मराठमोळ्या पदार्थांचे आधुनिक फ्यूजन

मराठमोळ्या पदार्थांचे आधुनिक फ्यूजन

खाऊगल्ली : प्रभादेवी 
दादर ते प्रभादेवी या मराठमोळ्या पट्ट्यातील खाऊगल्ल्या काळानुसार बदलल्या असल्या, तरी या खाऊगल्लीतील काही हॉटेल्स अजूनही आपले मराठमोळेपण टिकवून आहेत. पुरणपोळी 
आईस्क्रीम, काजू बोंडाचे सरबत, पेरूचे सरबत, फणसाचे आईस्क्रीम, आले-लिंबू- मिरचीचे आईस्क्रीम अशा मराठमोळ्या पदार्थांचे आधुनिक फ्यूजन, त्याचबरोबर ओल्या काजूची उसळ, बोंबीलाचे बुझण, जवळा कोशिंबीर, जवळा भेळ असे भरपेट भोजन येथे मिळते.    

प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आगर बाजार येथील चैतन्य उपाहारगृहात मालवणी मसाले आणि खोबऱ्यापासून बनविलेल्या खाद्यपदार्थांच्या अनेक मालवणी डिश मिळतात. वीस प्रकारचे गरम मसाले वापरून घरगुती पद्धतीने बनविलेले ताजे मासे या उपाहारगृहात ग्राहकांना मिळतात. सुरमई थाळी आणि बांगड्याचे तिखले ही इथली प्रसिद्ध डिश आहे, मसाल्याचे तिरफळ अशा आंबट-गोड सारणापासून बनविलेली ग्रेव्ही यात असून त्याचा आस्वाद घेण्यासाठी लोक दूरहून येतात. 

मसाला, कांदा, लसूण आणि चिंच वापरून केलेले बोंबीलचे बुझण, कालव, डीप फ्राय करून तांदळाचा रवा लावून केलेले कुरकुरीत मासे याचा खमंग वास सुटला की नेमकी कोणती डिश ऑर्डर करावी हेच ग्राहकांना सुचत नाही. माखले, खेकडा फ्राय, जवळा कोशिंबीर, जवळ्याची भेळ यावर ग्राहक तुटून पडतो. किसलेले खोबरे वापरून तयार केलेले चिकन-मटण वडे, कोळंबी भात, कोकम कढी, फिश करी यांमुळे अस्सल मालवणी फील येतो. तसेच भात, मच्छी करी, आमटी, मासे, भाकरी, कोकम कढी यांची वाढण्याची क्रमवारी ठरलेली असते. तसेच ते रंगसंगतीनुसार वाढले जाते, त्यामुळे प्रत्येक ग्राहक या थाळीकडे आकर्षित होतो. 

मालवणी नॉनव्हेजप्रमाणे इथे व्हेजदेखील त्याच पद्धतीने चवीने दिले जाते. काळ्या वाटाण्याची उसळ आणि ओल्या काजूची उसळ याचबरोबर कैरीची आमटी हा तोंडाला पाणी आणणारा प्रकारही येथे मिळतो. यात बेसन, कांदा, मिरची या मिश्रणाचे गोळे करून ते आमटीमध्ये टाकतात. सबरस थाळी खाण्यासाठी लोक इथे वेटिंगवर असतात. एक पालेभाजी, एक कडधान्याची उसळ, एक फळभाजी, भात, डाळ, दोन प्रकारचे पापड, दही, भरलेली मिरची आणि स्वीट अशी परिपूर्ण सबरस  थाळी पहिली की जेवणाआधीच पोट भरून जाते.

