हेल्दी रेसिपी : कळण्याच्या वड्या

Kalnyachya-Vadya
Kalnyachya-Vadya

‘दाने-दाने पर लिखा है खानेवाले का नाम’ ही म्हण जणू माझ्यासाठीच बनली असावी. कारण माझ्या खाद्यभ्रमंतीच्या प्रवासात अनेकवेळा अनपेक्षितपणे मला अनेक अवलिया माणसे भेटली. त्यांच्याकडून अनेकविध माहिती मिळाली, पारंपारिक पदार्थ चाखता आले. असाच एक प्रत्यय हा कर्फ्यू लागण्यापूर्वी आला. मी कोकणातील गुहागर भागात काही कामानिमित्त प्रवास करत होते. त्यानंतर नेवरे या छोट्याशा गावी एका काकांकडे जाणार होते. त्यांनी माझी पारंपारिक खाद्यसंस्कृतीची आवड जाणून त्याबाबत काहीतरी सरप्राईज ठरवले होते.

अगदी मोघम माहिती देऊन बाकी गोष्टी त्यांनी गुलदस्त्यातच ठेवल्या. मी देखील त्या गुलदस्त्यातच राहू दिल्या (नाहीतरी स्त्रियांना ‘सरप्राईजेस्’ आवडतातच ना!) मनमोहक निसर्ग, समुद्रकिनारे, कोकणी घरे हे सर्व पाहत, ठिकठिकाणच्या स्थानिक पदार्थांचा, आदरातिथ्याचा आस्वाद घेत माझा प्रवास सुरु होता. कोकणातील खाद्यसंस्कृतीवर इथल्या उपजत घटकांचा, साधेपणाचा खूप चांगला प्रभाव आहे. इथल्या लोकसंस्कृतीची पाळेमुळे देखील इथल्या मातीशी घट्ट जोडली गेली आहेत. या सर्वच गोष्टींनी इथली संस्कृती ‘समृद्ध’ बनलीये. मी नेवऱ्याला पोचले. काकांनी माझ्यासाठी ठरवलेलं सरप्राईज खूपच भन्नाट होतं. रत्नागिरीतील श्री. व सौ. ठाकूरदेसाई हे दांपत्य नोकरी-व्यवसाय सांभाळत आपली खाद्यसंस्कृती जतन करत आहे. माझ्यासारख्यांना इथल्या पारंपारिक पदार्थांचा आस्वाद घेता यावा, यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. माझ्यासाठी त्यांनी रसातील शेवया, फणसाची भाजी, फणसाचे उंबर व त्यावर घरचे साजूक, रवाळ तूप आणि कळण्याच्या वड्या असा सुग्रास बेत आखला होता. ऋतुमानानुसार स्थानिक घटक वापरून केलेले हे सर्वच पदार्थ तसे सकस व पौष्टिक आहेत. आज आपण पाहूयात कळण्याच्या वड्यांची रेसिपी.

साहित्य - भरड (कळणा), तांदूळ २ वाटी, अख्खे हरभरे १ वाटी, उडीद व मूग (अख्खे), तूर डाळ ( सर्व प्रत्येकी १/२ वाटी), धने पाव वाटी.

वड्यांसाठी - तिखट, मीठ, हळद, हिंग – चवीनुसार. फोडणीसाठी : तेल, हिंग, मोहरी, हळद.

कृती -
१. भरड साहित्य एकत्रित करावे. रवाळ भरड करून साधारण भाजून घेणे.
२. वड्यासाठीचे साहित्य घालून भरड कोमट पाण्यात भिजवणे.
३.  मुटके वळून साधारण २५-३० मिनिटे वाफवून घेणे.
४. थंड झाल्यावर वड्या कापणे.
५. फोडणी करून वड्या परतणे.
६. ओले खोबरे व कोथिंबीर घालून सजवणे.

टीप -
१. भरड भाजून ठेवल्यास २ महिने टिकते.
२. वड्यांमध्ये लाल माठ, मेथी, पालक वापरून त्या अधिक पौष्टिक करता येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com