीलधारीही आवडीनं बनवून खातील.
भरपूर भाज्या, प्रोटिन्स, फायबरनी युक्त असा हा पदार्थ आहे. शिवाय यात कॅलरीजही त्या मानानं खूपच कमी आहेत. त्यामुळे ज्यांना वजनाची चिंता सतावत असेल, त्यांच्यासाठीही ही अतिशय उत्तम रेसिपी आहे. थोड्याशा पूर्वतयारीनं ही रेसिपी बनवणं अगदीच सोपं आहे. चला तर मग, बघू या साहित्य आणि कृती.
साहित्य
चिलासाठी : (अंकुरलेले) मोड आलेले हिरवे मूग १ वाटी, बेसन - २ चमचे, तांदळाची पिठी २ चमचे, ताजी पालकाची पाने, हिरव्या मिरच्या १-२, मीठ,
सारणासाठी : दह्याचा चक्का अर्धा कप, किसलेला लसूण (ऐच्छिक) २ पाकळ्या, मिक्स हर्ब मसाला १ टीस्पून, किसलेले गाजर ४ टेबलस्पून,
जांभळा कोबी ३-४ टेबलस्पून, कांद्याची पात २ टेबलस्पून, माइक्रो ग्रीन्स/ हर्ब्ज (पर्यायी), मीठ - चवीनुसार, भाजलेले तीळ २ चमचे.
कृती
चिलाचं/ टॅकोचं सर्व साहित्य एकत्र करून छान बारीक पेस्ट करा. त्यात चवीनुसार मीठ घालावं.
तव्यावर छोटे छोटे चिला/टॅकोज बनवा. दोन्ही बाजूंनी शिजवा.
सारण
चक्क्यात चिरलेला लसूण आणि मसाला घालून छान फेटून घ्या.
नंतर यात किसलेले गाजर, बारीक चिरलेला जांभळा कोबी घाला. चिरलेले स्प्रिंग ओनियन्सही यामध्ये घाला. तुम्ही तुमच्या आवडीच्या मायक्रो ग्रीन्स/ हिरव्या भाज्यादेखील घालू शकता. (टिप : येथे मुख्य म्हणजे फिलिंग थोडे क्रीमियर आणि अर्थातच चवदार असावे. त्यामुळे गरज भासल्यास थोडा जास्तीचा चक्का घालण्यास अजिबात संकोच करू नका.)
आता मऊ हिरवे टॅको घ्या आणि त्यात भाज्यांचे स्टफिंग भरा. क्रंच आणि अतिरिक्त कॅल्शियमसाठी काही भाजलेले तीळ शिंपडा. हा एक पूर्णपणे हेल्दी टॅको दिवसाचा शो स्टॉपर होण्यासाठी तयार आहे.
नक्की करून बघा व तुमच्या प्रतिक्रिया कळवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.