Video : खवा, मावा जिलबी!

रविराज गायकवाड
Saturday, 4 January 2020

जिलबी हे नाव काढताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. लग्नाच्या पंगतीत किंवा कोणत्याही आनंदाच्या क्षणी, तोंड गोड करण्यासाठी या केशरी, पिवळ्या जिलबीचीच निवड केली जाते. पुण्यात चांगली जिलबी मिळेल, अशी अनेक ठिकाणं आहेत. पारंपरिक जिलबीसोबत आता पुण्यात एका वेगळ्या जिलबीची चर्चा सुरू झालीय. ती म्हणजे, इंदोरी खव्याची जिलबी.

फूडहंट - रविराज गायकवाड
जिलबी हे नाव काढताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. लग्नाच्या पंगतीत किंवा कोणत्याही आनंदाच्या क्षणी, तोंड गोड करण्यासाठी या केशरी, पिवळ्या जिलबीचीच निवड केली जाते. पुण्यात चांगली जिलबी मिळेल, अशी अनेक ठिकाणं आहेत. पारंपरिक जिलबीसोबत आता पुण्यात एका वेगळ्या जिलबीची चर्चा सुरू झालीय. ती म्हणजे, इंदोरी खव्याची जिलबी.

तांबूस भाजलेली मऊ जिलबी
भारतातल्या इतर मोठ्या शहारांप्रमाणं इंदूरची खाद्यसंस्कृती वेगळीच. इंदूरमध्ये ‘५६ दुकान’ नावाची एक खाऊ गल्ली आहे. तिथं हरतऱ्हेचं स्वीट आणि नमकीन खायला मिळतं. त्याच इंदुरी खव्याची जिलबी आता पुण्यातही मिळतेय. पुण्यात कायमच बाहेरच्या पदार्थांचं स्वागत केलं जातं. त्यात पाकात आकंठ बुडालेली इंदुरी जिलबी कशी मागं राहील? माव्याची ही जिलबी मूळची मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूरची रेसिपी असल्याचं सांगितलं जातं. आपण महाराष्ट्रात खातो ती जिलबी मैद्याच्या पिठापासून बनवलेली असते. अतिशय बारीक काकणाच्या या जिलबीपेक्षा इंदुरीची जिलबी वेगळी आहे. ती मैद्यापासून नाही, तर खव्यापासून बनवली जाते. उत्तर भारतात खव्याला मावा म्हणतात. त्यामुळं या इंदुरी जिलबीला माव्याची जिलबी म्हणूनही ओळखतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तेलाला एकदम मोठी धग देऊन ही जिलबी तळली जाते. अगदी तांबूस भाजून घेतली जाते. अर्थात मैद्याच्या जागी खवा असल्यामुळं ही जिलबी थोडी जाडसर असते. तसंच त्याचं काकणं मैद्याच्या जिलबीसारखी वेगळी होत नाहीत आणि कडकही राहत नाहीत. दोन्ही बाजू्ंनी तांबूस भाजलेली ही जिलबी गरम पाकात बुडवली जाते. पाक गरम असणं या जिलबीसाठी महत्त्वाचं असत. पाकात जवळपास मिनीटभर बुडवून ही जिलबी बाहेर काढली जाते. चिमट्यानं किंवा हातानं ही मऊ जिलबी वेगवेगळी केली जाते किंवा तशीच सर्व्हही केली जाते.

टेस्ट करायला काय हरकत आहे?
पुण्यात सध्या इंदुरी मिठाईची अनेक दुकानं सुरू झाली आहेत. दादूज् मिठाई, इंदौरी फूड्स, इंदौर एक्स्प्रेस, वाह इंदौर, यांच्याकडेही इंदुरी मिठाई आणि इतर पदार्थ उपलब्ध आहेत. भवानी पेठेत जुन्या निशाद थिएटरच्या समोरही इंदुरी खवा जिलबीचं एक छोटं दुकान आहे. साधारण पाच वर्षांपासून हे मिठाईचं दुकान सुरू असल्याचं तिथं जिलबी करणारा, मोहंमद हासीम सांगतो. तो मूळचा इंदूरजवळच्या एका छोट्या गावचा. गावातीलच मोहंमद अक्रमनं हे ‘इंदौरी मिठाई’चं दुकान सुरू केलं आणि हासीम तिथं तीन वर्षांपासून काम करतोय. गोड खावं की खाऊ नये, मैद्याचे पदार्थ खावेत की खाऊ नयेत याविषयी सगळेच ‘हेल्थ कॉन्शिअस’ सध्या चर्चा करताना दिसतात. पण, वेगळ्या चवीची खव्याची जिलबीची टेस्ट घ्यायला काय हरकत आहे?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raviraj Gaikwad Article on Khava Mava Jilebi