गणेश दर्शन : ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वरांनी स्थापन केलेले श्री अष्टविनायक

प्रकाश सनपूरकर 
Thursday, 27 August 2020

श्री सिद्धरामेश्‍वरांनी सोलापूरच्या आठ दिशांना श्री गणेशाची स्थापना केली. सोलापूरसाठी एक समृद्ध श्री गणेशाची परंपरा त्यांनी स्थापन केलेल्या मूर्तींच्या माध्यमातून पाहावयास मिळते. सोलापूर शहराच्या धार्मिक परंपरेचा एक मोठा आधारस्तंभ म्हणून हे अष्टविनायक ओळखले जातात. 

सोलापूर : ग्रामदैवत सिद्धरामेश्‍वर महाराजांनी सोलापूरच्या रक्षणासाठी आठ दिशांना अष्टविनायक गणपतींची स्थापना केली. या अष्टविनायकांचे सोलापूरकरांसाठी एक आगळे वेगळे महत्त्व आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरातील भाविक या स्थानांना महत्त्व देतात. 

वीर गणपती, कुंभारी 
कुंभारी परिसरात श्री वीरेश गणपतीचे मंदिर आहे. श्रीशैल मल्लिकार्जुन यात्रेला जाणारे भाविक पूर्वीच्या काळात यात्रा सुखरूप व्हावी यासाठी या गणेशाचे दर्शन घेऊन जात असत. गणेश पूजनाने या यात्रेची सुरवात होत असे. या मंदिराच्या परिसरात इतर मंदिरेही पाहावयास मिळतात. यामध्ये महादेव, सूर्यनारायण, अंबाबाई, भगवान विष्णू, रामभक्त हनुमान या देवतांचा समावेश आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे श्री सिद्धरामेश्‍वरांच्या यात्रेची सुरवात या गणपतीसमोर तेलाचा दिवा लावून करण्याची परंपरा आहे. 

बेनक गणपती होटगी 
सोलापूरच्या आग्नेय दिशेला होटगी शिवारात एका शेताच्या बांधावर बेनक गणपतीचे मंदिर आहे. बेनक म्हणजे "पाठीराखा' असा अर्थ होतो. दर्शन घेणाऱ्या भक्तांचा हा गणपती पाठीराखा होऊन त्यांचे रक्षण करतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अत्यंत अरुंद मार्गाने चक्क लोटांगण घालून भाविकांना मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे लागते. गणपतीसोबत आणखी काही देवतांच्या छोट्या मूर्ती आपल्याला पाहावयास मिळतात. 

धुळी महांकाळ गणपती 
शहराच्या दक्षिणेला विजयपूर महामार्गावरील श्री रेवणसिद्धेश्‍वर मंदिराच्या प्रांगणात धुळी महांकाळ गणपतीचे मंदिर आहे. या गणपतीचे नाव श्री नंदी म्हणजे धुळी महांकाळ असे ठेवण्यात आले आहे. श्री सिद्धरामेश्‍वरांचे मूळचे नाव स्मृतीत कायम राहावे यासाठी हे नाव गणेश मूर्तीला दिले, अशी आख्यायिका सांगितली जाते. नवजात मुलाला माता या गणेशाच्या चरणावर ठेवण्याची प्रथा भाविक पाळतात. 

करीगण गणपती 
शहरापासून जाणाऱ्या मंगळवेढा रस्त्यावर देगाव लमाण तांड्यावरील करीमसाहब मुल्ला यांच्या शेतात करीगण गणेश मंदिर आहे. एका छोट्याशा मंदिरात चार फूट उंचीची ही मूर्ती अत्यंत आकर्षक आहे. या गणेशाच्या नावाची उत्पत्ती कन्नड शब्दातून झालेली आहे. करीगण या कन्नड शब्दाचा अर्थ हा काळे डोळे असा होतो; पण शब्दकोशामध्ये काळी सोंड असा उल्लेख आढळतो. या गणेशाच्या दर्शनाने दृष्टीदोषाचे निवारण होते, असे मानले जाते. अत्यंत श्रद्धेने मंदिर परिसरात मूर्तीची पूजाअर्चा केली जाते. 

