esakal | हेल्दी रेसिपी  :  जवस-करटोल्याची भाजी/भरलेले करटोले 
sakal

बोलून बातमी शोधा

kartole

करटोलीची फळे कडू, उष्ण, संसर्गरक्षक व रुचकर असतात. ही फळे वात, कुष्ठरोग, मूळव्याध, पावसाळ्यातील ताप, सर्दी यांवर उपयुक्त आहेत. मधुमेह व हृदयरोग अशा आजारांत देखील करटोली लाभदायक आहे.

हेल्दी रेसिपी  :  जवस-करटोल्याची भाजी/भरलेले करटोले 

sakal_logo
By
शिल्पा परांडेकर

आजची रेसिपी खास आहे. आपल्या ‘सुपर न्युट्रीशिअस सीडस्’ मालिकेतील अत्यंत पौष्टिक बिया म्हणजे जवस किंवा अळशी आणि एक चविष्ट, रुचकर रानभाजी करटोली यांपासून बनलेली ही रेसिपी आहे. त्यामुळे एकाच रेसिपीमध्ये पौष्टिकतेचा ‘डबल धमाका’ आहे, असे म्हणता येईल. 

आपल्याकडे भाजीचा रस दाटसर करण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब होतो. शेंगदाण्याचा कूट किंवा खोबऱ्याबरोबरच इतर घटकांचा म्हणजे तिळकूट, कारळ्याचा कूट, काही पिठे किंवा आपण ज्या बियांची माहिती घेत आहोत त्या बियांचा वापर केला जातो. आजच्या रेसिपीमध्ये जवसाचा वापर आपण याच पद्धतीने करणार आहोत. 

ओमेगा-३, लिग्नन, फायबर, आयर्न, अॅन्टीऑक्सिडंटस् युक्त जवस रक्तातील कॉलेस्टेरॉल कमी करते. कर्करोग, टाईप–टू डायबेटीस, हृदयरोग अशा काही आजारांवर जवस उपयुक्त ठरते. तसेच जवसामुळे हाडे मजबूत होतात, त्वचेचे आरोग्य सुधारते. 

हेल्दी रेसिपी  :  आरोग्याचा ‘विडा’

करटोलीची फळे कडू, उष्ण, संसर्गरक्षक व रुचकर असतात. ही फळे वात, कुष्ठरोग, मूळव्याध, पावसाळ्यातील ताप, सर्दी यांवर उपयुक्त आहेत. मधुमेह व हृदयरोग अशा आजारांत देखील करटोली लाभदायक आहे. करटोलीच्या फळांप्रमाणे करटोलीचे कंददेखील औषधी आहेत. आयुर्वेदात इतर औषधांचीसोबत या कंदांचा वापर केला जातो. 

साहित्य - करटोले, गरम मसाला, कोथिंबीर, ओले खोबरे. मसाला, जवस, लवंग, मिरे, चिंचेचा कोळ, कांदा, लसूण, लाल तिखट, धनेपूड, हळद, मीठ, कोथिंबीर 

फोडणी - तेल, हिंग, जिरे, मोहरी, कडीपत्ता. 

कृती - 
१. जवस, लवंग, मिरे भाजून कुटून घेणे. 
२. कांदा व लसूण अग्नीमध्ये भाजून साल काढून घेऊन मसाल्याच्या उर्वरित साहित्यासह (कोळ व कोथिंबीरसोडून) एकत्रित वाटून घेणे. 
३. चिंचेचा कोळ व कोथिंबीर घालून मसाला एकजीव करून घेणे. 
४. करटोल्यांना चार उभ्या चिरा मारून घेणे. (भरली वांगींसाठी करतो त्याप्रमाणे.) 
५. तयार मसाला करटोल्यांमध्ये भरून घेणे. (थोडा मसाला ग्रेव्हीसाठी शिल्लक ठेवावा.) 
६. फोडणी करून त्यात भरलेले करटोले टाकून परतून घेणे व पाणी न घालता एक वाफ काढून घेणे. 
७. उरलेल्या मसाल्यात थोडे कोमट पाणी घालून एकत्रित करून भाजीमध्ये घालणे.८. वरून गरम मसाला व मीठ घालून भाजी शिजवून घेणे.९. शिजल्यावर वरून कोथिंबीर व ओले खोबरे घालून भाकरीसोबत खाणे.