पोषक-पूरक शेवगा

शेंगांच्या विशिष्ट आकारामुळे इंग्रजीमध्ये त्याला ‘ड्रमस्टिक्स’ म्हटले जाते.
food
foodsakal

-पोषक-पूरक

शेवगा ही एक शेंगभाजी असून, ती वर्षभर बाजारात उपलब्ध असते. या शेंगांच्या विशिष्ट आकारामुळे इंग्रजीमध्ये त्याला ‘ड्रमस्टिक्स’ म्हटले जाते. शेवग्याची पाने हिरवीगार असून फुले पांढऱ्या रंगाची असतात, तर शेंगा मांसल आणि काळपट हिरव्या रंगावर असतात.

शेवग्याच्या झाडाची पाने, फुले, शेंगा व बियांचा आयुर्वेदिक औषधे बनवताना आणि नैसर्गिक उपचारात उपयोग केला जातो. या शेंगांमध्ये उच्चप्रतीची मिनरल्स व प्रथिने असतात. त्यात भरपूर कॅल्शियम असल्याने हाडांचे व दाताचे आरोग्य; तसेच बोन डेन्सिटी चांगली राहण्यास मदत होते. गर्भवती महिला व लहान मुलांनी मुद्दाम शेवग्याच्या शेंगा खाव्यात. शेंगांत असलेल्या सर्व पोषकतत्त्वांचा लाभ मिळवण्यासाठी त्या मीठ लावून उकडून खाणे योग्य ठरते. आपल्याकडे सांबार, डाळी व कढीमध्ये शेवग्याच्या शेंगा घालण्याची पद्धत फार जुनी आहे. या शेंगांपासून सूप व भाजीदेखील बनवली जाते.

शेवग्याच्या कोवळ्या पाल्याची चव जराशी तुरट व कडवट असते, त्यामुळे त्याची भाजी करताना त्यात मूगडाळ वा कांदा घातला जातो. या पानांमध्ये भरपूर प्रमाणात ‘ब’ जीवनसत्त्व असते. ब्राँकायटिससारख्या आजारात आराम मिळण्यासाठी शेवग्याच्या पानांचे अथवा शेंगांचे सूप प्यायले जाते. रक्त शुद्ध होण्यासाठी, पचनक्रियेशी संबंधित आजारात व शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी शेवग्याचे सेवन उत्तम ठरते.

शेवग्याच्या पानांची पूड म्हणजेच मोरिंगा पावडर अतिशय औषधी असून, त्याचा फेसपॅक व इतर सौंदर्यप्रसाधनांत वापर केला जातो. त्याच्या बियांपासून तेल काढले जाते व ते बेन ऑईल म्हणून ओळखले जाते. हे तेल सूक्ष्म यांत्रिक उपकरणांच्या दुरुस्तीसाठी वापरले जाते. शेवग्याच्या सालीतून डिंक काढला जातो. अशा या शेवग्याला ‘मिरॅकल ट्री’ म्हटले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com