esakal | गप्पा ‘पोष्टी’ : थालिपीठ!
sakal

बोलून बातमी शोधा

Thalipeeth

गप्पा ‘पोष्टी’ : थालिपीठ!

sakal_logo
By
प्रसाद शिरगावकर

भाजणीच्या थालिपिठाचा शोध जिनं लावला तिला एखादं नोबेल किंवा ऑस्कर देऊन सत्कार करायला हवा, असं माझं ठाम मत आहे! घरच्या खमंग भाजणीचं, भरपूर कांदा आणि कोथींबीर घातलेलं गरमा-गरम थालिपीठ, बाहेरून थोडंस कडक, पण आतून मऊशार, वर पुरेसं भिजेल इतकं तूप किंवा घरच्या ताज्या लोण्याचा मोठा गोळा, बाजूला दह्याची एक कवडी आणि एक लोणच्याची फोड... हे दृश्य बघून सोडा, नुसतं वर्णन वाचून किंवा आठवूनही तोंडाला पाणी सुटतं आणि कडकडून भूक लागल्याची जाणीव होते!

बाकी, तव्यावर थापून केलेलं भाजणीचं थालिपीठ, हेच खरं थालिपीठ. उपवासाचं थालिपीठ, साबुदाण्याचं थालिपीठ वगैरे थालिपीठ घराण्याचं नाव सांगणारे पदार्थ आहेत, पण यांना थालिपीठ म्हणणं म्हणजे केवळ एकाच घराण्यातले आहेत म्हणून मांजरालाही वाघीण म्हणण्यासारखं आहे! किंवा फक्त गाणं म्हणतो म्हणून हिमेश रेशमियाला शास्त्रीय गायक म्हणण्यासारखं आहे! आहे, तेही गाणंच आहे, पण त्याला मूळ गाण्याची सर नाही! (गाणं हा शब्द इच्छुकांनी खाणं असा वाचावा).

थालिपीठ काही हॉटेलांमध्येही मिळतं. म्हणजे जुन्या तग धरून असलेल्या, पोहे आणि वडापाव सोडून इतरही मराठी पदार्थ जगात आहेत यावर अजूनही विश्वास असलेल्या मोजक्याच हॉटेलांत मिळतं. पण बहुसंख्य ठिकाणी थोड्या मोठ्या पुरीच्या आकाराचं तळलेलं थालिपीठ देतात. म्हणजे हरकत नाही, ज्याला तळायचंय त्यानं तळावं, पण हे करताना एकाबाजूनं खरपूस आणि एका बाजूनं मऊ हा थालिपीठाचा मूलभूत गुणधर्मच नाहीसा होतो. शिवाय अशा लाटून-तळलेल्या थालपीठावर आजी, आई किंवा बायकोनं ते ‘थापताना’ उमटलेले त्यांच्या बोटांचे ठसे आणि मध्ये शिजण्यासाठी पाडलेली नाजुक भोकंही नसतात. भाजणीची न तळलेली जाड पुरी म्हणून ते आनंदानं खावं, पण त्याला थालिपीठ म्हणू नये! (तळलेलं थालिपीठ आणि थापून भाजलेलं थालिपीठ यांच्यात ज्युनिअर बच्चन आणि सीनियर बच्चन यांच्यातल्या फरका इतका फरक आहे!!)

तर ते असो. सकाळची वेळ असावी. रात्रभर पाऊस पडून गेलेला असावा. सकाळी हलकीशी रिपरिप सुरू असावी. पोटात भुकेचा डोंब उसळलेला असावा. स्वयंपाकघरातून तव्यावर थापल्या जाणाऱ्या भाजणीचा तो कच्चा गंध दरवळायला लागलेला असावा. पुढं त्या तापत जाणाऱ्या तव्यावरच्या थालिपीठाच्या भोकांमध्ये तेल सोडल्याचा ‘चर्र’ असा आवाज येत असावा आणि थोड्याच वेळात आपली सजणी थाळीत भाजणी थालिपीठ घेऊन समोर यावी!

ते नोबेल किंवा ऑस्कर द्या किंवा देऊ नका. स्वर्गसुख ग्यारंटीड!

loading image