
साहित्य - १ कप बासमती तांदूळ, २ मध्यम कांदे पातळ उभे चिरून, १/२ कप मटार, ६-७ फ्लॉवरचे तुरे, १/२ कप गाजराचे तुकडे, १/४ कप फरसबीचे तुकडे (आवडत असलेल्या भाज्यांसुद्धा घ्याव्यात.), १ कप टोमॅटो प्युरी, १०-१५ काजू बी, १ टे. स्पून लसूण पेस्ट, १ टे.स्पून आले पेस्ट, पाव कप घट्ट दही, ३ ते ४ टे.स्पून तूप किंवा बटर, १/२ टी स्पून लाल तिखट किंवा चवीनुसार.
साहित्य - १ कप बासमती तांदूळ, २ मध्यम कांदे पातळ उभे चिरून, १/२ कप मटार, ६-७ फ्लॉवरचे तुरे, १/२ कप गाजराचे तुकडे, १/४ कप फरसबीचे तुकडे (आवडत असलेल्या भाज्यांसुद्धा घ्याव्यात.), १ कप टोमॅटो प्युरी, १०-१५ काजू बी, १ टे. स्पून लसूण पेस्ट, १ टे.स्पून आले पेस्ट, पाव कप घट्ट दही, ३ ते ४ टे.स्पून तूप किंवा बटर, १/२ टी स्पून लाल तिखट किंवा चवीनुसार.
गरम मसाले - १ इंच दालचिनी, ४-५ लवंगा, २-३ वेलची, ३-४ तमालपत्र, ४-५ काळी मिरी, १ मसाला वेलची, चवीपुरते मीठ, २ चिमटी केशर आणि २ टे. स्पून गरम दूध.
कृती - तळलेला कांदा - एकूण कांद्यापैकी निम्मा कांदा तेलामध्ये कुरकुरीत होईस्तोवर तळून घ्यावा.
बिर्याणीसाठी ग्रेव्ही - कढईत १ टे. स्पून तूप गरम करावे. त्यात काजू तळून घ्यावा, त्यानंतर सर्व गरम मसाले काही सेकंद परतावेत. उरलेला कांदा, आले-लसूण पेस्ट घालावी. कांदा थोडा परतून फरसबी, फ्लॉवरचे तुरे, गाजराचे तुकडे, मटार या भाज्या, तिखट आणि मीठ घालावे. मध्यम आचेवर ३-४ मिनिटे वाफ काढावी. मग टोमॅटोची प्युरी घालावी. मध्यम आचेवर टोमॅटोचा कच्चा वास जाईस्तोवर शिजवावे. मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झाले पाहिजे. कारण नंतर यात दही घालणार आहोत. ग्रेव्ही पातळ राहिल्यास बिर्याणी बनवताना भात ओलसर राहतो, बिर्याणी मोकळी होत नाही. गार झालेल्या ग्रेव्हीत घोटलेले दही मिक्स करावे.
भात - बासमती तांदूळ पाण्यात धुवून १५-२० मिनिटे निथळत ठेवावा. नॉनस्टिक पॅनमध्ये १ टे. स्पून तूप गरम करून त्यात १-२ लवंगा, १-२ वेलची आणि १ तमालपत्र घालून त्यांचा सुगंध येईस्तोवर परतावे. निथळलेळे तांदूळ घालावेत. मंद आचेवर तांदूळ कोरडे होईपर्यंत सतत परतावे. दुसरीकडे गॅसवर दीड कप पाणी गरम करावे. तांदूळ चांगले परतले की त्यात गरम पाणी घालावे आणि गॅस मोठा ठेवावा. मीठ घालावे. पाण्याला उकळी फुटेल आणि भाताच्या पृष्ठभागावर पाणी दिसायचे बंद होईल. त्याचवेळी आच एकदम कमी करून झाकण ठेवावे. मंद आचेवर भात शिजवावा. शिजलेला भात हलकेच परातीत काढून गार होवू द्यावा.
बिर्याणी - बिर्याणी बनवण्यासाठी शक्यतो खोलगट नॉनस्टिक पातेले घ्यावे. तळाला तूप पसरवून घ्यावे. त्यावर एकूण भातापैकी १/४ भाग भात समान पसरवा. त्यावर तळलेल्या कांद्यापैकी थोडा कांदा, थोडे काजू आणि त्यावर थोडी ग्रेव्ही पसरावी. असे ३-४ थर बनवावेत. प्रत्येक थरामध्ये चमचाभर तूप घालावे. सर्वात वरचा थर भाताचा असावा. त्यावर दुधात कालवलेले केशर, काजू आणि तळलेला कांदा घालून भांड्यावर घट्ट झाकण ठेवावे. मंद आचेवर बिर्याणीला किमान २० मिनिटे तरी वाफ काढावी. नंतर गॅस बंद करून झाकण काढून हलकेच बिर्याणी मिक्स करावी. परत झाकून मुरू द्यावी. गरम बिर्याणी काकडी-कांदा-टोमॅटोच्या रायत्याबरोबर सर्व्ह करावी.
टीप - अधिक चवदार होण्यासाठी टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये १/४ कप हेवी क्रीम किंवा मिल्क पावडर घालू शकतो. क्रीम घातल्यास ग्रेव्हीला उकळी काढावी. उकळताना क्रीम फुटू नये म्हणून सारखे ढवळावे. ग्रेव्ही तयार करून ३-४ दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकतो. म्हणजे हवी तेव्हा झटपट बिर्याणी बनवता येते.