आज ‘हेल्दी रेसिपी’मध्ये देखील कोहळ्याचे बोंडे  बनणार आहेत

शिल्पा परांडेकर 
Tuesday, 23 June 2020

आपल्याकडे कोहळ्यापासून भाजी, सांडगे, कोहळेपाक, सूप असे अनेकविध प्रकार बनविले जातात. महाराष्ट्रात काही भागात दसऱ्याला; तर काही भागात आषाढात कोहळ्यापासून ‘बोंडे’ नावाचा पदार्थ बनविला जातो. 

‘कोहळा’ या फळाला आयुर्वेद, आहारशास्त्र, पारंपरिक खाद्यसंस्कृती व प्रथा-परंपरांमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. शीत पित्तनाशक, अग्निदीपक कोहळ्याचे नियमित सेवन करावे, असे आयुर्वेद व आहारशास्त्रांत सुचविले आहे. आपल्याकडे प्रवेशद्वाराला कोहळा बांधण्याची प्रथा आहे. असे मानले जाते की, यामुळे नकारात्मक विचार किंवा दुष्टप्रवृत्तींचा आतमध्ये शिरकाव होत नाही. त्यामुळे कोहळा आपल्या शरीरात गेल्याने त्याचे अधिक फायदे नाही का होणार? त्यामुळेच सद्‌गुरूदेखील त्यांच्या साधकांना नियमित कोहळ्याचे सेवन करण्याचा सल्ला देतात. 

स्मरणशक्ती व बुद्धिवर्धनासाठी कोहळ्याचा रस किंवा सूप नियमित घेण्याने फायदा होतो. विशेषतः, वाढत्या वयातील मुलांची उंची वाढण्यासाठी व बुद्धिवर्धनासाठी त्यांच्या आहारात कोहळ्याचा समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. कोहळ्यामुळे मेंदूचा थकवा दूर होऊन उत्साह व सकारात्मक ऊर्जा वाढते. मूळव्याध, मुतखडा, उष्णतेच्या विकारांवर कोहळा लाभदायक आहे. 

आपल्याकडे कोहळ्यापासून भाजी, सांडगे, कोहळेपाक, सूप असे अनेकविध प्रकार बनविले जातात. आग्र्याचा प्रसिद्ध ‘पेठा’ही कोहळ्यापासूनच बनतो. महाराष्ट्रात काही भागात दसऱ्याला; तर काही भागात आषाढात कोहळ्यापासून ‘बोंडे’ नावाचा पदार्थ बनविला जातो. आषाढ महिन्यात ‘आखाड तळणे’ म्हणजे या महिन्यात एखादा तरी पदार्थ तळणे आवश्यक असते. हे पदार्थदेखील प्रांतानुसार वेगवेगळे आहेत. त्यातीलच एक ‘कोहळ्याचे बोंडे’. हे बोंडे म्हणजे भजीचाच एक प्रकार. कोहळ्याचा वाफवलेला गर, गूळ व कणीक वापरून हे पारंपरिक बोंडे बनविले जातात. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आज आपल्या ‘हेल्दी रेसिपी’मध्ये देखील बोंडे बनणार आहेत; पण ते तिखट, कमीत कमी तेल आणि ग्लुटेन फ्री, पचनशक्ती वाढवणारे, अँटी-ऑक्सिडेंटनयुक्त, रक्तातील साखर व वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असे आपले उपवासातील लोकप्रिय धान्य म्हणजेच ‘वरई’सोबत. 

साहित्य ः कोहळ्याचा वाफवलेला गर, वरईचे रवाळ पीठ, मिरची-आले पेस्ट, कोथिंबीर, लिंबाचा रस, चाट मसाला, मीठ, इ. 

कृती ः 
१. वाफवलेल्या गरातील पाणी पिळून काढून वरील सर्व जिन्नस व शेवटी मावेल इतके पीठ घालून त्याचे छोटे गोळे बनवून कमीत कमी तेलावर भाजावेत. 

२. आवडत्या चटणीसोबत खाण्यासाठी बोंडे तयार. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

टीप ः गराचे पाणी टाकून न देता त्याचा वापर इतर पदार्थात करावा. 

वरईचे किंवा इतर उपवासाची पिठे व जिन्नस वापरून हा पदार्थ उपवासासाठीही करता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shilpa parandear article about healthy recipe health pumpkin fritters