esakal | ग्लॅम-फूड : ‘लॉकडाउन’ काळात बेकिंगचे प्रयोग I Baking
sakal

बोलून बातमी शोधा

Sania Chaudhary

ग्लॅम-फूड : ‘लॉकडाउन’ काळात बेकिंगचे प्रयोग

sakal_logo
By
सानिया चौधरी, अभिनेत्री

उकडीचे मोदक मला प्रचंड आवडतात आणि ते गणपतीच्या दिवसांत खाण्याची मजाच काही वेगळी असते. गरमगरम उकडीचे मोदक आणि त्यावर साजूक तूप टाकून खाणं मला खूपच आवडतं. 

काही वर्षांपूर्वी माझ्या बाबांची गोव्यात साइट सुरू होती, तेव्हा आम्ही सतत गोव्याला जायचो. पुण्याहून गोव्याला जाताना आम्ही अशाच वेळी निघायचो, की जेणेकरून जेवणाच्या वेळेस कोल्हापूरला पोचलं पाहिजे. तिथं जाऊन कोल्हापूरची प्रसिद्ध झणझणीत मिसळ आम्ही खायचोच आणि असं आम्ही बरीच वर्षं केलं.

कूकिंगपेक्षा मला बेकिंग जास्त आवडतं. बेकिंगची आवड मला लॉकडाउनमध्ये निर्माण झाली. त्याआधी मला माहीत नव्हतं, की मला बेकिंगमध्ये जास्त रस आहे. या काळात मी केक, पेस्ट्रीज, ‘अॅपल पाय’ असे अनेक पदार्थ बेक केले. काही वेळा केक करताना ते नीट बेक झाले नाहीत किंवा जास्त बेक झाले; पण नंतर हळूहळू सरावाने आणि यूट्युबवरून व्हिडीओज बघून मी शिकले. अॅमेझॉनवरून केकसाठीचे ट्रेज, मेजरिंग कप्स असं साहित्य मी मागवलं. मला बेकिंगची एवढी आवड निर्माण झाली आणि मग कुटुंबातील, मित्र-मैत्रिणींच्या वाढदिवसाचेही केक मी बनवायला लागले.

आईनं केलेले सगळेच पदार्थ मला खूप आवडतात. कारण आई ते पदार्थ इतक्या मनापासून आणि प्रेमाने करते, मग अगदी आईच्या हातचा साधा चहासुद्धा, तसेच थालीपीठ व पावभाजी असे अनेक पदार्थ आवडतात.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

loading image
go to top