टोमॅटो पोह्यांचे वडे

टोमॅटोमुळे या वड्यांना छान आंबूस चव येते, रंग येतो; पण त्याऐवजी तुम्ही काकडीचा रसही वापरू शकता.
Tomato Pohe Vade recipe by nilima nitin food
Tomato Pohe Vade recipe by nilima nitin food sakal
Summary

टोमॅटोमुळे या वड्यांना छान आंबूस चव येते, रंग येतो; पण त्याऐवजी तुम्ही काकडीचा रसही वापरू शकता.

- नीलिमा नितीन

संध्याकाळ म्हटलं, की काहीतरी खायला लागतंच. त्यातही उन्हाळ्यातला दिवसही मोठा त्यामुळे हे संध्याकाळचं प्रकरण जरा जोमातच असतं. माझ्या आठवणीत गावी पोहे कुरमुरे /मुरमुरे यांचे वडे उन्हाळ्यात वाळवून ठेवले जायचे व आम्ही येता जाता कच्चे किंवा तळून खायचो. भन्नाट चविष्ट लागायचे. अगदी कर्रम कुर्रम.

पण आजकालच्या फ्लॅट संस्कृतीत वाळवण घालायची जागाच लुप्त झाली आहे. मग काय हे वडे विसरून जायचे? अशक्य. अगदी वाळवून नाही; पण इन्स्टंट बनवले तर? म्हणूनच आजचा हा यशस्वी प्रयोग. टोमॅटोच्या रसातील पोह्याचे वडे. टोमॅटो रस का? तर टोमॅटोमुळे या वड्यांना छान आंबूस चव येते, रंग येतो; पण त्याऐवजी तुम्ही काकडीचा रसही वापरू शकता. मला हे वडे जरा स्पायसी आवडतात.

अतिशय चविष्ट लागतात. आंबूस तिखट कुरकुरीत वडे खायला तसे खास कारण असायची गरज नाही; पण अगदी मोजक्या साहित्यात व इन्स्टंट प्रकारात मोडत असल्यामुळे तुम्ही ही रेसिपी अचानक दत्त म्हणून येणाऱ्या पाहुण्यांसाठी राखीव ठेवू शकता. शिवाय लहान मुलांना शॉट ब्रेकमध्ये देण्यासाठीसुद्धा ही रेसिपी उत्तम आहे. चला तर मग बघूया साहित्य आणि कृती

साहित्य :

एक मध्यम आकाराचे बाऊल पोहे, अर्धी वाटी टोमॅटो प्युरी, एक टेबलस्पून आले- हिरवी मिरची- लसूण पेस्ट, थोडी चिरलेली ताजी कोथिंबीर, एक उकडलेला बटाटा, चार चमचे तीळ, चवीनुसार मीठ व तळण्यासाठी तेल.

कृती :

  • पोहे पाण्याने धुऊन घ्यावेत. (पाण्यात भिजवत ठेवायचे नाही )

  • एका मोठ्या बाऊलमध्ये हे भिजवलेले पोहे घेऊन त्यात मावेल इतपत टोमॅटो प्युरी घालावी व ते मिक्स करून घ्यावे. टोमॅटोचा रस पोह्यांमध्ये मुरला पाहिजे.

  • नंतर यात हिरवी मिरची- आले- लसूण- पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, उकडून कुस्करलेला बटाटा व अर्धे तीळ घालून हे व्यवस्थित मळून घ्यावे.

  • तुम्हाला आवडत असल्यास यात तुम्ही रंगासाठी थोडी काश्मिरी लाल मिरची पावडरही घालू शकता.

  • या मिश्रणाचे वडे आवडत्या आकारात थापून घ्यावेत. वरून थोडे उरलेले तीळ लावून हाताने हलक्या हाताने ते दाबावेत व अगदी गरम तेलात हे वडे कुरकुरीत तळून घ्यावेत. सर्व्ह करताना तुम्ही यावर चाट मसाला भुरभुरू शकता.

  • आंबूस, क्रंची, तिखट असे हे पोह्याचे वडे अगदी बघताबघता फस्त होतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com