Video: ज्वारीचे आयते

शिल्पा परांडेकर
Tuesday, 18 February 2020

आयतं प्रामुख्याने विदर्भात केला जाणारा पदार्थ. त्यातला एक प्रकार आपण आज पाहणार आहोत.

 हेल्दी रेसिपी :
‘आई, मला भूक लागली...’ अशी आरोळी ठोकताच आपली आई किंवा आजी लगेच काहीतरी हातात खाऊ आणून देते. आणि परीक्षा किंवा आजारपणात तर सगळंच कसं आपल्याला हातात ‘आयतं’ मिळतं. पण आपल्या आईला-आजीलादेखील कधीतरी आपल्याला आयतं जेवण मिळावं, असं वाटतच असेल ना? पण तसं प्रत्यक्षात घडेलच असं नाही. आजकाल तरी यावर ‘होम डिलिव्हरी’ किंवा ‘रेडी टू ईट’सारखे पर्याय आहेत आपल्याकडे. परंतु पूर्वीच्या काळी ना हॉटेल्स, ना मॉल्स आणि ना रेडी टू ईट पदार्थ. मग काय बरं उपाय योजत असतील त्या?

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मला एखादा नवीन पदार्थ माहीत झाला की, असे प्रश्‍न पडायला सुरुवात होते. उदा. हेचं नाव का, अमुक हाच एक पदार्थच नैवेद्य म्हणूनका असेल किंवा विशिष्टच एखादा जिन्नसच का देवपूजेला चालतो वगैरे?

काहीवेळा काही ठिकाणी प्रश्‍नांची उत्तरं मिळत असत आणि नाही मिळाली तर मग मी त्याच विश्‍लेषण करण्याचा प्रयत्न करते. आता आजच्या या पदार्थाला ‘आयतं’ हे नाव का मिळालं असेल बरं? सगळ्याच पदार्थांना काही ‘धिरड्याच्या’ गोष्टीसारखी गोष्ट नसणार पण काहीतरी तर्क जरूर असेल, असे वाटते. जसं आपण म्हणालो, आईला-आजीला जर आयतं जेवण्याची इच्छा झाली तरी ते पूर्वीच्या काळी तशी आवश्यक गोष्ट होती. मग त्यावर त्यांनीच काही उपाय शोधले असावेत. कधी कंटाळा आला तर मग पटकन घरी असलेले जिन्नस एकत्र करून काहीतरी गरमागरम करून खावे, म्हणून मग या पदार्थाचा जन्म झाला असावा. काही ठिकाणी माझ्या तर्काला सकारात्मक दुजोरा मिळाला तर काही ठिकाणी माहीत नाही. आजी करत होती, मग आई, सासूबाई आणि मग आता मीदेखील करते’, हे ठरावीक उत्तर मिळे. आयतं प्रामुख्याने विदर्भात केला जाणारा पदार्थ. त्यातला एक प्रकार आपण आज पाहणार आहोत.

साहित्य : ज्वारीचे पीठ, मीठ.
कृती : १. ज्वारीचे पीठ रात्री ताकात भिजवणे. 
(डोशाच्या पिठापेक्षा किंचित पातळ)
२. सकाळी मीठ घालून डोशाप्रमाणे आयते बनवणे.
टीप - हे आयते आमरसासोबत खाण्याची प्रथा आहे. परंतु याला अजून हेल्दी करायचे असल्यास एखादी उसळ किंवा भाजी सोबतही खाता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shilpa parandekar Healthy recipes jawar dhirde