esakal | दहा इडल्यांची ‘आंबलेली’ कथा
sakal

बोलून बातमी शोधा

food

दहा इडल्यांची ‘आंबलेली’ कथा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लग्नासाठी घरी खूप पाहुणे आले होते. मोठा दादा ओतूरला नोकरीनिमित्त रहात होता. अर्धे पाहुणे त्याच्या घरी व अर्धे पुण्यात. मग ठरवले, की रविवारी सकाळी सगळ्यांनी शिवनेरी किल्ल्यावर जायचे. ऑफिस असल्याने आम्ही शनिवारी सायंकाळी शेवटच्या बसने ओतूरला जायचे ठरवले होते. सगळ्यांसाठी व वहिनीला surprise म्हणून इडलीचे पाच किलो पीठ पाट्यावर वाटून एका मोठ्या डब्यात भरून घेतले. तो जड डबा घेऊन मी व माझी मामेबहीण घाईघाईने शिवाजीनगर गेलो, तर आमच्या समोरून शेवटची बस निघून गेली.

आता उद्या सकाळी सहा वाजता पहिल्या बसने जावे लागणार होते. तो जड डबा घेऊन आम्ही घरी आलो. सकाळी उशीर नको म्हणून रात्रभर जागून काढायचे ठरवले, केव्हा डोळा लागला कळलेच नाही व उशिरा जाग आली. तसेच न आवरता तो जड डबा घेऊन मिळेल ती बस घेतली, नेमकी शेवटची आडवी सीट बसायला मिळाली.

रस्ता खराब असल्याने बस खड्ड्यातून गेली, की आम्ही व डबा दोन्ही उडायचो. रात्रभर चांगले आंबलेले पीठ आता उन्हाने चांगलेच फसफसायला लागले व डब्यातून बाहेर पडून सगळ्या बसभर झाले. कंडक्टरचा पाय त्यावर पडून त्याने आरडाओरडा केल्यानंतर आमच्या लक्षात आले, की पीठानं पूर्ण बस खराब झाली. खाली उतरून दादाच्या घरी पोचलो, तर आमची वाट बघून ते सगळे शिवनेरी किल्ल्यावर गेले होते. एवढे करून पाच किलो पिठाच्या फक्त दहाच इडल्या झाल्या.

- कश्मिरा कोतवाल, पुणे

loading image
go to top