इथे उपाहारगृहात बनविलेली कोकणी स्वीट डिश म्हणजे पातोळ्या ग्राहकांना देण्यात येतात. तांदळाच्या पिठात काकडी किसून पीठ तयार केले जाते, ते हळदीच्या पानावर थापून त्यात गूळ आणि खोबऱ्याचे सारण भरून हे गोड पातोळे केले जातात. त्याचबरोबर तांदळाचा रवा, काकडी आणि गूळ घालून केलेल्या वड्या, नाचणीचा हलवा, नारळाच्या दुधात बनविलेले केळ्याचे शिकरण असे घरगुती गोडाचे पदार्थ आणि त्याची टेस्टही वेगळी लागते. काजू बोंडाचे सरबत, पेरूचे सरबत, तसेच फणसाचे आईस्क्रीम, आले, लिंबू, मिरचीचा रस यांचा स्वाद एकदा तरी चाखून पाहायला हवा

तिथूनच थोडे पुढे गेल्यावर पोर्तुगीज चर्चनजीक असलेल्या मराठमोळ्या ‘आस्वाद’ उपाहारगृहातही असेच अफलातून पदार्थ मिळतात. पोळा उसळ ही इथली स्पेशालिटी आहे. काळ्या वाटाण्याचे सांबार, गूळ दुधात घालून केलेला रस आणि आंबोळी अशी ही लज्जतदार पोळा-उसळीची डिश ग्राहकांच्या पसंतीची आहे. मटकी उसळ, काजू मटार उसळ, थालीपीठ, कोथिंबीर वडी, अळूची भाजी याबरोबर आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेली इथली घरच्या मसाल्यांची मिसळ खाल्लीच पाहिजे. स्पेशल वरणभातासोबत असलेली अस्सल तुपाची वाटी, भाजी, बेदाणे, काजू आणि खोबऱ्याच्या तुकड्याची फोडणी देऊन वरून सोडलेली मिरची अशी पंचामृत वाटी, कुरडया, सांडगी मिरची असे ताट फार कमी ठिकाणी मिळते, असे मालक  सूर्यकांत सरजोशी यांनी सांगितले. तिळगुळासह खसखस सारण रेवड्या, हरभरा, खारीक, बाजरी थालीपीठ, पोह्यांच्या कुरडया, मेतकूट-भात यांनाही ग्राहकांची मागणी आहे. येथील एक हटके स्वीट डिश म्हणजे पुरणपोळी-आईस्क्रीम. त्याचे आकर्षण सर्वात जास्त आहे. पुरणाचे सार लिक्विड स्वरूपात करून गोठवलेले ते आईस्क्रीम खाताना आपल्याला थंड पुरणपोळी खात असल्याचा फील येतो. 

सेना भवनजवळच्या ‘प्रकाश’ उपाहारगृहात मिळणारे खमंग थालीपीठ आणि भाजणीचे वडे मन तृप्त करते. विविध फरसाणचे मिश्रण, बटाटा भाजी आणि पोहे घालून केलेली मटकीची मिसळ आणि सोबत पुरी ही डिशदेखील ग्राहकांना आवडते. उपवासाचा साबुदाणा वडा आणि खिचडी खाऊनदेखील प्रचंड समाधान मिळते. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांची चव जपली असल्याचे मालक आशुतोष जोगळेकर यांनी सांगितले. इथले वांगीपोहे, पुरीभाजी, पिठलं भाकरी, शिंगाडा, राजगिरी केळ्याचे पीठ वापरून केलेले वडे, कोथिंबीर वडी, अमृताहूनही गोड लागणारे पियुष चवीला खासच आहे. तूप जिऱ्याची फोडणी देऊन केलेली खमंग काकडी, उपवासाची मिसळ यासाठी उपवास असलेले व इतर ग्राहकही येतात.

येथून जवळच असलेल्या शिव ओम फास्टफूडमध्ये मिळणारे मलाई स्ट्रॉबेरी, फालुदा, वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस पिण्यासाठी संध्याकाळी लोकांची रीघ लागते. मलाई स्ट्रॉबेरी आणि फालुदा याबरोबर पॅटीस, पाणीपुरी, रगडापुरी खाण्यासाठी लोक दूरहून येतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com