विरकर गणपती 
सम्राट चौकातील बसवंती मंगल कार्यालयाच्या परिसरात हे गणेश मंदिर आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे हा गणेश बलदंड हातांचा आहे. ही मूर्ती देखील चार फूट उंचीची आहे. या रेखीव गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविक कायम येत असतात. श्री सिद्धरामेश्‍वर यात्रेचे मानकरी सोमशंकर देशमुख यांच्या मळ्यामध्ये हे गणपतीचे मंदिर आहे. याच ठिकाणी सिद्धरामेश्‍वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांपैकी 31 वे पशुपतीय महादेव देखील आहे. या मंदिरात गणेश मूर्तीला सर्व अलंकार रोज चढवून पूजाअर्चा करण्याची पद्धत पाळली जाते. 

वीर कोलाहल गणपती 
शहरापासून बार्शी रस्त्यावर असलेल्या मार्डी मार्गावर बाणेगाव येथील इरन्ना पाटील यांच्या वीटभट्टीजवळील शेतात या गणपतीचे मंदिर स्थापन केले आहे. कन्नड भाषेत कोला म्हणजे देवाची पवित्र काठी, या अर्थाने शब्द वापरला जातो. तर हल म्हणजे दात असा अर्थ होतो. हा गणपतीचे रूप हे वीरश्री भावाचे आहे. हा गणेश संकटरूपी असूरांना मारून भक्ताचे रक्षण करतो असे मानले जाते. आजही मार्डीकडे देवी दर्शनाला जाणारे भाविक या गणेशाचे दर्शन घेऊन पुढे जातात, अशी पद्धत आहे. 

तळे हिप्परगा येथील मश्रुम गणपती 
शहरापासून तुळजापूर रस्त्यावर हे गणपतीचे मंदिर आहे. मश्रुम हा शब्द कन्नड भाषेतून आलेला आहे. कानडीमध्ये खा किंवा जेव असा अर्थ या शब्दाशी संबधित आहे. मसरू म्हणजे खा व उम्म म्हणजे दही यावरून दही खाणारा गणपती अशी या देवतेची ओळख लक्षात येते. हिप्परगा तलावाच्या रम्य परिसरात दगडी बांधकामाचे हे मंदिर आहे. पूर्वीपासून या गणेशाला दहीभाताचा प्रसाद दाखवण्याची परंपरा पाळली जाते. गणेशोत्सवासोबत गणेश जयंती व संकष्टी चतुर्थीला देखील दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. 

कामेश्‍वर अतिथी गणपती (शिवानुभव मंगल कार्यालय) 
शहरातील शिवानुभव मंगल कार्यालयात असलेला कामेश्‍वर अतिथी गणपती हा विशेष मानला जातो. सराफा बाजारातील मीठ गल्ली येथे हे छोटे मंदिर आहे. या गणपतीची आख्यायिका अत्यंत वेगळ्या प्रकारची आहे. सोलापूरच्या नजीक असलेल्या शेळगी येथील हा गणपती सिद्धरामेश्‍वरांची कीर्ती ऐकून त्यांच्या सहवासात राहता यावे यासाठी उत्सुक झाला. सोन्नलगीमध्ये हा गणपती आला व त्याने सिद्धरामास आश्रय देण्याची विनंती केल्याची ही आख्यायिका आहे. तेव्हा सिद्धरामेश्‍वरांनी सोलापूर शहराच्या उत्तर वेशीचे रक्षण करावे, असे सांगितल्याने उत्तर वेस म्हणजे तुळजापूर वेस येथे या गणेशाची स्थापना झाली. नंतरच्या काळात या गणपतीची पूजाअर्चा व्यवस्थित व्हावी म्हणून हा गणपती शिवानुभव मंगल कार्यालयात स्थापन करण्यात आला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Darshan of Shri Ashtavinayak established by the village deity Shri Siddharameshwar