हेल्दी रेसिपी : वाफवलेले पौष्टिक दहीवडे 

शिल्पा परांडेकर 
Tuesday, 12 May 2020

आपल्या पूर्वजांनीही डाळींचे महत्त्व जाणून डाळींच्या विविध पाककृती व त्या शिजवण्याच्या पद्धतींची नोंद करून ठेवली आहे.  आजही आपल्या आहारात डाळींना महत्त्वाचे स्थान आहे.

‘आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा’ या उन्हाळ्यातील मंत्रानुसार प्रत्येकजण उन्हाळा सुसह्य करण्यासाठी प्रयत्नशील असतो. उन्हाळ्यातील थंडगार पदार्थांबरोबरच थंडगार, मधुर दह्यातील ‘दहीवडे’ कोणाला बरे नको असतील? परंतु आपल्याला या लॉकडाउनच्या परिस्थितीत आरोग्य व वजनाचीही काळजी घ्यायची आहे आणि अशात तळलेले उडदाचे दहीवडे पचनासाठी जड होऊ शकतात. खरेतर, विविध प्रकारच्या डाळी शाकाहारी व्यक्तींसाठी प्रथिनांचा महत्त्वाचा स्रोत आहेत. आपल्या पूर्वजांनीही डाळींचे महत्त्व जाणून डाळींच्या विविध पाककृती व त्या शिजवण्याच्या पद्धतींची नोंद करून ठेवली आहे आणि आजही आपल्या आहारात डाळींना महत्त्वाचे स्थान आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत विविध डाळी वापरून विविध प्रकारचे वडे बनविले जातात. उडीद, हरभरा, मूग, डाळींचे तर काही ठिकाणी मिश्र डाळींचे वडेही बनवतात. उडदाचे वडे प्राचीन काळापासून लोकप्रिय आहेत. ‘क्षेमकुतूहलम्,’ ‘मानसोल्लास’सारख्या प्राचीन ग्रंथांमध्येदेखील वड्यांच्या अनेक पाककृती वाचायला मिळतात. विदर्भात सणासुदीला, तसेच नाष्ट्यासाठीही डाळीचे वडे लोकप्रिय आहेत. परंतु, बहुतांशी, वडे तळलेलेच आढळतात. अगदी, नेहमीचे तळलेले दहीवडे पाण्यातून पिळून काढले तरी याठिकाणी तेलाचा अपव्यय होतो, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे या ‘पारंपरिक’ रेसिपीला आज आपण एक ‘पारंपरिक ट्विस्ट’ देत आहोत. वाफवलेले वडे कसे बनवायचे, हे पाहू. 

साहित्य - मूग डाळ (२ वाटी), उडीद डाळ (१ वाटी), हरभरा डाळ (अर्धी वाटी), मसूर डाळ व तूर डाळ – प्रत्येकी २ चमचे, मेथी दाणे – चिमुटभर, हिंग, मीठ, आले-मिरची-कडीपत्ता वाटण, कोथिंबीर, आंबट दही – १ चमचा. 

इतर साहित्य – हिरवी चटणी, चिंच-खजूर चटणी, ताजे दही, लाल तिखट, धने-जिरे पूड, चाट मसाला, कोथिंबीर. 

कृती 
१. सर्व डाळी व मेथी दाणे रात्रभर भिजवणे. 
२. सकाळी डाळी निथळून व पाणी न घालता वाटून घेणे. त्यात हिंग, मीठ, कोथिंबीर, वाटण व दही घालून अर्धा तास बाजूला ठेवणे. (यामुळे पीठ थोडे आंबून येईल व वडे हलके होतील.) 
३. चाळणीला तेल लावून वडे बनवून मोदकाप्रमाणे साधारण १५ मिनिटे वाफवणे. 
४. ताज्या दह्यात मीठ, साखर व किंचित पाणी घालून घुसळणे व तयार झालेले वडे थोडे थंड करून दह्यात भिजवून घेणे. 
५. भिजलेले वडे प्लेटमध्ये घेऊन वरून लाल तिखट, धने-जिरे पूड, चाट मसाला, हिरवी व गोड चटणी व कोथिंबीर घालून खाण्यास देणे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shilpa Parandekar Healthy Recipe Steamed Nutritious DahiWade