esakal | कुरकुरीत - चुरचुरीत : वडी ‘कठीण’ किती!! | Shrikhand Wadi
sakal

बोलून बातमी शोधा

Shrikhand Wadi
कुरकुरीत - चुरचुरीत : वडी ‘कठीण’ किती!!

कुरकुरीत - चुरचुरीत : वडी ‘कठीण’ किती!!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- सरला थिगळे, पुणे

मी स्वयंपाक शिकत होते तेव्हाची ही गोष्ट. घरात खूप दही उरले होते म्हणून त्यात साखर, केशर वेलदोडे घालून श्रीखंडाच्या वड्या करायच्या मी ठरवले. स्टोव्हवर मिश्रण ठेवून ढवळण्यास सुरुवात केली. दोन तास झाले तरी मी ढवळतच होते. वड्यांचा सुरेख केशरी रंग बदलून आता काळा रंग आला होता. शेवटी कंटाळून मी थांबले आणि ते मिश्रण एका डब्यात ठेवले. जरा वेळाने पाहिले, तर मिश्रण घट्ट दगडासारखे झालेले. दर वेळेस डबा गरम करून तो एकाने धरावा व दुसऱ्याने वड्या ओढून काढाव्यात असे केल्याशिवाय गत्यंतर नव्हते. वड्या चवीला तर छान झाल्या होत्या पण खायला..? महाभयंकर.

संध्याकाळी नाटकाच्या प्रॅक्टिससाठी शेजारची मुले आमच्याकडे आली. त्यांना मी लगेच वड्या खायला दिल्या, आणि मग संवाद म्हणायला सांगितले. तर मुले आपली गप्पच. ‘अरे, बोला बोला’ म्हटले तरी काही बोलनात. ती बिचारी कशी बोलणार? त्याचे दात घट्ट चिकटून बसले होते.

शेजारच्या ताईंना वड्या खायला दिल्या तर... काय सांगू? अहो, चक्क त्यांचे दातच बाहेर आले. मी तर एवढी घाबरले, म्हटले, ‘‘ताई, ताई, अहो हे काय? सॉरी- सॉरी.’’ तशा ताई म्हणाल्या, ‘‘अगं घाबरू नकोस, ही माझी कवळी आहे. बाहेर आली.’’ अस्सं होय! बापरे, मी फारच घाबरले. इतर काही नाही; पण माझ्या वड्यांनी ताईंचे बिंग मात्र फोडले.

loading image
go to top